Bigg Boss Marathi 6 : तन्वी कोलतेने सागर कारंडेला ‘कॉमेडी’वरून

Rekha- नवीन निश्चलच्या ‘झोरो’ची पन्नाशी
आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला ‘सुपर हिरो’च्या साहसी गोष्टी मोबाईल, लॅपटॉप, मॉल येथे सहज पाहता येताहेत. जगभरातील अनेक भाषेतील ‘सुपर हिरो’ आणि त्यांचे भन्नाट, बेधडक असे व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून थरारक आणि मनोरंजक असलेल्या गोष्टी पाह्यला मिळताहेत. त्यापासून शालेय वयातील मुलांना दूर ठेवणं अथवा ते त्यांच्या जास्त आहारी न जाणे पाहणे अत्यावश्यक आहे….
पन्नास वर्षांपूर्वी मात्र असे ‘सुपर हिरो’ चित्राच्या माध्यमातून साकारलेल्या पुस्तकात अथवा मसालेदार मनोरंजक चित्रपटात पाहायला मिळत. रुपेरी पडद्यावरील ‘सुपर हिरो’ हा अंगभर काळा अथवा निळा पोषाख घालून आणि हाती तलवार अथवा असेच एखादं शस्त्र घेऊन पराक्रम करीत असे. खलप्रवृत्तीवर हल्ला चढवणे,गरीबांना न्याय देणं, नायिकेचे संरक्षण करणे, तिला आपलेसे करणे अंशी त्याची सर्वसाधारण कर्तव्ये. तो राजघराण्यातील असेल तर त्याचा असे वेषांतर करून सगळी साहसे करावी लागत. अधूनमधून हा ‘सुपर हिरो’ काही चमत्कारयुक्त गोष्टीही करीत असे. पन्नास वर्षांपूर्वीच्या तांत्रिक सुविधा आणि सेन्सॉरची कात्री यातून जसे जमेल तसे आणि तेवढं मनोरंजन असे चित्रपट करीत आणि सर्वसामान्य स्वप्नाळू आशावादी प्रेक्षकही फार फार अपेक्षा न ठेवता समजायला अगदी सोपा पेपर असलेले असे चित्रपट एन्जॉय करीत.
================================
================================
असाच एक ‘सुपर हिरो’ वाला देमार घेमार ढिश्यूम ढिश्यूम मारधाड ऍक्शन चित्रपट ‘झोरो’ (सेन्सॉर संमत डिसेंबर १९७५ आणि मुंबईत प्रदर्शित १६ जानेवारी १९७६. मेन थिएटर सुपर) . या चित्रपटाच्या प्रदर्शनास पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. राम दयाल निर्मित आणि शिबू मित्रा दिग्दर्शित हा चित्रपट साधारण पातळीवर राहिला. असे मध्यम दर्जाचे चित्रपट त्या काळात गल्ला पेटीवर साधारण यश प्राप्त करण्यात यशस्वी ठरत. याचे कारण बी ( छोटी शहरे, तालुक्याची ठिकाणी)आणि सी (खेड्यापाड्यांतील थियेटर्स) केन्द्र आणि मॅटीनी शोला ( म्हणजे एकदा प्रदर्शित झालेला चित्रपट काही वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणे) असे मनोरंजक चित्रपट चांगला स्कोअर करीत… चित्रपट हे तळागाळातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेले माध्यम आणि व्यवसाय.

‘झोरो’ च्या रुपात नवीन निश्चल. त्याची नायिका रेखा. यांच्या जोडीला डॅनी डेन्झोप्पा, बिंदू, अरुणा इराणी, ओम शिवपुरी, उर्मिला भट्ट, मुक्री, मा. भगवान, असित सेन, सुधीर, इम्तियाज यांच्या प्रमुख भूमिका. तर वर्मा मलिक यांच्या गीतांना कल्याणजी आनंदजी यांचे संगीत. नवीन निश्चल आणि रेखा या जोडीच्या पहिलाच चित्रपट मोहन सैगल निर्मित आणि दिग्दर्शित ‘सावन भादो’ (१९७०) सुपरहिट ठरला आणि पहिलाच चित्रपट रौप्य महोत्सवी ठरल्याने चित्रपटसृष्टी, चित्रपट रसिक आणि मिडिया यात दोघेही स्टार होण्यास वेळ लागला नाही हीच तर ‘सिनेमाच्या यशाची गोष्ट आहे’.
================================
हे देखील वाचा : B Merwan चे सिनेमावाल्याशी नाते….
================================
नवीन निश्चल आणि रेखा जोडीच्या एस. के. कपूर निर्मित आणि चांद दिग्दर्शित ‘धर्मा’, मोहन सैगल निर्मित आणि दिग्दर्शित ‘वो मै नहीं’ या चित्रपटांना चांगले यश मिळाले. ‘वो मैं नहीं’ हा चित्रपट आचार्य अत्रे लिखित ‘तो मी नव्हेच’ या नाटकावर आधारित चित्रपट. पण नाट्य हरवलेला चित्रपट. या जोडीतील रेखा स्टार झाली आणि आजही स्टार आहे. बासू भट्टाचार्य दिग्दर्शित ‘आस्था’ (१९९७) मध्ये थीमनुसार असलेल्या एका प्रणय दृश्यात नवीन निश्चल असावा ही रेखाची मागणी असल्याचे गॉसिप्स फार गाजले.
ऐंशीच्या दशकात नवीन निश्चलने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आणि ‘जान से प्यारा’ च्या मुहूर्तासह पहिले चित्रीकरण सत्रही पार पडले. नवीन निश्चलची दुहेरी भूमिका असलेल्या या चित्रपटात रेखा आणि रिना रॉय नायिका होत्या. दुर्दैवाने पहिल्या चित्रीकरण सत्रानंतर हा चित्रपट डब्यात गेला तो कायमचा. पडद्यावर येऊ न शकलेले चित्रपट हादेखील एक रंजक विषय. नवीन निश्चलचे ‘झोरो’ रुप आज यू ट्यूबवर पाह्यला मिळेल, पण आजच्या ‘ युगंधर’ झंझावातात पन्नास वर्षांपूर्वीचा हा मसाला पिक्चर एकदा पहा तर… चित्रपटाच्या वाटचालीत ‘सुपर हिरो’ हादेखील एक मनोरंजनाचा खजाना होता.