ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
ओ नायजेला
नायजेला लॉसन…टीव्ही चॅनेलवरील कुकींग शो बघणा-या प्रत्येक महिलेची….महिलेचीच कशाला पुरुषांचीही आवडती अँकर …नायजेला आहेच अशी…वय किती अवघं साठ…पण विशीच्या तरुणीलाही लाजवेल असं सौदर्य…त्यासोबत मोहक हास्य…आणि आपली रेसिपी(भलेही ती कितीही साधी असो) सादर करतांना ही रेसिपी फक्त नायजेलाच करु शकते, अशा थाटातलं अँकरींग… नायजेला लॉसन हे कुकींग इंडस्ट्रीमधील मोठं नाव. मोठा ब्रॅण्ड म्हटला तरी चालेल. तब्बल चाळीस वर्ष नायजेला या क्षेत्रात आपल्या नावाचा दबदबा ठेऊन आहे. आज बाई साठ वर्षाच्या आहेत. पण हे सांगावं लागतं. अन्यथा तिला पाहिलं की पहात बसावं…असं तिचं रुप…आज या क्षेत्रात सर्वात अधिक मानधन घेणारी अँकर म्हणून नायजेला ओळखली जाते. या सर्वांमागे तिची मेहनत आणि चिकाटी मोठी आहे. लंडनच्या नामंकीत घराण्यात तिचा जन्म झाला. त्यामुळे तोलामोलाच्या शाळांमध्ये आणि पुढे ऑक्सफर्ड सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये तिचं शिक्षण झालं. द संण्डे टाईम्समध्ये तिच्या करिअरची सुरुवात झाली. तिचा फूडकॉलम लोकप्रिय ठरला. मग या बाई ठराविक साच्यात राहिल्या नाहीत. तिने सर्व आघाडीच्या वृत्तपत्रात आपले कॉलम लिहीले.
1998 मध्ये तिचं पहिलं पुस्तक आलं. How to Eat…या पुस्तकानं पहिल्याच फेरीत विक्रम केला. तब्बल 300000 हजार कॉपी संपल्या…अजूनही हे पुस्तक खवय्यांना वाचावसं वाटतं. त्यानंतर 2000 मध्ये How to Be a Domestic Goddess हे आणखी एक पुस्तक नायजेलाचं आलं. या पुस्तकाला ऑथर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाल.
त्यानंतर नायजेलानं टीव्ही क्षेत्रात पदार्पण केले. फूड चॅनेलवर नायजेलाचा शो नाही तर काही नाही…असं समीकरण झालं. मग नायजेला बाईटस्, नायजेला ख्रिसमस किचन, द टेस्ट ही काही मोजकी नावं आहेत तिच्या शोची…याशिवायही तिने अनेक शो केल. प्रत्येक शोला तुफान प्रतिसाद मिळाला…आणि मिळतोही आहे. तिचं सफाईदार बोलणं…अगदी ती आपल्याशीच बोलतेय एवढं ते आपुलकीचं असणं…ती बनवत असलेल्या पदार्थांत अनेक टीप देणं.. आणि तीचं ते गोड दिसणं यामुळे प्रत्येक शो ची टीआरपी ही वरचढ असायचा. Simply Nigella या टीएलसी वरील शो खूप वर्ष चालला. पुढे नायजेला MasterChef Australia मध्ये दिसली. तिथे ती जज म्हणून सर्वाची आवडती झाली.
या नायजेलाचा प्रत्येक शो मी बघते…त्याला कारणंही अनेक आहेत. मुळात तिला स्वयंपाकघरात वावरतांना बघणं हा सुखद अनुभव असतो. कितीही पदार्थ असोत, चिडचिड नाही…धावपळ नाही. सर्व कसं शांत आणि सुरेख…तिचं स्टोअर हे आणखी एक पहाण्यासारखं. नायजेलाला त्याचा खूप अभिमान आहे. या स्टोअरचा दरवाजा उघडला की दिसतो तो मोठा खजिना. जवळपास सर्व देशांतील विविध चवीचे सॉस, चटण्या, इसेन्स…असं खूप काही या स्टोअरमध्ये साठवलेलं आहे. नायजेला जेव्हा ते वापरते, तेव्हा त्याची माहितीही तेवढ्याच सुरेखपणे देते. त्यात स्वयंपाकघरात वापरता येणारी प्रत्येक नवी गोष्ट आधी नायजेलाच्या शोमध्ये दिसते. ती कशी वापरायची याचे प्रात्यक्षिकही ही बाई दाखवते…ती अस्सल गृहिणी आहे. केकचं बॅटर तयार केलं तर त्याचा एक थेंबही वाया घालवत नाही…तो भर शोमध्ये चाटून चवही बघते. मग रात्री आपण केलेला पदार्थ गुपचूप येऊन खातेही…मुलांच्या सहवासात रमते…पाहुण्यांना बोलवते…त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून खाऊ घालते. प्रत्येक सणाला मेजवानी देते…छान दिसते…या तिच्या सहज-सुंदर वावरामळेच तिचा प्रत्येक शो हा अधिकाधिक लोकप्रिय होतो… आताही टिएलसी चॅनेल कधी लावलं तर नायजेलाच्या शोचे टाईमटेबल बघा…आणि तो शोही नक्की बघा…तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल.
सई बने
फोटो सौजन्य- गुगल (Google)