
लग्नघटिका समीप आली! मालिका विश्वातील आणखी एक अभिनेता अडकणार लग्नबंधनात; समोर आले खास फोटो !
मराठी मनोरंजनविश्वात सध्या लग्नसराईचा माहोल पाहायला मिळतो आहे. एकामागोमाग एक कलाकार विवाहबंधनात अडकताना दिसत आहेत. सोहम बांदेकर आणि स्वानंद केतकर यांच्या पाठोपाठ आता लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ खिरीड (Siddharth Khirid) देखील लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थने सोशल मीडियावर आपल्या लग्नाची तारीख जाहीर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. याआधी त्याने गोव्याच्या समुद्रकिनारी आपल्या गर्लफ्रेंडला अगदी फिल्मी अंदाजात प्रपोज केल्यामुळेही तो चांगलाच चर्चेत आला होता. यंदाचं वर्ष अनेक मराठी कलाकारांसाठी खास ठरत असून अनेकांच्या आयुष्यात नव्या पर्वाची सुरुवात होत आहे.(Siddharth Khirid Wedding)

अलीकडेच अभिनेत्री रसिका वाखारकर (Rasika Wakharkar)आणि शुभंकर उंबनानी (Shubhankar Umbanani) यांचा विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर आता सिद्धार्थ खिरीडच्या घरीही लग्नाची लगबग सुरू झाली आहे. नुकताच सिद्धार्थ आणि त्याची होणारी पत्नी मैथिली भोसेकर (Maithili Bhosekar) यांचा मेहंदी समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या खास सोहळ्याचे काही सुंदर फोटो सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केले असून ते सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. मेहंदीच्या कार्यक्रमासाठी दोघांनीही जांभळ्या रंगाची आकर्षक पोशाख परिधान केली होती. मैथिलीच्या हातावर सिद्धार्थच्या नावाची मेहंदी रेखाटलेली दिसत असून या फोटोंमध्ये त्यांच्या आनंदी आणि प्रेमळ क्षणांची झलक पाहायला मिळते.

सिद्धार्थ खिरीड लवकरच डॉ. मैथिली भोसेकर हिच्याशी विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना ओळखतात आणि त्यांचं नातं घट्ट झालं आहे. मैथिली ही केवळ डॉक्टरच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेली मॉडेलदेखील आहे. तिने परदेशात पार पडलेल्या सौंदर्यस्पर्धेत ‘मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट २०२२-२०२३’ हा मानाचा किताब पटकावला होता. इतकंच नव्हे तर ती पॅरिस फॅशन वीकमध्येही झळकली असून तिची निवड सिग्नेचर मॉडेल म्हणून झाली होती. (Siddharth Khirid Wedding)
==========================
==========================
सिद्धार्थच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांसह चाहत्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. याआधी त्यांच्या प्री-वेडिंग फोटोशूटमधील वेस्टर्न लूकनेसुद्धा चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ‘फ्रेशर्स’, ‘मुलगी झाली हो’ आणि ‘राणी मी होणार’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून सिद्धार्थ खिरीड घराघरात पोहोचला. आपल्या सहजसुंदर अभिनयशैलीमुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं असून आता त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील हा नवा टप्पा चाहत्यांसाठीही खास ठरत आहे.