‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
…त्याप्रसंगी आदिती भागवतसाठी नृत्य ठरले सकारात्मक…
ही एखादी पटकथा नाही, तर ही एक रिऍलिटी आहे, एका चित्रपटासाठी अगदी शूटिंगसाठीच्या तारखा देऊन आपली निवड निश्चित झाल्याने आपल्या आईसोबत कोल्हापूरला जायची सगळी तयारी केली असताना गाडीची वाट पाहत बसायचं आणि मग खूप उशिरापर्यंत गाडीच येत नाही, पण समजते की आपल्या करियरसाठी महत्वाच्या असलेल्या ‘या चित्रपटात आपल्याऐवजी अन्य एका अभिनेत्रीची निवड झाली आहे’ अशा वेळी या अभिनेत्रीची मनःस्थिती कशी होईल??? अर्थात अपसेट होईलच. चित्रपटसृष्टीत असेही काही घडते हे आपण ऐकून होतो, पण ते आपल्याच बाबतीत घडावे याचे तिला नक्कीच वाईट वाटेल. असं सगळं होतेच. पण त्यातूनही ती सावरते आणि एक वेगळा निर्णय घेते. मराठी चित्रपटात भूमिका साकारु अथवा नाही, जशी संधी मिळेल, भूमिका आवडली तर करु एखादा चित्रपट, अन्यथा आपल्या नृत्य कलेच्या अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून चांगला उपयोग करुन त्या दिशेने वाटचाल करु. तो निर्णय अगदी योग्य वेळी घेतल्याचे पुढे जाऊन सिध्दही होते आणि त्या चित्रपटाच्या अतिशय घवघवीत यशाकडेही ती अगदी तटस्थपणे पाहू शकते. हा मराठी चित्रपट कोणता होता माहिती आहे का???
“नटरंग” (२००९) आणि या चित्रपटाची सक्सेस स्टोरी एक बहुपदरी वेगळा विषय आहे. आदितीकडून हे सगळे मला एकदा समजले, पण तेव्हा तिच्या बोलण्यात कडवपणा नव्हता, तर असे घडल्याने आपण देशविदेशात नृत्याचे अनेक शो केले, त्यात लावणी आणि शास्त्रीय नृत्य असे फ्युजनही केले अशा अनेक गोष्टी तिने आवर्जून आणि अभिमानाने सांगितल्या. (दिग्दर्शक रवि जाधवने महाराष्ट्र टाईम्समधील आपल्या एका लेखात “नटरंग” साठी सुरुवातीला आदिती भागवतची निवड झाली होती असे कालांतराने म्हटलेही.) म्हटलं ना, सिनेमाच्या जगाच्या वाटचालीची हुकमी पटकथा नाही. महत्वाचे आहे ते, आपल्यातील गुणांचा नेमका कुठे आणि कसा उपयोग करुन घ्यायचा याचे स्वतःला वेळीच आकलन होणे. आदिती अधूनमधून मराठी चित्रपटात आजही भूमिका साकारतेय (आपला पहिला हिरो भरत जाधवसोबतचा तिचा “स्टेपनी” हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे.) आणि त्यावर भरभरून बोलतेही.
अभिनेत्री म्हणून आदिती भागवतला पहिली संधी मिळाली ती दिग्दर्शक ए. राधास्वामी यांच्या “चालू नवरा भोळी बायको” (२००३) या चित्रपटात…! प्लाझा थिएटरमधील पहिल्या दिवसाच्या बाराच्या प्रीमियर शोला भरत जाधव स्टार होता, याचे कारण म्हणजे, तो तेव्हा रंगभूमीवरील यशाच्या वलयात होता. आदिती भागवतचे ग्लॅमरस लूकमध्ये येण्यास पसंती दिली होती. आदिती चित्रपटात आली त्याच वर्षी संदीप सावंत दिग्दर्शित “श्वास” पासून मराठी चित्रपटसृष्टीला पुन्हा उर्जितावस्था येत होती, दुसरीकडे पीतांबर काळे दिग्दर्शित “बापू वीरु वाटेगांवकर” या चित्रपटाने ग्रामीण भागात खणखणीत व्यावसायिक यश मिळवत मराठी चित्रपटाला मोठा प्रेक्षकवर्ग आहे हे अधोरेखित केले होते. आदितीने चित्रपट आणि नृत्य अशा दोन्हीत वाटचाल सुरु ठेवली, पण रमली नृत्यात. आमची पहिली भेट तिच्या वांद्र्याच्या घरी झाली तेव्हा तिचे प्राणी प्रेमही लक्षात आले. एका कुत्र्याचे ती अगदी मन लावून पालनपोषण करीत एक वेगळा आनंद मिळवत होती. अशा गोष्टी संवेदनशील कलाकारांना सपोर्ट सिस्टीमचे ऑक्सिजन देत असतात.
हे हि वाचा : स्वतःचे अस्तित्व सिनेसृष्टीत निर्माण करणारा: अजिंक्य देव
तिच्या सिनेमाच्या प्रगती पुस्तकात “अदलाबदली, मन्या सजन्ना, तहान” याबरोबरच गजेन्द्र अहिरे दिग्दर्शित “सुंबरान” आणि “शासन” या चित्रपटांचा समावेश होतो. “शासन” राजकीय चित्रपट आहे. का कोण जाणे पण हा चित्रपट बराच विस्कळीत वाटला. अशा चित्रपटांना मल्टी स्टार कास्टचे आकर्षण उपयोगी पडत नाही. आदितीचा रुपेरी पडद्यावर प्रभाव दिसला तो मधुर भंडारकर दिग्दर्शित “ट्रॅफिक सिग्नल” आणि गजेन्द्र अहिरे दिग्दर्शित “वासुदेव बळवंत फडके” या चित्रपटातील पाहुणी कलाकार म्हणून साकारलेल्या जोरदार नृत्यात…! दोन्हीतील तिचा परफार्म एकदम कडक…! अथवा चाबूक! तात्पर्य, आपल्या गुणांचा असा सदुपयोग करायला मिळाला की कलाकार खुलतोच. अशाच अनेक प्रकारच्या नृत्यासाठी तिचा आणखी काही दिग्दर्शकांनी विचार करायला हवा असे आपण कितीही म्हणालो अथवा काही निर्माता आणि दिग्दर्शकांच्या सदिच्छा भेटी घेतल्या की आश्वासन नक्कीच मिळते. संधीचे काहीच सांगू शकत नाही. आदिती आपल्या आईसोबत अनेकांना भेटली, अगदी काही चित्रपटांचे मार्गी लागेल असेही वाटले. पण प्रत्यक्षात तसे सकारात्मक रिझल्ट आले नाहीत. त्यापेक्षा युरोप, अमेरिकेत आणि जगात आणखीन कुठे कुठे नृत्याचे कार्यक्रम उत्तम. तीही एक प्रकारची कलेची सेवाच आहे आणि त्यातही नवीन प्रयोग/काॅम्बिनेशन करत ती आनंद घेतेय हे विशेष उल्लेखनीय आहे.तिने पारंपरिक नृत्यात संगीत जाझचे मिश्रण केले तसेच कथ्थक आणि इलेक्ट्रॉनिक संगीत यांची युती घडवून आणली.
भारतीय शास्रीय संगीताची परंपरा कायम ठेवून तिने ही सगळी वेगळी पावले टाकली. या क्रियेटीव्हीटीचा तिचा आनंद अनेकदा तिच्या बोलण्यात येतो. तिच्या अशा एका शोचा रवींद्र नाट्य मंदिरात मीही अनुभव घेतला. तेव्हा नृत्यातील तिची क्षमता, उत्फूर्तता, आवड, प्रगती आणि अगदी अभिनय या सगळ्याचा छान प्रत्यय आला. आदितीची आई रागिणी भागवत या शास्रीय गायिका असल्याने घरातूनच आदितीला संगीत व नृत्य यांची ओळख होत गेली. या सगळ्याचे आणखीन एक पाऊल म्हणून तिने “आरसा” या शाॅर्ट फिल्मची निर्मिती केली आणि आवर्जून पाहायला बोलावले. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, एकदा चक्क ‘बोल्ड अँड ब्युटीफूल’ या अँगलने मी आदितीची मुलाखत घेतली. हे पुन्हा एक वेगळपण. ते कसे??? तर तिचे काही ग्लॅमरस लूकचे छान फोटो माझ्या पाहण्यात आले तेव्हा तिच्या पर्सनॅलिटी सेक्स अपिल पटकन लक्ष वेधून घेत होते. तसे तिला म्हणतच या वेगळ्या मुलाखतीची तिला कल्पना दिली आणि तिनेही सकारात्मक दृष्टिकोनातून पटकन होकार दिला. नृत्यातून होणारा व्यायाम, फिटनेसचे महत्व, त्यासाठीचे प्रयत्न आणि ग्लॅमरस लूकचा छान प्रेझेंटेबल पर्सनालीटीचा आनंद या सगळ्याची ही केमिस्ट्री फोटोत दिसतेय असे तिचे म्हणणे होते. एक वेगळी आदिती यानिमित्ताने जाणवली. आता अशी मुलाखत प्रसिद्ध करताना भरपूर ग्लॅमरस लूकचे फोटोही असलेले बरे असतात. ते फोटो जास्त बोलतात. चित्रपटासाठीची पर्सनालीटी आणि मानसिकता तिच्याकडे कायमच होती, पण ते मिळत नाहीत अथवा आपला कोणताच ग्रुप नाही हे स्वीकारत तिने आपला मार्ग आपणच ठरवला आणि यशस्वीही ठरलीय.
आदितीशी जुन्या चित्रपटातील नृत्य कला आणि नवीन चित्रपटातील रिमिक्स परंतु स्वैर (कधी तर ओंगळवाणे) सादरीकरण यावर गप्पा करताना तिचे गीत संगीत व नृत्य यावरचे निस्सीम प्रेम प्रकर्षाने लक्षात येते. तिच तिची ओळख आहे, ताकद आहे आणि खासियत तर आहेच आहे. तिच्या नृत्याचे आपलं एक वेगळे ग्लॅमर आहे असे म्हणतच तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…