Karishma Kapoor : संजय कपूरची ३० हजार कोटींची प्रोपर्टी कुणाला

Rani Mukherjee :‘आती क्या खंडाला….’ या गाण्याच्या मेकिंगचा भन्नाट किस्सा!
अभिनेता आमिर खान याला सध्याच्या काळातील ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हटले जाते. कारण चित्रपटातील भूमिका कोणतीही असो तो अतिशय समरस होऊन ती साकारत असतो. मग ती रोमँटिक भूमिका असो, ॲक्शन भूमिका असो, इमोशनल भूमिका असो किंवा हिस्टोरिकल भूमिका असो! प्रत्येक भूमिकेमध्ये आमिर खान 100% परफेक्शन देण्याचा प्रयत्न करतो. अलीकडेच त्याचा ‘सितारे जमी पर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि यातील वेगळ्या प्रयोगाचे देखील खूप कौतुक होत आहे. तो उत्तम दिग्दर्शक आहे. सामाजिक प्रश्नाची त्याला चांगली जाण आहे. संवेदनशील पणे प्रश्न हाताळण्याचे कसब आहे. पण तुम्हाला माहिती आहे का याच सोबत आमिर खान चांगला गायक देखील आहे. तो उत्तम नॅरेटर आहे. त्याने गायलेल्या पहिल्याच हिंदी चित्रपट गीताला चक्क फिल्म फेअरच नॉमिनेशन देखील मिळाले होते. पुरस्कार जरी मिळाला नसला तरी या गाण्याची लोकप्रियता आज देखील अबाधित आहे. कोणतं होतं ते गाणं आणि कोणता होता तो चित्रपट?

मुख्य म्हणजे ह्या गाण्याला गाण्यासाठी आमिर खान अजिबात तयार नव्हता. त्याने संगीतकाराकडे एक अट देखील टाकली होती. एकूणच या चित्रपटातील या गाण्याचे मेकिंग ची स्टोरी भन्नाट आहे. १९ जून १९९८ रोजी आमिर खान आणि राणी मुखर्जीचा ‘गुलाम’ हा ॲक्शन सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन विक्रम भट यांनी केले होते. चित्रपटाने डे वन पासूनच वेग पकडला होता आणि हा चित्रपट त्यावर्षीचा बॉक्स ऑफिसवरील सुपरहिट सिनेमा होता. या चित्रपटात आमिर खानने मुंबईच्या एका टपोरी गुंड प्रवृत्तीच्या पण लव्हेबल मुलाची भूमिका केली होती. त्यामुळे त्या सिनेमातील त्याची बॉडी लँग्वेज आणि डायलॉग तसेच लिहिले गेले होते. हा सिनेमा आजही त्यातील रेल्वेच्या थरारक सीनमुळे आठवला जातो. या सीनला देखील फिल्मफेअर चा बेस्ट सीन पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटामध्ये आमिर खान ने एक गाणं गायलं होतं. हे त्याचे पहिलेच सिनेमातील गाणे होते. पण हे गाणं त्याच्याकडून गाऊन घेण्यासाठी संगीतकार जतिन ललित यांना खूप त्याच्या मागे लागावे लागले होते.
================================
हे देखील वाचा : Dil Se.. : सिनेमातील सतरंगी रे… गाणे बनले कसे?
================================
एकदा चित्रपटाच्या शूटला जाताना कारमध्ये आमिर खान, दिग्दर्शक विक्रम भट आणि संगीतकार जतीन ललित हे चालले होते. सिनेमातील गाण्याच्या सिच्युएशन लोकेशन या बद्दल चर्चा चालू होती. सिनेमातील सर्व गाणी रेकॉर्ड झाली होती. कार मध्ये त्यावेळी स्टेअरिंगवर आमिर खान होता. त्याने स्टेअरिंग वर ताल धरत ‘सागर’ चित्रपटातील ‘चेहरा है या चाँद खिला है जुल्फ घनेरी छाव है क्या सागर जैसी आंखो वाली ये तो बता तेरा नाम क्या है…’ हे गाणं गाऊ लागला. अतिशय तल्लीन होवून आमिर खान हे गाणं गात होता. गाडीतले सर्वजण ते दृश्य पाहत होते. त्यावेळी नजरेनेच जतीन यांनी ललित कडे पाहिले आणि मंदस्मित केले आणि त्यांनी ठरवलं की ‘गुलाम’ या चित्रपटात आमिर खान यांच्या कडून गाणं गाऊन घ्यायचं . त्यांनी गीतकार नितीन रायकवार यांना एक फनी वर्ड्स असलेलं गाणं लिहायला सांगितला. आमिर खानची या चित्रपटातील भूमिका त्यांना समजून सांगितली आणि त्याच्या भूमिकेला साजेसे शब्द या गाण्यात यावेत असं त्यांनी सांगितलं.

काही कीवर्ड्स देखील त्यांनी दिले. काही दिवसातच गीतकाराने ते गाणे जतिन ललित यांच्याकडे सोपवले. गाण्याचे टपोरी बोल होते ‘आती क्या खंडाला…’ आमिर खानला ते गाणं दाखवलं त्याला आवडलं. त्याने सहज विचारले ,” हे गाणे आपण कुणाकडून गाऊन घेत आहोत?” त्यावेळेला जतिन आणि ललित म्हणाले,” हे गाणं तुलाच गायचं आहे !” आमिर खान म्हणाला,” अरे यार मै तो बाथरूम सिंगर हू. वैसे तो हर कोई भी बाथरूम सिंगर होता है. मुझे नही गाना. मुझे इस झंझट मे क्यू डालते हो यार? मै गाना वाना नही गाऊंगा!” पण जतिन ललिता यांनी त्याचा पिच्छा पुरवला. दिग्दर्शक विक्रम भट यांनी देखील आमिर खानला,” हे गाणे तूच गायला पाहिजे. आणि तूच चांगले गाऊ शकतोस!” हे पटवून सांगितले.
आता मात्र आमिर खानचा नाईलाज झाला. तो म्हणाला ,” तुम्ही म्हणताय तर ठीक आहे. पण माझी अट आहे. हे माझं पहिलंच गाणे अआहे. गाण्यांमध् फारसे उतार चढाव नाहीत. पण माझ्याकडून तुम्ही परफेक्ट प्रॅक्टिस करून घ्या. त्यानंतरच मी गाणं गाईन. आणि दुसरी महत्वाची गोष्ट. जर गाणं मला आवडलं नाही तर हे गाणं तुम्हाला दुसऱ्या कोणाकडून तरी गाऊन घ्यावे लागेल!” जतिन ललित यांनी दोन्ही अटी मान्य केल्या आणि पुढची दीड महिने आमिर खान रोज या गाण्याची प्रॅक्टिस करण्यासाठी जतीन ललित त्यांच्याकडे जात होता. जेव्हा त्याचं पूर्ण समाधान झालं तेव्हा अलका याद्निक सोबत हे गाणं रेकॉर्ड केले. रेकॉर्डिंगला फक्त दीड तास लागला. सर्वजण खूष झाले या गाण्यातील बिट्स जबरदस्त होते.

त्यामुळे गाणं रेकॉर्ड होतानाच अनेक जण या गाण्याच्या तालावर तालावर नाचत होते. त्यामुळे हे गाणं जबरदस्त हिट होणार याची खात्री त्यांना पहिल्या दिवशी पटली. यानंतर दिग्दर्शक विक्रम भट यांनी या गाण्याची शूटिंग केले. पण हे शूटिंग आमिर खानला अजिबात आवडले नाही त्याने ते शूटिंग कॅन्सल करायला लावले आणि स्वतःच्या मार्गदर्शनाखाली हे गाणं शूट केले. आज आपण सिनेमात जे गाणं बघतो ते आमिर खानने कोरिओग्राफ आणि डिरेक्ट केलेले आहे.
ऐन पावसाळ्यात १९ जून १९९८ या दिवशी गुलाम प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली. लोणावळा खंडाळा हे देशभरातील हॉट टूरीस्ट डेस्टिनेशन ठरले. येथे पर्यटकांची गर्दी वाढू लागली. राणी मुखर्जी ‘खंडाला गर्ल’ म्हणूनच ओळखले जाऊ लागले. या चित्रपटातील संगीतासाठी जतीन ललित यांना फिल्मफेअरच्या नॉमिनेशन मिळाले आणि सर्वात हाईट म्हणजे आमिर खानला देखील ’आती क्या खंडाला…’ या गाण्यासाठी बेस्ट प्लेबॅक सिंगर म्हणून फिल्म फेअरचे नॉमिनेशन मिळाले. अर्थात पारितोषिक मिळाले नाही.( अवार्ड ‘दिल से’ गाण्यासाठी सुख विंदर ला मिळाले.) पण या गाण्याने देशभरातील तरुणाई झूम झूम के नाचले त्या काळातील सर्व कार्यक्रमात गॅदरिंगमध्ये, पार्टीमध्ये, अंताक्षरी मध्ये, पिकनिक मध्ये हे गाणं अगदी मस्ट असायचे यानंतर आमिर खानने अनेक चित्रपटातून गाणी गायली पण त्याच्या पहिल्या गाण्याचा हा एक भन्नाट किस्सा इथेच थांबत नाही.
================================
हे देखील वाचा : अमिताभ आणि जया यांना हनिमूनहून तातडीने का परत यावे लागले?
================================
आमिर खानने आपल्या मुलीच्या इराच्या लग्नात देखील हे गाणे तिच्यासोबत गायले होते. आमिर खानचा ‘लगान’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी गुजरात मध्ये क्रिकेट सामन्याच्या वेळी भरपूर ऑडियन्स/प्रेक्षक पाहिजे होते. तसे त्यांनी गोळा केले. आणि क्रिकेटच्या प्रत्येक विकेटवर, फोर रन वर ऑडियन्सने दंगा करावा अशी अपेक्षा होती पण ऑडियन्स कडून हवा तो प्रतिसाद मिळत नव्हता. म्हणून आमिर खानने प्रेक्षकांना सांगितले,” मी आता माझ्या आवाजात तुम्हाला एक गाणं ऐकवतो तुम्ही त्याच्यावर डान्स करा.” मग त्याने मेगा फोन हातात घेवून ‘आती क्या खंडाला’ हे गाणे गावून दाखवले. प्रेक्षक बेभान होवून गाऊ लागले, नाचू लागले! आमिर खानने हे सर्व वेगळे शूट करून ठेवले. चित्रपटात क्रिकेट मॅच च्या वेळी प्रेक्षक जो दंगा करतात तो क्रिकेट मॅच मधील विकेट आणि फोर सिक्स वर करत नाहीत तर आमिर खानच्या ‘आती क्या खंडाला’ या गाण्यावर करत होते. आमीर ची कल्पकता इथे कामी आली!