विक्रम गोखले यांच्या मृत्यूची अफवा, निखिल वागळे आणि आपण सर्व!
आपण सगळेच आपआपल्या कामात व्यग्र झालो आहोत. काही राजकीय नेतेमंडळी विक्रम गोखले यांच्या निकटवर्ती यांना भेटून सांत्वन करत असल्याच्या बातम्या येत आहेत. हळूहळू तेही सावरतील यातून… एक फार मोठा माणूस आणि ताकदीचा अभिनेता आपल्यातून निघून गेल्याची सल मात्र आयुष्यभर राहील यात शंका नाही. गोखलेंच्या जाण्यातून हळूहळू सावरत असताना एक गोष्ट मात्र काही केल्या मनातून जात नाहीये, ती म्हणजे ते जाण्यापूर्वी दोन दिवसांपासून सुरू झालेल्या त्यांच्या जाण्याविषयीच्या बातम्या आपण थांबवायला हव्या होत्या.
खरंतर कोणीही माणूस गेल्यानंतर तो गेलाय हे संबंधिक रुग्णालय किंवा जबाबदार डॉक्टर सांगतो. त्यानंतरच ते जाहीर केलं जातं. त्याला बरीच वैद्यकीय कारणं आहेत. पत्रकारितेमध्ये तर हे पाळलं जातंच. आता अलिकडे अनेक यू ट्युबर्स आले आहेत.. पॉडकास्टर्स आले आहेत. ही मंडळी आपआपल्या सोर्सनुसार या बातम्या ब्रेक करत असतात. ज्याचा सोर्स जेवढा भक्कम तेवढी ती बातमी खरी मानली जाते. असं असलं तरी कोणीही माणूस मृत झालाय याची बातमी ब्रेक करताना संबंधित रुग्णालयाचा दाखला द्यावा लागतो असा नियम आहे. पण विक्रमजींबाबत (Vikram Gokhale) हे कोणतेही निकष जबाबदार लोकांनी पाळले नाहीत. इथे मी माध्यमं म्हणत नाहीये.
एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती अशी की, जोवर रुग्णालयाने जाहीर केलं नाही तोवर एकाही मराठी माध्यमाने विक्रमजींच्या जाण्याची बातमी दिली नाही. ही फार महत्वाची गोष्ट आहे. विक्रमजी जाण्याबद्दल उलटसुलट चर्चा झाली ती सोशल मीडियावर. माजी संपादक, पत्रकार निखिल वागळे यांच्या पोस्टनंतर तर या सगळ्या गोष्टीला ट्रीगर मिळाला. तो मिळणं स्वाभाविक होतं कारण, वागळे हे एक जबाबदार आणि अनुभवी पत्रकार आहेत. ते संपादकही होते. त्यांना पत्रकारितेतले सगळे खाचखळगे माहिती आहेत. काय अधिकृत आणि काय अनधिकृत हे सगळं त्यांना कळतं. मतमतांतरे असण्याचा मुद्दा नाहीय, ती असावीत. पण जेव्हा बातमी ब्रेक करायची वेळ येते तेव्हा त्याला नेमके कोणते निकष लागू असायला हवेत ते वागळेंना माहिती आहे. पण वागळे चुकले. रुग्णालयाने जाहीर करण्याआधी वागळे गोखलेंना श्रद्धांजली देऊन बसले. बरं, नंतर झालेली चूक लक्षात आल्यानंतर माफीनामा लिहिला असता तरी माणूस समजू शकतं. पण त्या पलिकडे जाऊन रुग्णालय, कुटुंबीय यांच्याबाबत काही प्रश्नचिन्हं वागळेंनी निर्माण केलं. त्यापलिकडे जाऊन गोखलेंच्या (Vikram Gokhale) विचारधारेवरही त्यांनी टिप्पणी केली. त्यांच हे वर्तन अनाकलनीय आहे.
गोखलेंच जाणं अधिकृतरित्या जाहीर होण्यापूर्वी दोन दिवस आधी रात्री मलाही त्यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने ते गेले असून उद्या सकाळी जाहीर केलं जाईल अशी खात्रीलायक बातमी दिली. पण व्यक्तिश: मी सोशल मीडियावर पोस्ट करताना ते चिंताजनक असल्याचीच पोस्ट केली. कारण, रुग्णालयाने विक्रम गोखलेंच्या (Vikram Gokhale) जाण्याला अधिकृत दुजोरा दिला नव्हता. या व्यक्तीने फोनवरून त्यांच्या कुटुंबियांच्या मानसिक अवस्थेबद्दलही माहिती दिली. पण शेवटी जोवर रुग्णालय सांगत नाही तोवर थांबण हेच आणि हेच अंतिम कर्तव्य प्रत्येकाचं आहे आणि असेल.
कारण, विक्रमजींच (Vikram Gokhale) जाणं.. त्यात रुग्णालयाच्या काही गोष्टी, कुटुंबियांची मानसिकता या गोखले कुटुंबियांची अत्यंत व्यक्तिगत बाब आहे. त्यांच्याबाबत कुणी काय निर्णय घ्यायचा हे सर्वाधिकार त्यांच्या पत्नी आणि दोन मुलींकडेच होता. जोवर ते जाहीर होत नाही तोवर सोशल मीडियावर आपण घाई करणं अक्षम्य आहे. इथे वागळे चुकले. गोखलेंची विचारधारा काढून तर आणखी चुकले. प्रत्येकाची आपली विचारप्रणाली असते. ज्याने त्याने तिचा सन्मान करायला हवा. जसे काही डावे आहेत तसे उजवेही असणार आहेतच. असो.. पण त्यात आत्ता नको पडायला. खरंतर पत्रकार म्हणून आपण कुठलीही बाजू घेणं अयोग्य आहे. आपण जे योग्य त्याला पाठिंबा द्यायला हवा आणि जे अयोग्य आहे त्यावर टीका करायला हवी, इतकंच पत्रकार आणि माध्यमांच काम असायला हवं.
=======
हे देखील वाचा : विक्रम गोखले या नावामागे दडलाय मोठा इतिहास
=======
इथे फार गल्लत झाली. अपवाद वगळता कोणाही मराठी माध्यमांनी घाई करत गोखले (Vikram Gokhale) गेल्याची बातमी चालवली नाही. ती चालली ती केवळ जबाबदार लोकांच्या बेजबाबदार पोस्ट्समुळे. यावेळी सोशल मीडियाने समाजाला ड्राईव्ह केलं. जे फार बरं लक्षण नाहीये. ही गोष्ट आपण थांबवायला हवी होती. असो. अर्थात हा प्रकार घडल्यानंतर वागळेंना श्रद्धांजली वाहणाऱ्या पोस्ट्स आल्या त्याही चूकच. हे म्हणजे तू करशील तसंच मी करणार.. तर तुझ्यात आणि माझ्यात फरक काय आहे?
आता घडून गेलेल्या गोष्टीवर फार बोलूनही उपयोग नाही. मुद्दा इतकाच आहे की, यातून आपण काय शिकणार आहोत? श्रद्धांजली वाहण्याची घाई अंगलट येऊ शकते. थोडं थांबूया. बातम्या रोज ढिगानं येत असणार आहेत. त्या कोण देतंय आणि त्याला पुरावा काय मिळतोय हे आपण प्रत्येकानं तपासून पाहिलं तरी याला मोठा चाप बसेल. बघा विचार करून…
सौमित्र पोटे
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. आम्ही याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.