आवर्जून पाहावेत असे ‘अंडररेटेड’ मराठी चित्रपट
गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. कितीतरी नवनवीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत आणि गर्दीही खेचत आहेत. पण चित्रपट चालणं हा चित्रपट चांगला असण्याचा ‘क्रायटेरिया’ असेलच असं नाही. त्यामुळे चित्रपट चालला नाही किंवा त्याबद्दल काही ऐकलं नाही म्हणजे चित्रपट चांगला नाही असा त्याचा अर्थ नक्कीच नाही. काही चित्रपट चांगले असूनही फारसे चालले नाहीत आणि ते चर्चेतही येत नाहीत. अशाच काही ‘अंडररेटेड’ मराठी चित्रपटांबद्दल जाणून घेऊया. (Underrated Marathi Movies)
१. द सायलेन्स
गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘द सायलेन्स’ हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे. चित्रपटाची कथा कोकणातल्या एका गावात वडिलांसोबत राहणाऱ्या चिनी नावाच्या मुलीभोवती फिरते. साधं सरळ आयुष्य जगत असताना अचानक एक दिवस असा येतो की, तिचं आयुष्य वेगळंच वळण घेतं.
सदर चित्रपटातील चिनीच्या भूमिकेसाठी वेदश्री महाजन हिला १६ व्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला होता, तर स्टटगार्ट (२०१५) इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांना ‘द जर्मन स्टार ऑफ इंडिया’ पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
चित्रपटामध्ये वेदश्री महाजन, नागराज मंजुळे, रघुवीर यादव, मुग्धा चाफेकर, अंजली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला IMDB वर ७.२ रेटिंग देण्यात आलं आहे.
२. रंगा पतंगा
निवडणुका जवळ आल्या की, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जोरदार चर्चा सुरु होते. रंगा पतंगा हा चित्रपट जुम्मन नावाच्या शेतकऱ्याच्या समस्येवर आधारित आहे. पण त्याची समस्या वेगळी आहे. जुम्मनने आपली बैलजोडी रंगा-पतंगा गमावली आहे. तो आणि त्याची पत्नी नूर या बैलजोडीवर त्यांच्या मुलांप्रमाणे प्रेम करत असतात. पण ते बेपत्ता झाल्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान तर होतंच, पण त्याहीपेक्षा जास्त त्यांना गमावल्याचं दुःख होतं.
एकीकडे बैलजोडी सापडत नसते, तर दुसरीकडे पोलिस तक्रार नोंदवून घेत नाहीत. तरीही जुम्मन हार मानत नाही. तो आपला मित्र पोपट याच्या मदतीने त्यांचा शोध घ्यायचा प्रयत्न करत असतो. त्याच दरम्यान योगायोगाने त्यांची भेट कौस्तुभ नावाच्या टीव्ही रिपोर्टरशी होते. कौस्तुभ विदर्भातील दुष्काळाची परिस्थिती कव्हर करण्यासाठी तिथे आलेला असतो. त्याला जुम्मनच्या कहाणीमध्ये रस निर्माण होतो आणि बघता बघता जुम्मन मीडियामध्ये प्रसिद्ध होतो. पुढे काय होतं हे चित्रपटात बघणं रंजक ठरेल.
रंगा पतंगा या चित्रपटामध्ये मकरंद अनारसपुरे, नंदिता धुरी, संदीप पाठक, सुहास पळशीकर, हार्दिक जोशी आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत प्रसाद नामजोशी. हा चित्रपट हॉटस्टारवर उपलब्ध आहे. (Underrated Marathi Movies)
३. रेती
२०१६ साली आलेला ‘रेती’ या मराठी चित्रपटामध्ये वाळू माफियांचं भयानक वास्तव मांडण्यात आलं आहे. ‘रेती माफिया’ किंवा ‘वाळू माफिया’ हे शब्द आपण अनेक वर्तमानपत्रांमधून वाचले असतील, पण या दुनियेची फारशी कोणाला माहिती नसते. एकीकडे पाणी टंचाईच्या मुद्द्यावर बोलताना मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बांधकामांना जबाबदार धरलं जातं. पण त्याच बांधकामाशी संबंधित असणाऱ्या या मुद्द्यावर फारशी चर्चा होत नाही.
रेतीचा वापर सगळीकडेच केला जातो. पण ही रेती कुठून येते? रेती माफिया म्हणजे कोण? ते नक्की काय करतात? यामध्येही अंडरवर्ल्डप्रमाणे समाजातील मोठ मोठी नावं सामील असतात का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हा चित्रपट देतो.
एका वेगळ्या पण महत्त्वाच्या सामाजिक विषयावरील हा चित्रपट दिग्दर्शित केला होता, सुहास भोसले यांनी. यामध्ये किशोर कदम, विद्याधर जोशी, सुहास पळशीकर, चिन्मय मांडलेकर, गायत्री देशमुख, संजय खापरे आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट बघायचा असेल तर तो MX प्लेअरवर अगदी मोफत बघू शकता. (Underrated Marathi Movies)
४. चुंबक
चुंबक ही बालू नावाच्या किशोरवयीन मुलाची कथा आहे. हा मुलगा एका हॉटेलमध्ये कामगार म्हणून नोकरी करत असतो. आपल्या गरीब, दुःखी आयुष्याला कंटाळलेला बालू स्वप्न बघतो श्रीमंत होण्याचं आणि यासाठी तो कोणाला तरी फसव्याचं निर्णय घेतो. याच दरम्यान त्याची गाठ गावातील मंदबुद्धी मुलाशी म्हणजेच प्रसन्नशी पडते. परंतु नंतर मात्र बाळू नैतिकता आणि स्वप्न या दोन गोष्टींमध्ये नक्की काय निवडायचं याचा विचार करत राहतो.
एका वेगळ्या विषयावर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं संग्राम देसाई यांनी. चित्रपटात स्वानंद किरकिरे, साहिल जाधव आणि संग्राम देसाई महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. हा चित्रपट सोनी LIV वर उपलब्ध असून, IMDB वर या चित्रपटाला ७.६ रेटिंग देण्यात आलं आहे.