‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
RRR… राजामौलींचा नवा भव्य चित्रपट!
रौद्रम रणम रुधिरम… म्हणजेच RRR… हा आहे एसएस राजामौली यांचा आगामी भव्यदिव्य चित्रपट. राजामौली म्हणजेच बाहुबली या भव्य आणि बॉक्स ऑफीसवर सूपरडूपर हिट झालेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक. अतिभव्यतेचं वेड असलेल्या या दिग्दर्शकाच्या आगामी RRR या चित्रपटाचं बजेट आहे तब्बल 450 कोटींचं. बजेट असं भारी असल्यावर त्यातील प्रत्येक गोष्टच खास असणार हे नक्की. चित्रपटात 1920 च्या दशकातील कथा मांडण्यात आली आहे. दोन आदिवासी प्रमुख आणि ब्रिटीश राजवटीला विरोध असं त्याचं स्वरुप असेल.
याा चित्रपटाची स्टारकास्टही तगडी आहे. एन. टी. रामराव ज्युनियर (N. T. Rama Rao Jr.) आणि राम चरण (Ram Charan) हे दोन दाक्षिणात्य सुपरस्टार यात असून आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अजय देवगण (Ajay Devgan) हे बॉलिवूड स्टार RRR च्या निमित्तानं पहिल्यादांच दाक्षिणात्य चित्रपटात काम करणार आहेत. 13 ऑक्टोबर रोजी मोठ्या पडद्यावर RRR हिंदी, तामिळ, कन्नड, मल्याळम सह दहा भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित करण्याचा मेगा प्लॅन आहे. त्यामुळे बाहुबली नंतर येणा-या राजामौलींच्या या भव्य चित्रपटाकडे आता त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
राजामौली यांच्या RRR ची सोशल मिडीयावर चर्चा आलिया भट्टच्या वाढदिवसापासून सुरु झाली. आलिया या चित्रपटात सितेच्या भुमिकेत दिसणार आहे. तिनं तिचा या भूमिकेतला लूक शेअर करुन RRR मधील आपला सहभाग स्पष्ट केला. दाक्षिणात्य चित्रपटात आणि तेही राजामौलींसारख्या (S. S. Rajamouli) दिग्गज दिग्दर्शकाबरोबर चित्रपट करायला मिळाल्यामुळे तिनं आनंद व्यक्त केला. त्यानंतर काही दिवसांनी सूपरस्टार राम चरण यांनी आपला फोटो सोशल मिडीयावर शेअर केला. हाती धनुष्य आणि गळ्यात रुद्राक्षांच्या माळा धारण केलेला राम चरणचा लूक त्याच्या चाहत्यांना भावलाच पण त्यासोबच RRR च्या प्रदर्शनाबाबत उत्सुकताही निर्माण झाली. शौर्य, सन्मान, प्रामाणिकपणा, एक व्यक्ती तो या सर्वांची व्याख्या सांगेल. ही भूमिका साकारायला मिळणं हे माझं भाग्य आहे असं ट्वीटही रामचरण यांनी आपल्या लूकसोबत केलं, त्यामुळे राम चरण प्रभू रामाची भूमिका साकारत आहे की अन्य कोणाची अशी उत्सुकताही वाढली.
भारतातील ब्रिटीश राजवटीमध्ये झालेले अत्याचार, त्याविरुद्ध उभे ठाकलेले दोन आदिवासी नेते आणि निजामाबरेबर झालेला संघर्ष अशी RRR ची कथा आहे. यामध्ये अल्लूरी सीता रामराजू आणि कोमाराम भीम या दोन योद्ध्यांची भूमिका राम चरण आणि एन. टी. रामराव ज्युनियर हे दोन दाक्षिणात्य सुपरस्टार करत आहेत. तसेच समुद्रिकाणी, स्पंदन चतुर्वेदी, वरुण बुद्धदेव, श्रिया सरन यांच्यासह ऑलिव्हिया मॉरिस, रे स्टीव्हनसन आणि अॅलिसन डूडी या हॉलिवूड स्टारच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. मुळ तेलुगू भाषेतील 400 करोड बजेट असलेल्या RRR चे फक्त पाच भाषेतील हक्क विकत घेण्यासाठी 350 करोड रुपयांच्या ऑफर्सही निर्मात्यांकडे आल्या आहेत. या चित्रपटाचे संगीत एम. केरावानी यांनी दिले आहे. के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांची मूळ कथा असून राजामौली यांनी चित्रपटाची पटकथी लिहिली आहे. RRR चित्रपटालाही कोव्हिडचे ग्रहण लागले होते. 8 जानेवारी 2018 रोजी या चित्रपटाचे शुटींग हैदराबादमध्ये सुरु झाले. 8 जानेवारी 2021 रोजी RRR प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र कोव्हिडमुळे हे वेळपत्रक बिघडले आता RRR 13 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.
हे देखील वाचा: नेपोटीझम हो तो आलिया जैसा हो, वर्ना ना हो!
चित्रपटाचा काही भाग कोव्हिडपूर्वी शुट करण्यात आला होता. मात्र कोव्हिडच्या विलंबामुळे दृष्यांत फरक दिसल्यामुळे राजामौली यांनी सर्व भाग पून्हा शुट केला आहेत. यासाठी रामोजी फिल्म सिटीमध्ये नव्यानं सेट उभारण्यात आले. त्यामुळेच RRR चं 400 करोडचं बजेट त्यापुढेही जाणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र काहीही असलं तरी राजामौली आपल्या चित्रपटाच्या भव्यतेबाबत कुठलीही कमतरता ठेवत नाहीत. RRR बाबतही तसेच आहे. आता त्यांच्या चाहत्यांना ऑक्टोबर महिन्याची प्रतिक्षा आहे. हा भव्य RRR आता बाहुबलीचा विक्रम मोडतो का हे बघावे लागेल.