दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
दिपीका, माधुरी आणि मिथुनदा झळकणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर! फेब्रुवारी महिन्यात मनोरंजनाचा धमाका
फेब्रुवारी महिना हा ओटीटी प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ साठी विशेष असणाऱ्या या महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक दिग्गज कलाकार एन्ट्री करत आहेत. दिपीका पादुकोण, माधुरी दिक्षित, मिथुन चक्रवर्ती या कलाकारांचे आगमन या माध्यमातून छोट्या पडद्यावर होत आहे. दिपीकाच्या बेधडक दृष्यांनी प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आलेला चित्रपट ‘गहराइयां’ यातील प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
कालच्या शुक्रवारी म्हणजे चार फेब्रुवारी रोजी मोठ्या पडद्यावर कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला नसला, तरी ओटीटीवर तापसी पन्नू आणि ताहीर राज भसीन यांचा लूप-लपेटा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. १९८८ मध्ये आलेल्या ‘रन लोला रन’ या जर्मन चित्रपटाचा लूप-लपेटा हा रिमेक आहे. आकाश भाटीया या चित्रपटाचे दिग्दर्शक असून हा कॉमेडी ड्रामा आहे.
तापसी पन्नूचा यापूर्वी थप्पड चित्रपट मोठ्या पडद्यावर आला होता. रश्मि रॉकेट आणि हसीन दिलरुबा हे तिचे चित्रपट ओटीटीवर अधिक बघितले गेले आहेत. आयुष माहेश्वरी लूप लपेटाचे निर्माते आहेत. हलकीफुलकी कॉमेडी असलेल्या या चित्रपटाकडून तापसीला भरपूर अपेक्षा आहेत.
याच पहिल्या आठवड्यात डीज्नी प्लस हॉटस्टारवर थ्रिलर वेब सिरीज’ द ग्रेट इंडीयन मर्डर’ रिलीज होत आहे. तिग्मांशु धुलिया दिग्दर्शित ही थ्रिलर मर्डर मिस्ट्री आहे. यात प्रतीक गांधी, रिचा चड्ढा, आशुतोष, शशांक अरोडा, रघुवीर यादव, शारीब हाश्मी, जतिन गोस्वामी आणि पाओली दाम यांच्या प्रमुख भूमिका आहे. ही वेबसिरीज हिंदी, तमिल, तेलुगु, कन्नड, मलयालम आणि बंगालीमध्ये रिलीज होत आहे.
यासोबत सोनी लिववर ‘रॉकेट बॉयज’ ही वेबसिरीजही येत आहे. भारतीय आंतराळ मोहीमेचे जनक डॉ. होमी जहांगीर भाभा आणि डॉ. विक्रम साराभाई यांच्या जीवनावर ही वेबसिरीज आहे. यात इश्वाक सिंह आणि जिम सरभ प्रमुख भुमिकेत आहेत. रॉकेट बायजचे दिग्दर्शक अभय पन्नू असून निखिल आडवाणी आणि सिद्धार्थ रॉय कपूर हे या सिरीजचे निर्माते आहेत.
=====
हे देखील वाचा: अनुराधा (Anuradha)- बॅन लिपस्टिकचे रहस्य उलगडले
=====
फेब्रुवारीच्या दुसऱ्या म्हणजेच व्हालेंटाईन स्पेशल आठवड्यात अमेजॉन प्राईम व्हिडीओवर ‘गहराइयां’ हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होत आहे. शकुन बत्रा दिग्दर्शित या रोमॅंटीक चित्रपटात दिपिका पादुकोण, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य कारवा प्रमुख भूमिकेत आहेत. ११ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या गहराइयां या चित्रपाटाची निर्मिती करण जोहर यांची असल्यामुळे चित्रपटाबाबत उत्सुकता आहे.
दिपिका पादुकोणचा हा थेट ओटीटीवर प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट आहे. यातील ‘तू मर्ज हैं दवा भी, पर आदत है हमें, रोका हैं खुद को लेकीन हम रम ना सके…’ हे टायटल सॉंग नुकतचं रिलीज झालंय. या गाण्याला दीड तासात दहा लाखांहून अधिक व्हूज मिळाले आहेत. अंकुर तिवारी या गाण्याचे गीतकार असून सिर लोथिकानं गाणं गायलं आहे.
या चित्रपटात दिपिकानं अनेक बोल्ड सिन दिले आहेत. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर दिपिकाला अनेकांनी सोशल मिडीयावर ट्रोलही केले आहे.मात्र या सर्वाचा चित्रपटाच्या प्रसिद्धीलाच जास्त उपयोग होत आहे.
१८ फेब्रुवारी रोजी अमेजॉन प्राईम व्हिडीओवर बेस्टसेलर ही वेब सिरीज रिलीज होत आहे. या सिरिजच्या माध्यमातून डान्सिंग स्टार म्हणून ओळखले जाणारे मिथुन चक्रवर्ती ओटीटीवर येत आहेत. बेस्टसेलर ही एक मनोवैज्ञानिक थ्रिलर वेबसिरीज आहे. मुकुल अभ्यंकर यांनी या सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. अन्विता दत्त आणि अल्थिया कौशल यांनी ही कथा लिहीली आहे. आठ भागांच्या या सिरीजमध्ये मिथुनदा सोबत श्रुती हसन, अर्जुन बाजवा, सत्यजीत दुबे आणि सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत आहेत.
=====
हे देखील वाचा: काय म्हणतेय ‘गंगुबाई काठियावाडी’? आलिया भटची विशेष मुलाखत…
=====
२५ फेब्रुवारी रोजी नेटफिक्सवर धकधक गर्ल…अर्थात माधुरी दिक्षितची प्रमुख भूमिका असलेली ‘द फेम गेम’ ही वेबसिरीज रिलीज होत आहे. या सिरीजचे दिग्दर्शन बिजॉय नाम्बियार आणि करिश्मा कोहली यांनी केले आहे. माधुरीसोबत यामध्ये मानव कौल, संजय कपूर, सुहासिनी मुळे, लक्षवीर सरन, मुस्कान जाफरी प्रमुख भूमिकेत आहेत. यात माधुरी सुपरस्टार अनामिकाच्या भूमिकेत आहे. टॉपला असणारी ही अभिनेत्री अचानक गायब होते आणि मग एक शोध सुरु होतो. माधुरीच्या चाहत्यांना या वेबसिरिजची उत्सुकता आहे.
या सर्व वेबसिरीज आणि चित्रपटांबरोबरच प्राइमवर दाखवण्यात येणारे दिवंगत कन्नड अभिनेते पुनीत राजकुमार यांचे चित्रपटही आकर्षणाचा विषय आहेत. लॉ, फ्रेंच बिरयानी, कवलुदारी, मायाबाजार आणि युवारत्न हे राजकुमार यांचे प्रसिद्ध चित्रपट आता त्यांच्या चाहत्यांना घरबसल्या बघता येणार आहेत.