महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
रोटी कपडा और मकानला ५० वर्ष पूर्ण
मनोज कुमार (Manoj Kumar)च्या अभिनयावर दिलीप कुमारचा प्रभाव आहे, यात आश्चर्य नाही. दिलीप कुमार अभिनयाचे विद्यापीठ असल्यानेच ते स्वाभाविकच. (अहो, त्याने दिलीप कुमारची कायमच नक्कल केली असे कोणी पटकन तावातावाने बोलेलही), पण त्याच्या दिग्दर्शनातील चित्रपटातील दोन गोष्टी कायमच महत्वाच्या. त्याने आपल्या चित्रपटातून जपलेले सामाजिक व देशभक्तीचे भान (कोणी त्याला डोस म्हणतात) आणि त्याचे गाण्याचे बेहतरीन टेकिंग. गाण्याचे व्यक्तिमत्व तो पडदाभर खुलवणार हे हुकमी. (सुभाष घईने कळत नकळतपणे मनोजकुमारचीच गाण्याच्या टेकिंगमध्ये काॅपी केली असे म्हणणारा चित्रपट रसिकांचा एक वर्ग आहे.)
आता हेच गाणे बघा, सर्वकालीन स्थिर असलेली एकच गोष्ट म्हणजे, महागाई. टिच्चून टिकून आहे. कमी होण्याचे नावच घेत नाही आणि या सामाजिक, आर्थिक समस्येचे, वस्तुस्थितीचे मनोज कुमारच्या चित्रपटातून प्रतिबिंब पडले नसते तर आश्चर्यच. तुम्हालाही माहीत आहे, महागाईची झळ जेव्हा वाढते तेव्हा जनसामान्यांना हमखास आठवणारे गाणे, बाकी कुछ बचा तो महंगाई मार गई, महंगाई मार गई…
मनोज कुमार (Manoj Kumar)च्या ‘रोटी कपडा और मकान‘ (प्रदर्शन १८ ऑक्टोबर १९७४) या चित्रपटातील हे आजही लोकप्रिय असलेले गाणे आहे. नि प्रत्येक काळात हे गाणे हमखास आठवते अशीच महागाईची स्थिर गोष्ट आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनास याच आठवड्यात पन्नास वर्षे पूर्ण झाली. (१८ ऑक्टोबर १९७४ रोजी मनमोहन देसाई दिग्दर्शित “रोटी” आणि नरेंद्र बेदी दिग्दर्शित “बेनाम” हे देखील रिलीज झाले. शुक्रवार असावा तर असा.) मनोज कुमार या चित्रपटाचा लेखक, निर्माता, दिग्दर्शक, संकलक आणि नायक आहे. त्याची ती खासियतच. बहुत कुछ मनोज कुमार.
सत्तरच्या दशकाच्या पूर्वार्धात खूपच मोठ्याच प्रमाणावर देशभरात महागाई, साठेबाजी, भेसळीचे धान्य, राॅकेलला भली मोठी रांग, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई याबाबत समाजात खूपच मोठ्या प्रमाणावर असंतोष होता. राग धुमसत होता. काही राजकीय पक्ष आंदोलन करीत. (आता तसे तीव्र आंदोलन का करीत नाहीत असा प्रश्न पडतोय. पण उत्तर नाही. तो विषयच वेगळा. आजच्या ग्लोबल युगातील नवश्रीमंत व उच्चभ्रू वर्गाला महागाई परवडतही असेल. काय सांगावे?) हे सगळे त्या काळातील चित्रपटातून येणे स्वाभाविक होतेच.
मनोज कुमार (Manoj Kumar) अशा गोष्टीत भरत असलेला फिल्मी मनोरंजनाचा रंग चित्रपट रसिकांना आवडत होता. (गोष्टीपेक्षा ते महत्वाचे असे) जणू आपल्याच मनातील भावना तो पडद्यावर साकारतोय अशी जनसामान्यांची प्रतिक्रिया. म्हणून तर त्याचे अनेक चित्रपट सुपर हिट ठरले आणि आजही ते चित्रपट (उपकार, पूरब और पश्चिम, शोर, रोटी कपडा और मकान, क्रांती) त्यातील गाणी आणि देशभक्तीचे संवाद यासाठी चर्चेत असतात. अनेकांच्या आठवणीत आहेत.
“रोटी कपडा और मकान” या नावातच जीवनावश्यक गोष्टी आहेत. (त्यात कालांतराने मोबाईल, ओटाटी, वीकेंड पिकनिक वगैरे आले). त्यामुळेच हे नाव चित्रपट रसिकांना लगेचच अपिल झाले. आपलेसे वाटले. चित्रपटाच्या नावात बरेच काही असते असे म्हणूनच ते विचारपूर्वक ठेवा असे म्हणतात ते उगीच नाही. या चित्रपटात मनोज कुमार (Manoj Kumar), शशी कपूर, झीनत अमान, अमिताभ बच्चन, मौशमी चटर्जी, प्रेमनाथ, कामिनी कौशल, धीरज कुमार, अरुणा इराणी, सुलोचनादीदी, मनमोहन, मीना टी., कृष्ण धवन, रजा मुराद, राज मेहरा, मनमोहन, दर्शनलाल, ब्रह्म भारद्वाज, सी. एस. दुबे, इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. सी. एस. दुबे या चित्रपटाने गाजले. याच कारण, त्यांनी साकारलेला स्त्रीलंपट. (तोच तो वाण्याच्या गोडाऊनमध्ये मौशमीवर जबरदस्तीचा प्रयत्न करतो. हा प्रसंग खूपच वादग्रस्त ठरला.)
या चित्रपटातील मै ना भूलूंगा, अरे हाय हाय यह मजबूरी (झीनत अमान मुसळधार पावसात चिंब चिंब झाली), और नहीं बस और नही, पंडितजी मेरे मरने के बाद अशी सगळीच गाणी आजही लोकप्रिय. महंगाई मार गयी… जास्तच हिट आहे. कारण त्यात फार मोठे सामाजिक भान आहे.
वर्मा मलिक यांच्या या गाण्याला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत आहे. हे गाणे लता मंगेशकर, मुकेश, नरेंद्र चंचल आणि जानी बाबू कव्वाल यांनी गायले आहे. विशेष म्हणजे ८ मिनिटे आणि बावन्न सेकंद इतके मोठे हे गाणे असूनही ते पुन्हा पुन्हा पहावेसे आणि ऐकावेसे वाटते. मै ना भूलूंगा संतोष आनंदचे. मनोज कुमार (Manoj Kumar) आपल्या चित्रपटातील गाण्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रभावी अशा रुपेरी पडद्यावरील सादरीकरणाबाबत ओळखला जातो. ( पूर्वीच्या चित्रपटातून शिकण्यासारखे बरेच काही आहे हे अशा गोष्टीतही दिसतेय.)
…. महागाईची बातमी आपल्या जगण्याचा जणू भाग झाले आहे आणि त्यासह हमखास गाणे आठवते, महंगाई मार गई…
मनोजकुमारची मला सर्वात आवडती गोष्ट म्हणजे, त्याचे गाण्याचे अतिशय जबरा आणि दृश्य माध्यमाचा उत्तम वापर केलेले टेकिंग, शब्द सौंदर्य व दृश्य सौंदर्याचा रुपेरी मिलाप.
मेरे देश की धरती, सोना उगले, उगले हीरे मोती ( उपकार)
पूरवा सुहानी आयी है, पुरवा ( पूरब और पश्चिम)
भारत का रहने वाला हू, भारत की बात बताता हू ( पूरब और पश्चिम)
एक प्यार का नगमा है … जिंदगी और कुछ भी नही (शोर)
पानी रे पानी तेरा रंग कैसा (शोर)
….. ही त्याच्या दिग्दर्शनातील चित्रपटातील त्याचा सर्वोत्तम टच असलेली “टाॅप फाईव्ह” गाणी.
ही ‘हिट लिस्ट’ आणखीन वाढवता येईल.
आपल्याकडील हिंदी असो, मराठी असो वा कोणत्याही प्रादेशिक परिवहन चित्रपट असो. गीत संगीत नृत्य म्हणूनच महत्त्वपूर्ण. ते त्या चित्रपटाचे अस्तित्व कायमच दाखवते.
===============
हे देखील वाचा : यह पब्लिक है…यह सब जानती है
===============
‘अभिनेता’ मनोज कुमार (Manoj Kumar)चे वेगळे मूल्यमापन होते. देशभक्त नायक भारत कुमार अशी प्रतिमा असा तो ग्राफ आहे. त्या काळातील आघाडीच्या अनेक दिग्दर्शकांच्या चित्रपटात तो आहे अथवा होता. त्याच्याबद्दलच्या व्याख्येत चाहत्यांकडून आत्मियता, कौतुक आणि टीकाकारांकडून काहीशी हेटाळणी. तरी यशाचे गमक त्याच देशभक्त नायक याच प्रतिमेत आहे.
त्याच्या दिग्दर्शनातील पहिला चित्रपट ‘उपकार‘ (१९६७), नंतरचा ‘पूरब और पश्चिम’ ( १९६९) यातील त्याच्या व्यक्तीरेखेचे नाव ‘भारत’ असल्याचे रसिकांना आवडले आणि तीच त्याची ओळख व इमेज झाली. म्हटलं तर योगायोग. पण पथ्यावर पडलेला. ही इमेज त्याला केवल कश्यप निर्मित व एस. राम शर्मा दिग्दर्शित ‘शहीद‘ ( १९६५)च्या यशाने आणि त्यात त्याने साकारलेल्या भगत सिंग या व्यक्तिरेखेला रसिकांची दाद मिळाली यातून तयार झाली.
मनोज कुमार (Manoj Kumar)च्या एकूणच दिग्दर्शनाचा पट मांडताना ‘शोर’ बराच वेगळा आणि त्याचा खास टच असलेला चित्रपट.
विशेष म्हणजे, उपकार, पूरब और पश्चिम, शोर व रोटी कपडा और मकान या चित्रपटांनी मुंबईत ऑपेरा हाऊसला ज्युबिली हिट यश संपादन केले..
‘शोर‘ची थीम मनोज कुमार (Manoj Kumar)च्या देशभक्तीच्या हुकमी फाॅर्म्युल्यापेक्षा निश्चित वेगळी. ‘रोटी कपडा और मकान’पासून मनोज कुमार फिल्मी झाला. पब्लिकला अमूकतमूक आवडेल असा समज करुन घेऊन देशभक्तीपर संवाद वगैरेवर भर देऊ लागला. त्याचा ‘क्रांती‘ ( १९८१) चक्क सलिम जावेदची पटकथा व संवाद असलेला पिरियड सिनेमा. काही प्रसंग हास्यास्पद. सलिम जावेदकडून हा मागणी तसाच पुरवठा. मनोज कुमारच्या भारतकुमार प्रतिमेवर प्रेम असलेल्या त्याच्या हुकमी क्राऊडने पिक्चर हिट केले आणि एकदा जोरात सुरु असलेला चित्रपट मग बरेच आठवडे चालतच राहतो. मुंबईत मेन थिएटर अप्सरामध्ये पन्नास आठवड्यांचा भारी मुक्काम केला, बरं का?
मनोज कुमार (Manoj Kumar) यानंतर आपल्याच देशभक्त नायक या प्रतिमेत अडकला आणि थीमपेक्षा हुकमी दृश्ये (नायिका पावसात चिंब भिजणे, एकादा बलात्कार वगैरे) यात गडबडला. याचा परिणाम म्हणजे, त्याच्या दिग्दर्शनातील ‘क्लर्क‘ (१९८९), ‘जयहिंद‘ (१९९६) दणकून आपटले. मला आठवतय, ‘जयहिंद’च्या कमालीस्तान स्टुडिओतील शूटिंग रिपोर्टीसाठी आम्हा काही सिनेपत्रकाराना सेटवर बोलावले असता मनिषा कोईरालाची बराच काळ वाट पाहून मनोज कुमार कातावला होता. असे अनेक दिवस झाल्याने त्याने तेव्हाच ‘पुरे झाले दिग्दर्शन’ असे ठरवले.
गाण्याचे व्यक्तिमत्व पडद्यावर खुलवणे हे त्याच्या यशस्वी दिग्दर्शनातील सर्वात मोठे वैशिष्ट्य. ‘शोर‘मधील संतोष आनंद यांनी लिहिलेली एक प्यार का नगमा है (पार्श्वगायक लता मंगेशकर व मुकेश), इंद्रजितसिंग तुलसी यांनी लिहिलेली जीवन चलने का नाम (मन्ना डे, महेंद्र कपूर व श्यामा चित्तर), पानी रे पानी तेरा रंग कैसा (लता मंगेशकर व मुकेश), वर्मा मलिक लिखित शहनाई बजे ना बजे ( लता मंगेशकर) ही सगळी गाणी सहज ओठांवर येतात आणि गुणगुणत असताना त्यांचे पडद्यावरचे सादरीकरण डोळ्यासमोर येतेच हे मनोज कुमार (Manoj Kumar)च्या दिग्दर्शन व संकलनाचे यश आहे. (मनोजकुमारला शोर चित्रपटासाठी संकलनाचा फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाला.)
===============
हे देखील वाचा : सुभाष घई नायक, सहनायक
===============
विशेष म्हणजे, पहिल्या दोन चित्रपटाना (उपकार आणि पूरब और पश्चिम) कल्याणजी आनंदजी यांचे संगीत असूनही आणि गाणी आजही लोकप्रिय असूनही ‘शोर’साठी मनोज कुमार (Manoj Kumar)ने लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची निवड केली. त्यांनीही कम्माल केली. सोपी चाल हे त्यांचे वैशिष्ट्य. विशेष म्हणजे पानी रे पानी, जीवन चलने का नाम, एक प्यार का नगमा अशा तीन गाण्यात आयुष्याचे तत्वज्ञान आहे आणि ते सोप्या शब्दात व साध्या चालीत आले आहे आणि उपकार, शोर, रोटी कपडा और मकान हे चित्रपट पन्नास पंचावन्न वर्षांनंतरही आजचे चित्रपट वाटताहेत तर मग आणखीन काय हवे… असे अनेक चित्रपट थिएटरमधून उतरले तरी रसिकांच्या मनात कायमचे घर करतात.
रोटी कपडा और मकानच्या वेळेस चंद्रा बारोट मनोज कुमार (Manoj Kumar)चा सहाय्यक दिग्दर्शक होता आणि छायाचित्रणकार होते नरीमन इराणी आणि या चित्रपटात अमिताभ बच्चनचीही भूमिका असल्याचे आपणास माहित आहेच. याच चित्रपटाच्या निर्मितीच्या काळात “डाॅन” च्या निर्मितीची मुळे रुजली….एक चित्रपट घडत असतानाच त्यात अशा अनेक गोष्टीही आकार घेत असतात.