नाटक आणि गणपतीच्या आठवणी
‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेतून सानवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे विदिशा म्हसकर. रुईया कॉलेजमधून तिने पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय. रुईयाच्या एकांकिकातून सुद्धा तिने काम केले होते. विदिशा म्हणते, “रुईया नाका हे आम्हा रुईयाईट्स विद्यार्थ्यांचं हक्काचे ठिकाण. रुईयाचा गणपती म्हणजे अर्थातच ‘विद्यार्थ्यांचा राजा’.
त्या गणपतीशी माझं एक वेगळंच नातं जुळलं आहे. आम्ही सर्व नाट्यवलय मध्ये कार्यरत असणारे विद्यार्थी या गणपतीच्या आगमन सोहळ्यात आवर्जून सहभागी असायचो. आमच्या नाटकाच्या, एकांकिकाच्या तालमीतून परवानगी काढून त्या आगमनाच्या मिरवणुकीत आम्ही सर्व जण असायचो. तुफान नाचायचो. एक वेगळाच उत्साह संचारायचा. मी या क्षेत्रात काम करू लागल्यावर याच ‘विद्यार्थ्यांचा राजा’ असणाऱ्या बाप्पाच्या मंडपात माझा सत्कार केला होता. तो बाप्पाने मला दिलेला आशीर्वाद होता, असे मी म्हणेन.
आम्ही ‘नाट्यवलय’ मधील विद्यार्थी विद्यार्थिनी एक दिवस वेळ काढून एकमेकांच्या घरी गणपतीला जायचो. मग आमचा वसई ते बदलापूर असा भला मोठा दौरा असायचा. खूप मजा यायची.
मला आठवतंय आम्ही रत्नागिरीत गणपती उत्सवातच एक एकांकिका सादर केली होती. त्यात एका दृश्यात मला रडायचे होते. कोणीतरी मला सांगितलं होतं की डोळ्यात विक्स घातलं की रडू येतं. मी विंगेत उभी राहून डोळ्यात विक्स घालत होते. एकांकिका संपल्यावर काही जणांनी मला येऊन विचारलं की तुम्ही विंगेत उभे राहून काय करत होतात? त्या स्पॉट लाईट मध्ये प्रेक्षकांना विंगेतली मी दिसत होते, मला या गोष्टीचे आजही हसू येते.
यावर्षी लॉकडाऊनमुळे ही सर्व धमाल अनुभवता येत नाही, म्हणून खूप खंत वाटते.”