‘शिवा’ मालिकेतून ‘रामभाऊ’ची एक्झिट; आता ‘या’ हिंदी मालिकेत झळकणार !

Pushkar Shrotri च्या “श्श… घाबरायचं नाही” नाटकातून रत्नाकर मतकरींच्या गूढ कथा रंगभूमीवर उलगडणार !
मराठी रंगभूमीवर गूढ साहित्याची एक खास परंपरा आहे आणि त्या परंपरेचं नवीन रूप घेऊन अभिनेता पुष्कर श्रोत्री प्रेक्षकांसमोर येत आहे आपल्या नवीन नाट्यप्रयोगातून ‘श्श… घाबरायचं नाही’. हे नाटक गूढतेचा अनुभव देणारं, पण त्याचवेळी अंतर्मनाला विचारात टाकणारं आहे. “आजच्या काळात मी काय वेगळं करू शकतो?” या प्रश्नातून या संकल्पनेचा जन्म झाला, असं पुष्कर सांगतो.(Pushkar Shrotri Marathi Natak)

आपल्या अभिनय प्रवासात अनेक भिन्न धाटणीची नाटकं केल्यानंतर, आता तो रंगमंचावर साकारतोय रत्नाकर मतकरींच्या गूढ कथांचा नवा आविष्कार. मतकरींचं लेखन म्हणजे केवळ भयकथा नाही, तर त्याच्या पलीकडे जाणाऱ्या माणसाच्या मनाशी साधलेला संवाद आहे – आणि त्या संवादाला रंग, प्रकाश, ध्वनी आणि अभिनयाची साथ मिळून ‘श्श… घाबरायचं नाही’ हे नाट्यसादरीकरण साकारलं गेलं आहे. मतकरी हे नाव मराठी साहित्यविश्वात एक अढळ स्थान असलेलं आहे. त्यांच्या गूढ आणि भयाच्या पलीकडे जाणाऱ्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर माणसाच्या मनात खोलवर रुजलेल्या भावनांशी संवाद साधतात. या कथा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणण्यासाठी, त्या केवळ वाचनापुरत्याच न ठेवता, प्रकाश, ध्वनी, रंग, अभिनय आणि वास्तवाशी भिडणाऱ्या मांडणीद्वारे जिवंत करण्यात आल्या आहेत.

‘श्श… घाबरायचं नाही’ हे दोन वेगळ्या गूढ कथांचं सादरीकरण असून, यामधून प्रेक्षकाला केवळ थरार नव्हे, तर कलात्मक गूढतेचा अनुभव मिळतो. या नाटकामागची निर्मिती ‘बदाम राजा प्रॉडक्शन’ने केली असून, दिग्दर्शनाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे विजय केंकरे यांनी जे याआधी ‘अ परफेक्ट मर्डर’ सारख्या सस्पेन्स नाटकातून प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेले आहेत. पुष्कर म्हणतो, “जगभर सस्पेन्स, थ्रिलर या जॉनरकडे तरुण पिढी आकर्षित होते. मग मराठीत तोच अनुभव का नसायचा? मतकरींच्या भाषेला रंगमंचावर सादर करणं ही माझ्यासाठी संधीही आहे आणि जबाबदारीही. त्या भाषेला पुढच्या पिढीपर्यंत नेणं हे माझं कर्तव्य वाटतं.”(Pushkar Shrotri Marathi Natak)
=============================
=============================
‘श्श… घाबरायचं नाही’ हे नाटक म्हणजे एक सांस्कृतिक सेतू आहे ज्यातून साहित्य, नाट्य, तंत्र आणि भावनांची रेखीव गुंफण होते. हे सादरीकरण प्रेक्षकांना केवळ नाट्याचा अनुभव देत नाही, तर मतकरींच्या शैलीतून एक जिवंत आठवण उभी करतं अशी आठवण जी काळाच्या पलीकडे जाते आणि मनाच्या गूढ कप्प्यांमध्ये घर करते. या नाट्यप्रयोगाचा पहिला प्रयोग बुधवार, ३१ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता, मुंबईच्या प्रतिष्ठित ओपेरा हाऊसमध्ये रंगणार असून, मराठी रंगभूमीवर एक वेगळी, गूढ आणि वैचारिक लाट पुन्हा एकदा उसळणार आहे.