किशोरच्या गाण्याचा भावस्पर्शी किस्सा: बडी सुनी सुनी है जिंदगी…
पार्श्वगायक मुकेश यांचा शिर्डीतील डायहार्ड फॅन!
कलावंत आणि चाहते यांचं नातं खूप महत्त्वाचं असतं. कलावंताच्या चाहत्यांशिवाय त्यांच्या कलाकृतीला पूर्णत्व मिळत नाही. पार्श्वगायक मुकेश (Mukesh) यांच्या एका फॅनचा एक जबरदस्त किस्सा आहे. मुकेश हे गायक म्हणून श्रेष्ठ होतेच पण एक माणूस म्हणून त्याहून ग्रेट होते याची प्रचीती या किस्स्यामधून येते. मुकेश यांनी आपल्या एका चाहत्याच्या कुटुंबाला उभं करण्यासाठी अर्थसाह्य केलं होतं याची सुरुवात कशी झाली याचा एक मनोरंजक किस्सा आहे.
पन्नासच्या दशकामध्ये गायक आणि गायिका यांचे फोटो अभावानेच मासिकांमधून प्रसिद्ध होत असत. सिंगरची ओळख त्यांच्या आवाजावरून होत असे. त्या काळात फिल्मी मॅगझिनमध्ये नायक नायिकांचे फोटो छापण्याचा ट्रेंड होता. त्यामुळे एखादा गायक किंवा गायिका एखाद्या स्टेशनवर / रस्त्यावर बघितलं तर कुणीच त्यांना ओळखू शकत नसायचे. यातूनच ही एक गमतीशीर घटना घडली होती. पार्श्वगायक मुकेश (Mukesh) साईभक्त होते. नित्यनेमाने ते शिर्डीला जात असत. साठच्या दशकाच्या प्रारंभी एकदा ते शिर्डीला गेले आणि बस स्टॅन्डवरून सायकल रिक्षाने ते मंदिराकडे जाऊ लागले. मुकेशच्या चेहरा फारसा परिचित नसल्याने त्यांना कोणी ओळखत नव्हतं त्यामुळे त्यांचा निवांत प्रवास चालू होता.
सायकल रिक्षावाला मुकेशचेच (Mukesh) एक गाणे तल्लीन होवून गात होता. ‘तेरी दुनिया में दिल लगता नाही वापस बुला ले तेरे सजदे में गिरा हू मुझको ऐ मलिक उठाले..’ हे गाणे गात होता. मुकेशला मनातून आनंद होत होता गाणं ऐकताना. पण त्याने थोडीशी गंमत करायची ठरवले. तो सहज त्या रिक्षावाल्याला म्हणाला, ”अरे हे काय रडके गाणे गातोयस? काहीतरी चांगले गाणे म्हण ना.” त्यावर त्या सायकल रिक्षावाल्याने करकचून ब्रेक दाबला आणि रिक्षा थांबवली. आणि म्हणाला, ”तुम्ही माझ्या रिक्षातून आताच्या आत्ता खाली उतरा.
मुकेश (Mukesh) यांनी विचारले, ”काय झाले?” त्याने सांगितलं, ”मला या गायकाचीच गाणी आवडतात आणि मी दिवस रात्र यांचीच गाणी गात असतो. माझ्या गायकाला कोणी काही वाईट म्हणलेलं मला अजिबात खपणार नाही. तुम्ही मला पैसे देऊ नका. तुम्हाला दुसरी रिक्षा करून देतो मी. पण माझ्या रिक्षा तुम्ही बसू नका. जो माझ्या मुकेश बाबत कोणी वाईट बोलतो ती व्यक्ती माझ्या रिक्षात बसू शकत नाही. तुम्ही कृपया खाली उतरा!” त्यावर मुकेश म्हणाले,” मला माफ कर मित्रा मला माहिती नव्हतं. पण हे कोण गायक आहेत?” त्यावर रिक्षावाला म्हणाला,” तुम्हाला एवढं पण माहित नाही हे मुकेश आहेत मुकेश. मोठे गायक आहेत. खूप दर्दभरी गाणी गातात ते!”
मुकेश आतून खुलले पण त्यांनी आपली ओळख हालवून दाखवली नाही. म्हणाले,” ठीक आहे. तू म्हणशील तसेच गाणे गात रहा. मला साईबाबाचे दर्शन घेऊन पुन्हा स्टँडवर सोडशील का?” तो म्हणाला .”हो.” मुकेश (Mukesh) यांनी साईबाबांचे दर्शन घेतले आणि पुन्हा त्या रिक्षात येऊन बसले. परतीच्या प्रवासात मुकेशने त्या रिक्षावाल्याची वैयक्तिक माहिती विचारली. त्याने सांगितले,”साहेब, या महागाईच्या दिवसांमध्ये काहीच परवडत नाही. मला एक मुलगी आहे ती मंदिराच्या बाहेर फुले विकते. मला एक मुलगा आहे तो मजुरीचे काम करतो. त्यांना खरं तर शिक्षण द्यायला पाहिजे. पण माझ्या तुटपुंज्या पैशात मी त्यांना कसे शिक्षण देणार? खूप वाईट वाटतं मला की आपण आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकत नाही. त्यांना चांगलं भविष्य देऊ शकत नाही.” त्यावर मुकेश म्हणाले,” ते ठीक आहे. पण मला एक सांग तुला मुकेशला भेटायला आवडेल का? माझ्या मित्राचे ते ओळखीचे आहेत “
आता रिक्षावाला हसू लागला आणि म्हणाला ,”काय साहेब ? गरीबाची चेष्टा करता का. माझ्याकडे एवढे कुठे पैसे आहेत मुंबईला जाऊन मुकेशला भेटायला. आणि मुकेश मला का भेटेल? त्यांचे हजारो चाहते आहेत. तो प्रत्येकाला काय भेटत बसेल का?” त्यावर मुकेश (Mukesh) म्हणाले ,” तसं नाही हे. माझे मित्र तुझी भेट घालून देतील. चल आता माझ्यासोबत मुंबईला.” रिक्षावाल्याने रिक्षा स्टॅन्डला लावली घरी निरोप पाठवला आणि मुकेश सोबत ते मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर टॅक्सीने मुकेश त्याला आपल्या घरी घेवून गेले. घरी गेल्यानंतर त्यांनी रिक्षावाल्याला आपल्या हॉलमध्ये बसवले आणि नितीन मुकेशला सांगितले,” तू त्याच्याकडे लक्ष दे. चहा पाणी दे. मी जरा फ्रेश होऊन येतो.”
नितीन मुकेश यांनी त्यांना चहा आणून दिला. हॉलमध्ये अनेक पुरस्कार होते. एक मोठा फोटो होता . त्या फोटोकडे रिक्षावाला पाहत बसला त्याच्या खाली नाव लिहिलं होतं ‘मुकेश चंद्र माथुर.’ त्याने नितीन मुकेशला विचारलं, ”यांचे पण नाव मुकेशच आहे का?” तो म्हणाला,” हो हेच तर आहेत मुकेश.” रिक्षावाल्याने निरागसपणे विचारले ,” हे करतात काय?” नितीन मुकेश म्हणाला ,”हे सिनेमांमध्ये गाणे गातात. हे पार्श्वगायक मुकेश (Mukesh)आहेत.” आता मात्र रिक्षावाला ओशाळला. काल पासून आपण यांच्या सहवासात आहोत आणि ओळखले नाही.
================
हे देखील वाचा : गायक मुकेशचा दिलदारपणा…
================
तोवर फ्रेश होऊन मुकेश देखील हॉलमध्ये आले. रिक्षावाल्याने मुकेशच्या पायावर लोळण घेतली ,”साहेब, मला माफ करा मी तुम्हाला ओळखले नाही.” त्यावर मुकेश म्हणाला,” अरे मित्रा, तुझी जागा माझ्या पायाशी नाही तू माझा मोठा चाहता आहेस. “ असे म्हणून त्यांनी रिक्षावाल्याला आपल्या जवळ घेतले. नंतर त्याचा दोन दिवस चांगला पाहुणचार केला. त्याला नवीन रिक्षा घेण्यासाठी पैसे दिले आणि पुढे दर महिन्याला त्याला ठराविक रक्कम मुकेश पाठवत राहिले आणि सांगितले,”या पैशातून मुलांना चांगले शिक्षण दे”. मुकेश जितके चांगले गायक होते तितकेच चांगले माणूस देखील होते!!