‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
ऋषी कपूर यांच्या आयुष्यातील या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
‘कपूर खानदान’ म्हणजे बॉलीवूडचेच घराणे! अशा घराण्यातील राज कपूर यांचे पुत्र म्हणजे ऋषी कपूर. पण ‘आयत्या घरात घरोबा’ या चौकटीत ते कधीच अडकले नाहीत. ‘मेरा नाम जोकर’ या आपल्या पहिल्यावहिल्या गाजलेल्या चित्रपटातून चक्क आपल्या वडिलांचं लहानपण अभिनयातून रेखाटणारा हा गोंडस मुलगा मोठा होऊन घराण्याचं नाव मोठं करणार, हे तर पक्कं झालं होतं. बॉलीवूड जगतातील आपल्या भविष्याची झलकच त्यांनी अभिनयातून दाखवून दिली होती. या भूमिकेबद्दल उत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कारही त्यांनी पटकावला!
मेरा नाम जोकर या चित्रपटाआधी ‘श्री ४२०’ या चित्रपटातदेखील त्यांनी बालकलाकाराची भूमिका केली. पण शूटिंगसाठी या छोट्या ऋषी कपूरला तयार करताना सर्वांच्या नाकीनऊ आले. मग नर्गिस या अभिनेत्रीने चॉकलेटचे आमिष दाखवून निळ्या डोळ्यांच्या लोभसवाण्या लहानग्या ऋषीला तयार केले आणि ‘प्यार हुआ इकरार हुआ’ या गाण्यात छोट्या ऋषीची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
अभिनेता म्हणून ऋषी कपूर यांचा गाजलेला चित्रपट म्हणजे ‘बॉबी’. या चित्रपटात ऋषी कपूर यांची एन्ट्री होण्याची अनेक कारणे होती. राज कपूर यांची अचानक खालावलेली आर्थिक परिस्थिती, मोठ्या अभिनेत्याचे न परवडणारे बजेट आणि हाती येणारे निराशाजनक परतावे.. या सगळ्यावर मात करत असताना राज कपूर यांच्या डोक्यात तरुण प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी एक रोमँटिक चित्रपट बनवण्याची कल्पना आली आणि आपल्या अभिनेत्या मुलालाच त्यांनी हिरोच्या भूमिकेसाठी निवडले. बॉबीच्या भरघोस यशानंतर ९० हून अधिक चित्रपटांमध्ये ऋषी कपूर यांनी रोमँटिक भूमिका केल्या…आणि ते तरुणाईचे ‘चॉकलेट हीरो’ झाले.
नीतू सिंग या अभिनेत्रीसोबत ऋषी कपूर यांनी बर्याच चित्रपटात काम केले. या जोडीला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतले. काही वर्षांनी या अभिनेत्याने स्वतःला रोमँटिक चौकटीतून बाहेर काढत विविध प्रकारच्या भूमिका केल्या आणि आपल्या अभिनयाला अष्टपैलूत्व मिळवून दिले. १९७३ पासून २००० पर्यंत त्यांनी तब्बल ९२ रोमँटिक चित्रपट केले. त्यांच्यासोबत १२ चित्रपटांत एकत्र काम करणारी अभिनेत्री नीतू सिंग यांच्यासोबत त्यांनी प्रेमविवाह केला. ‘जहरीला इन्सान’ या ऋषी कपूर यांच्यासोबतच्या पहिल्या चित्रपटाने नीतू सिंग यांना आयुष्याचा जोडीदार दिला!
काही कालावधीनंतर ऋषी कपूर यांनी सहाय्यक भूमिका स्वीकारायला आणि साकारायला सुरुवात केली. नमस्ते लंडन मधील वडिल, औरंगजेब मधील लाचखाऊ पोलीस अधिकारी, हाउसफुल टू मधील विनोदी पात्र, अग्निपथ मधील रौफ लाला अशा अनेकविध भूमिकांतून त्यांच्या अभिनयाचे वैविध्य दिसून आले.
कामाच्या व्यापात कुटुंबासाठी वेळ काढणे आपल्यालाही कठीण जाते. पण अभिनय आणि वैयक्तिक आयुष्यातील समतोल कसा साधायचा, हे ऋषी कपूर यांना चांगलेच अवगत होते. त्यांनी सायंकाळी सहानंतर कधीच शूटिंग केले नाही. रुपेरी पडद्यावरील अभिनेता, पती आणि बाबा या तिहेरी भूमिका त्यांनी हळुवारपणे हाताळल्या.
अशा या एकेकाळच्या ‘लवर बॉय’ असणाऱ्या कपूर घराण्यातील ताऱ्याची प्राणज्योत २०२० च्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशीच मालवली. २०२० ने दिलेला हाही एक दुःखद धक्का!
‘बचना ए हसीनो’ म्हणत तेव्हाच्या आणि आजच्या तरुणाईवरही राज्य करणाऱ्या या अष्टपैलू अभिनेत्याला जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन!