दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
रसिका सुनीलची व्हर्सटाईल अदा
हवामानाचा छान सुखद गारवा, आकाश निरभ्र, रस्ता पक्का आणि अतिशय मोकळा, पॉश गाडीने छान वेग घेतलाय, जोडीला छान कंपनी आहे, कंटाळा यावा असे अजिबात काही नाही, खेळकर गप्पा चालल्यात, किस्से घडताहेत आणि अशातच या गाडीतून उतरुन वेगळ्या प्रवासाला कोणी जायचे ठरवले आणि खरोखरच तसे केले आणि आपल्या प्रवासाची दिशा बदलली तर आश्चर्य वाटणारच. का बरं असा निर्णय घेतला असेल? सहप्रवाश्यांनी काही खोडी काढली यावरुन गॉसिप्स होणारच. स्वभाव हो तो. पण ती व्यक्ती जर फोकस्ड असेल, आपण रस्ता बदलला नाही तर चाललेल्या रस्तावरचेच जग दिसत राहिल, सहप्रवाशी तेच असतील, त्यापेक्षा आपल्या व्यक्तिगत वाढीकडे लक्ष देऊयात असा तिने अधिक विस्तृत विचार केला तर त्याच व्यक्तीच्या इतर गुणाना वाव मिळतो, तेही समोर येतात, आत्मविश्वास वाढतो….
रसिका सुनीलबद्दल अगदी तेच झाल्याचे दिसते. ऐकून जरा आश्चर्यच वाटलं का?
झी टीव्हीवरील सर्वाधिक टॉपच्या अशा ‘माझ्या नवराची बायको’ या मालिकेतील ग्लॅमरस आणि लक्षवेधक अशा शनाया या व्यक्तीरेखेशी ती पटकन ऍडजेस्ट झाली. खरं तर ती प्रत्यक्षात शनायापेक्षा वेगळी आहे. पण तिच्या पर्सनालीटीला शनाया मॅच झाली. आजच्या ग्लोबल युगातील युथला आवडती झाली. मालिकेपेक्षा अधिक वेगाने ती ‘स्टार’ झाली. जवळपास ऐंशी टक्के नवीन चेहरे मनोरंजन विश्वात ‘स्टार’ बनण्याचे स्वप्न घेऊनच येतात. उर्वरित वीस टक्के ‘कलेसाठी कला’ अशा माईंडचे म्हणजे काही भूमिका मानसिक समाधानासाठी तर काही भूमिका अर्थार्जनासाठी करतात आणि नेमके त्यातीलच अनेक ‘एका सुपर हिटने स्टार’ बनतात.
रसिका सुनीलला ‘शनाया’ ने ओळख दिली, पण अतिपरिचयादवज्ञा होऊ नये म्हणून की काय तिने ही मालिकाच सोडली आणि थेट अमेरिकेत ती चित्रपट या माध्यमाचे धडे शिकायला गेली. म्हटलं तर हे आश्चर्य. होय नक्कीच! असं कोणी चालत्या गाडीतून उतरते काय? माझ्या मते, यातच तिचा स्वतःवरचा आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन, नवीन काही शिकण्याची वृत्ती आणि चौकट मोडण्याचे धाडस असे सगळेच एकदम दिसते. हे फारच कमी जणांना जमणारे आहे. कारण, नवीन पाऊल कसे पडेल हे सांगता येणारे नसते.
जेथे पावलापावलावर जबरदस्त स्पर्धा आहे, पर्याय आहेत, असूया आहे, निसटते यश आहे, अपयशाची संख्या जास्त आहे अशा मनोरंजन क्षेत्रात तर हे मोठे धाडसच. अमेरिकेतून आल्यावर ‘काही कारणास्तव’ तिने पुन्हा शनाया साकारायला सुरुवात केली तो आता व्यवसायाचा भाग झाला. अर्थात, फिर वो छा गयी. ती व्यक्तिरेखा तिच्यासाठीच जणू निर्माण झाली असे वाटावे.
रसिका सुनीलची नवीन ओळख म्हणजे, तिने गायलेले आणि अभिनय केलेले ‘तुम बिन मोहे’ हे गाणे. हा सूर तिला अमेरिकेत लॉस एन्जलिस येथेच एक प्रकारे सापडला. तिथे तिची ओळख आशुतोष सोहोनी याच्याशी झाली. तोही मेहनती आणि काही नवीन करु इच्छिणारा. (आजच्या युथची खासियत, कुछ अलग करते है यार असा फंडा) त्याने एक चाल रचली होती.
त्याच्याशी रसिकाची ओळख झाल्यावर यावर काही क्रियेटीव्ह करुयात असे दोघांनाही वाटले. रसिकाने शास्त्रीय संगीत व नृत्य यांचे प्रशिक्षण घेतले आहे. पण हा अनुभव तिला नवीन होता. आशुतोषने तिच्या आवाजाची टेस्ट घेतली. ती चांगली वाटली आणि मग शब्द रचले. अर्थात, काही बदल सुचत अथवा घडत हे गाणे आकाराला आले.
रसिकानेच या गाण्याच्या शूटिंगची स्क्रीप्ट लिहिली. कॅमेरामन अनुप कुलकर्णी या मित्राशी तिची भेट झाली आणि मग टीम जमत गेली, आपल्या या गाण्याचे शूटिंग कसे करायचे, प्रॉडक्शन कसे असावे असे सूर सापडत गेले, मिसळत गेले. सकारात्मक दृष्टिकोनाचा हा सुपरिणाम होता. न्यूयॉर्कमधील छान वातावरणात शूटिंग झाले. एकमेकांवरच्या विश्वासातून हे सगळे आकाराला आले. मयूर हरदास यांनी संकलन केले. त्यातही रसिकाने विशेष रुची घेतली.
हे सगळे ती ‘शनायाने दिलेला स्टारडम’ यातून अजिबात करत नव्हती. ती भूमिका पूर्णपणे बाजूला ठेवून ‘एक क्रियेटीव्ह पर्सनालीटी’ या भूमिकेतून तिने हे सगळे केले आणि ते करता करता एन्जॉयही केले. आपण एक चांगले गाणे रसिकांसमोर आणल्याचे रसिकाला आणि आशुतोषला समाधान आहे. भविष्यात ते कधी एकत्रपणे तर कधी स्वतंत्रपणे असे काही क्रियेटीव्ह गोष्ट नक्कीच करतील.
रसिका तर आणखी एक गाणे गायलीय. त्याचा व्हिडिओ वगैरे आता नवीन वर्षात. ती नवीन काही करु इच्छितेय हे जास्त महत्वाचे आहे. समीर पाटील दिग्दर्शित ‘पोस्टर बॉईज’ (२०१४) मध्ये तिने एक ठसकेबाज लावणी नृत्य साकारले तेव्हा पहिल्यांदा तिच्याशी मोबाईलवर बोलणे झाले. तेव्हा अर्थात तिचा जाणवलेला नवखेपणा अगदी स्वाभाविक होता.
तेव्हा ‘मुलाखत देण्याचा फारसा अनुभव नसल्याने’ बहुदा तिने जुजबी उत्तरे दिली. या चित्रपटाच्या परिक्षणात तिच्या या फक्कडबाज लावणीची दखल घेतल्याचे तिने आवर्जून सोशल मिडियात पोस्ट केले. याला व्यावसायिकता म्हणतात. त्यानंतर ती अशाच ‘एका गाण्यापुरत्या’ भूमिकेत अडकणार की काय असा प्रश्न होता. ती मनोरंजन विश्वात आली तो अगदी अलीकडचा आणि अनेक पर्याय असल्याचा काळ आहे.
एकाच वेळेस मराठी (जमलचं तर, हिंदी तर झालेच पण अगदी दक्षिणेकडील प्रादेशिक) चित्रपट, मालिका, रियॅलिटी शो, धमाकेदार इव्हेन्टस, जाहिरात, म्युझिक अल्बम, शॉर्ट फिल्म, वेबसिरिज, ओटीटी प्लॅटफॉर्म अशा कशातही काम करायची संधी आहे. ते तुमची इच्छा, सातत्य, मेहनत आणि व्यावसायिकता यावर अवलंबून आहे. पण तेवढीच दमछाक करणारी स्पर्धाही आहे. अशा वेळी दृश्य माध्यमाचे शिक्षण असेल आणि यशाची घाई नसेल तर मार्ग आपोआप सापडतो.
रसिका अमेरिकेत गेली, तेथे या माध्यमाचे शिक्षण घेत असताना तिने सात आठ शॉर्ट फिल्ममध्ये भूमिका केल्या. त्यातील एकाचा काही भाग इन्स्टाग्रामवर शेअर केला. इतकेच नव्हे तर तिने तेथे ओपन वॉटर स्कूबा डायव्हर या साहसी खेळातही भाग घेतला. त्याचे प्रमाणपत्र मिळवले त्याचीही येथे बातमी व्हायला हवी होतीच. कारण, हे तिने काही वेगळे केले. धाडसाने आणि आवडीने केले. ती मराठी बीग बॉसमध्ये नक्कीच असेल असे ती अमेरिकेत असताना इकडे बातमी फिरत होती याचाच अर्थ तिचा ‘न्यूज व्हॅल्यू’ आहे. कदाचित हे खुद्द तिच्या बहुतेक लक्षात आले नसावे.
हे हि वाचा : अमृता खानविलकर…. हिंदीचं ग्लॅमर, मराठी ठसका
अधूनमधून ती एकाद्या मराठी चित्रपटात छोट्या छोट्या भूमिकेत दिसते. (बसस्टॉप, गर्लफ्रेन्ड इत्यादी). मुख्य नायिका साकारण्याचे टॅलेंट, ग्लॅमर, लोकप्रियता आणि अँप्रोच तिच्याकडे निश्चित आहे हे अजून पटकथा लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक यांच्या लक्षात आलेले दिसत नाही. ‘छोट्या पडद्यावरची स्टार’ अशा दृष्टीनेच तिच्याकडे पाहिलं जात असावे. खरं तर आज हिंदीत खूप विविधता दिसतेय, विविध प्रकारच्या थीमवर चित्रपट निर्माण होत आहेत, आणि तेथे छोट्या भोमिकेतही स्पार्क दाखवता येतो. अर्थात, हिंदीत ती नायिका बनली तर उत्तमच आहे. पण ते तिचे ध्येय नसेल तरी काही गैर नाही. काही तरी क्रियेटीव्ह काम करावे असे तिला वाटत असल्याने ती गायन, स्क्रीप्टींग, दिग्दर्शन यात छान रमेल आणि त्यात तिच्या गुणवत्तेची विविधता दिसेल हे नक्कीच. गुणवत्ताच तर महत्वाची असते.
आज देशी विदेशी ग्लॅमरस ड्रेसमध्ये पेज थ्री पार्ट्यात लक्षवेधक ठरणे मराठी मनोरंजन क्षेत्रात छान रुळलयं. रसिका सुनीलही झी तसेच गर्लफ्रेन्डच्या पार्टीत अशी गुड लूक छान प्रेझेंटेबल रुपात लक्षवेधक ठरली. तिच्यावर फ्लॅश उडाले. फिल्मी पार्टीत अस्सेच असावे लागते हा अलिखित नियमच आहे जणू. पण रसिका एक व्यक्ती म्हणून जास्त जागरूक आहे, यश अथवा लोकप्रियतेत हरखून वा हरवून जाणारी नाही हे तिच्या छोट्या छोट्या भेटीत लक्षात येते.
‘झी’ ने तिला आपल्या मालिकेच्या माध्यमातून घराघरात नेले, तिच्या फॅन्स आणि फॉलोवर्सची संख्या अगणित वाढली, पण त्याच मोहात ती अडकलेली नाही हाच तिचा गुण तिला खूपच पुढे घेऊन जाईल. मध्यंतरी तिने आपल्या फिटनेस फंडा दर्शवणारे काही फोटो सोशल मिडियात पोस्ट केले, ते काही प्रमाणात निश्चित सेन्सूअस होते पण त्याकडे अनेकांनी ‘चुकीच्या दिशेने’ पाहिले. वाह्यात कॉमेंट्स केल्या. आपण ग्लोबल युगात आहोत याचा त्यांना विसर पडला. अशा वेळी कोणताही संवेदनशील कलाकार नाराज होणारच.
रसिका सुनील अशा कोणत्याही एकाच गोष्टीत फार काळ अडकणारी नाही असे माझे निरीक्षण आहे. तिचा कल नवीन काय शिकता येईल, ते करताना नवीन माणसेही भेटतात, त्यांच्याकडून काही ना काही नक्कीच शिकता येईल याकडे आहे आणि त्यातूनच तिचे भवितव्य उज्ज्वल आहे. ‘तुम बिन मोहे’ ला भरभरून शुभेच्छा!