
Prarthana Behre-Nirmiti Sawant : सासू-सुनेची खट्याळ जुगलबंदी!
प्रार्थना बेहरे आणि निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका असणारा ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपट नव्या वर्षांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट आपल्या हटके नावामुळे आणि धमाकेदार टीझरमुळे आधीपासूनच चर्चेत आहे. आता या चित्रपटाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले असून सासू-सुनेच्या नात्यातील टोमणे, नोकझोक, प्रेम आणि मस्तीची मजेशीर बाजू या गाण्यातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.

चित्रपटाचं हे शीर्षक गीत म्हणजे सासू-सुनेच्या रोजच्या नात्यातील गंमतीदार प्रसंगांचे संगीतमय रूप आहे. घराघरांत घडणाऱ्या मिश्किल टोमण्यांपासून खट्याळ तक्रारींपर्यंत आणि त्या मागील आपुलकीपर्यंत सगळ्या भावना या गाण्यात अचूक पकडल्या आहेत. या टायटल ट्रॅकला वैशाली सामंत आणि प्रियांका बर्वे यांचा दमदार आणि उत्साही आवाज लाभला असून त्यांच्या गायकीमुळे गाण्यातील नोकझोक आणि मस्ती अधिक जिवंत वाटते.
================================
================================
गाण्याबद्दल दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, ‘’सासू-सुनेचे नाते हे कायमच रंजक, गंमतीशीर आणि भावनिक असते. ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या गाण्यात आम्ही त्या नात्याची खट्याळ बाजू मजेशीर पद्धतीने मांडली आहे. प्रेक्षकांना हे गाणे नक्कीच आवडेल आणि प्रत्येक मंगळागौर कार्यक्रमात ते वाजेल, याची मला खात्री आहे.” झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. हा धमाल चित्रपट १६ जानेवारी २०२६ पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi