Pet Puraan Review: सई-ललितची धम्माल कॉमेडी ‘पेट पुराण’
काही म्हणा पण प्राणीप्रेमींची गोष्टच वेगळी असते. आपल्या पाळीव प्राण्यावर हे लोक जीवापाड प्रेम करत असतात. अगदी त्यांना आपल्या मुलांप्रमाणे जपत असतात. अशाच एका अनावधानाने प्राणीपेमी झालेल्या (असलेल्या नाही बरं का!) तरुण जोडप्याची कहाणी म्हणजे ‘सोनी Liv’ वरील ‘पेट पुराण’ ही धमाल वेबसिरीज. (Pet Puraan Web Series Review)
‘पेट पुराण’ ही वेबसिरीज जरी प्राणीप्रेमींवर आधारित असली तरी अत्यंत विनोदी पद्धतीने मांडण्यात आली आहे. यासाठी लेखक-दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग यांचं विशेष कौतुक करायलाच हवं. ही सिरीज दोन पिढ्यांमधील वैचारिक तफावतही अधोरेखित करते, पण ती देखील विनोदी पद्धतीने.
‘पेट पुराण’ ही कहाणी आहे सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या आधुनिक विचारांच्या अदिती-अतुल (सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर) या जोडप्याची. आपल्याला मूल नको हा निर्णय त्यांनी आधीच घेतलेला असतो. परंतु, अदितीची धाकटी बहीण गरोदर असल्यामुळे त्यांना कुटुंबियांकडून मुलाचा विचार करण्यासाठी सातत्याने आग्रह केला जात असतो. या आग्रहानंतर एक क्षण अदिती मुलासाठी तयार होते, पण आपल्याला पालकत्व जमेल का, हा विचार करून दोघं त्यासाठी रिसर्च करू लागतात. (Pet Puraan Web Series Review)
अतुलच्या ऑफिसमधल्या मित्राच्या घरी जेव्हा दोघं रिसर्चसाठी जातात तो प्रसंग मस्त जमून आला आहे. यांच्या पालकत्वाच्या रिसर्च दरम्यान अचानक अतुलचा मित्र परेश उर्फ पऱ्याच्या गरोदर मांजरीला दोन दिवस सांभाळायची जबाबदारी अदिती-अतुलवर येते आणि तिला सांभाळताना दोघांची तारांबळ उडते. पण या काळात त्यांच्यामधलं प्राणीप्रेम जागरूक होतं आणि अदिती-अतुल कुत्र्याचं पिल्लू पाळायचा निर्णय घेतात. परंतु, त्यांचा हा प्रवास सोपा नसतो. प्राणी घरात आणण्यापासून त्याचा सांभाळ कसा करायचा हे शिकेपर्यंतचा पूर्ण प्रवास धमाल आणणारा आहे. (Pet Puraan Web Series Review)
सिरीजचे एकूण ७ भाग आहेत. प्रत्येक भाग जवळपास ३० ते ३५ मिनिटांचा आहे. पहिले ४ भाग अत्यंत सुंदर जमून आले आहेत. नंतरचे भाग काहीसे ‘ड्रॅमॅटिक’ वाटतात. पण सिरीज कंटाळवाणी मात्र होत नाही. मुळात यामधून कोणताही सामाजिक संदेश द्यायचा प्रयत्न करण्यात आलेला नसल्याने ही सिरीज डोक्याला कोणताही ताण न देता निखळ करमणूक करते.
सिरीजचा मुख्य फोकस हा अदिती-अतुलवर असल्यामुळे इतर कलाकारांच्या भूमिका छोट्या आहेत. अदितीच्या भूमिकेत सई ताम्हणकर अगदी चपलख बसते. मात्र मनाला भावतो तो ललित प्रभाकरने साकारलेला अतुल. ‘जुळून येती रेशीमगाठी’पासून ‘पेट पुराण’ वेबसिरीजपर्यंत विचार केला तर, ललित प्रभाकरचा अभिनय कमालीचा बहरला आहे. शिवाय त्याचा बदलेला लूक तर अप्रतिम. सिरीजमध्ये सई आणि ललित ही जोडी प्रथमच एकत्र आली आहे आणि या जोडीने धमाल उडवून दिली आहे. (Pet Puraan Web Series Review)
सिरीजमधले छोटे छोटे प्रसंग अगदी सुंदर आणि सहज जमून आले आहेत. यामध्ये मराठवाडा-पुणे वाद, पऱ्याच्या मांजरीला सांभाळताना उडणारी तारांबळ आणि सोसायटीमध्ये कुत्रा पाळण्यासाठीची परवानगी घेतानाचा प्रसंग विशेष लक्षात राहतात.
सिरिजला १६+ सर्टिफिकेट दिलं असलं तरी या सिरीजमध्ये आक्षेपार्ह दृश्य नाहीयेत. परंतु, सुरुवातीच्या दोन भागांमध्ये अदिती-अतुल मुलाचा विचार का करत नाहीत, या विषयावर बऱ्यापैकी बोल्ड चर्चा असल्यामुळे लहान मुलांसोबत बघायची की नाही, हा विचार ज्याचा त्याने करावा. बाकी सुरुवातीच्या दोन भागातले काही प्रसंग सोडले तर, ही सिरीज अगदी सहकुटुंब बघता येण्यासारखी आहे. (Pet Puraan Web Series Review)
=======
हे देखील वाचा – जो जिता वही सिकंदर: कास्टिंगमध्ये होणारे सततचे बदल ठरले निर्मात्यासाठी डोकेदुखी
=======
मराठीमध्ये वेगवगेळ्या विषयांवर वेबसिरीज तयार होऊ लागल्या आहेत. हॉरर, सस्पेन्स-थ्रिलर, क्राईम-थ्रिलर अशा काहीशा बोल्ड विषयांवर आधारित वेबसिरीची लाट येत असताना ‘पेट पुराण’सारखी वेगळ्या आणि अनोख्या विषयावर आधारित निखळ करमणूक करणारी वेबसिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात शंकाच नाही.
वेबसिरीज: पेट पुराण (Pet Puraan)
ओटीटी: सोनी लिव्ह
लेखक-दिग्दर्शक : ज्ञानेश झोटींग
निर्माते : रणजीत गुगळे (ह्युज प्रोडक्शन्स)
कलाकार: ललित प्रभाकर, सई ताम्हणकर, क्षितीज दाते, ऋषी मनोहर, पौर्णिमा मनोहर, अस्मिता आजगावकर, दिप्ती लेले, आणि इतर
दर्जा: ४ स्टार