
Asambhav Marathi Film Review : गुंतागुंतीची मर्डर आणि लव्हस्टोरी….
पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात असं आपल्याला घरातल्या मोठी मंडळींनी लहानपणी नक्कीच सांगितलं असेल.. पण जर का आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांचा आणि मागच्या जन्माचा काही संबंध असेल तर? कदाचित आपल्या कुणाचाच विश्वास सहसा यावर बसणार नाही… बऱ्याचवेळा एखादा प्रसंग आता प्रेझेंटमध्ये जरी आपण अनुभवत असलो तरी हे मी कुठेतरी पाहिलंय किंवा असं काहीतरी घडलंय असं नकळत आपण कुणाकडून तरी ऐकतो किंवा स्वत: ते अनुभवतो… असंच काहीसं घडलंय ‘असंभव’ चित्रपटातील नायिकेसोबत… स्वप्नात तिला एक हवेली दिसते.. त्या हवेलीतील पलंगावर तिच्यासारखीच दिसणारी एक स्त्री झोपलेलीही दिसते आणि क्षणार्धात तिच्या तोंडावर कुणीतरी उशी ठेवतं आणि पोटात सुरा खुपसतं… स्वप्नातील स्त्रीला झालेल्या वेदना स्पप्न पाहणारी नायिका सत्यात अनुभवत असते… आता ‘असंभव’ चित्रपटातील नेमकं हे पुर्नजन्माचं काय कोडं आहे? चला जाणून घेऊयात….
आधी ‘असंभव’ या मर्डर मिस्ट्री चित्रपटाची कथा काय आहे थोडक्यात जाणून घेऊयात… चित्रपटाची कथा साधारणपणे ७०-८०चं दशक आणि आजच्या २१व्या अशा २ दशकांची आहे… तर, चित्रपटाची सुरुवात होते नायिका मानसी (अभिनेत्री मुक्ता बर्वे) झोपेत स्वत:चाच खुन होताना पाहात असते आणि स्वप्नातील तिच्यासारख्या दिसणाऱ्या स्त्रीच्या पोटात खुपसलेल्या सुऱ्याच्या वेदना तिला इथे वर्तमानकाळात होतात… तडकाफडकी ती जागी होते आणि नेमकं ती का विव्हळत होती आणि स्वप्नात दिसणारी तिच्यासारखीच स्त्री, तिला दिसणारी ती हवेली नेमकी कुणाची आहे आणि त्याचं मानसीशी काय कनेक्शन आहे याची स्टोरी बिल्डींग तयार होते… पेशाने आर्किटेक्ट असणारी मानसी आदित्यला (अभिनेता सचित पाटील) भेटते आणि पुढे कामानिमित्त त्यांची झालेली ओळख प्रेमाने बहरते… तिला पडणाऱ्या स्वप्नांमुळे पुढे आदित्यसोबतचं तिचं नातं कसं बदलतं? मागच्या जन्मात त्या दोघांचे काय संबंध असतात, साधना (अभिनेत्री प्रिया बापट) हिचं या दोघांशी काय कनेक्शन आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानसीला दिसणाऱ्या स्वप्नातील त्या स्त्रीचा खुनी कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी एकदा तरी मराठीतील ‘असंभव’ ही नवीकोरी मर्डर मिस्ट्री फिल्म नक्की पाहिलीच पाहिजे…

आता वळूयात जरा वळूयात दिग्दर्शन, लिखाण आणि कथेच्या मांडणीकडे… खरं तर मराठीत मर्डर मिस्ट्री लिहिणारे अनेक ताकदीचे लेखक होऊन गेले.. रत्नाकर मत्करींचा तर या बाबतीत कुणी हात पकडूच शकत नाही… पण असं असलं तरी आत्तापर्यंत ताकदीचं लिखाण असणारी मर्डर मिस्ट्री चित्रपटात सादर केली गेली नाही ही खंतच म्हणावी लागेल… आत्तापर्यंत ‘वाळवी’, ‘पुणे ५२’, ‘विक्टोरिया’ असे काही चित्रपट आले खरे पण तरीही प्रेक्षकांना अधिक गुंतवून ठेवण्याचं कसब जे साऊथ मर्डर किंवा थ्रिलर चित्रपटांमध्ये आहे ते मराठीत जरा कमी पडलंय… पण तरीही असंभवच्या बाबतीत म्हणायचं झालं तर लेखक कपिल भोपटकर, विशाल इनामदार आणि स्वत: सचित पाटील यांनी कथेची निवड आणि त्याची मांडणी उत्तमरित्या केली आहे… शिवाय, दिग्दर्शनाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर ‘साडे माडे तीन’ आणि ‘क्षणभर विश्रांती’ या दोन्ही वेगवेगळ्या Genere च्या चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या सचितकडून ही अशी उत्तम मर्डर मिस्ट्री खरं अपेक्षित नव्हती.. चित्रपटाचा फर्स्ट हाफ फारच प्रेडिक्टेबल आणि जरा रटाळवाणा आहे… म्हणजे कॅरेक्टर आणि स्टोरी बिल्डींगच्या नादात खुनी कोण असेल? याचा काही ठिकाणी थेट अंदाज प्रेक्षक बांधू शकतील असं बऱ्याच जागी होतं… पण सेकंड हाफ जो टर्न घेतो तो प्रेक्षकांना विचार करायला आणि त्यांना खुर्चीला खिळून ठेवणारा नक्कीच आहे…
सुरुवातीला जरा संथ वाटणारी या चित्रपटाची कथा हळूहळू स्पीड घेत एका वेगळ्याच एंडिगवर प्रेक्षकांना घेऊन जाते… मानसी आणि आदित्य यांची Present मधली लव्हस्टोरी टिकून राहण्यासाठी मागच्या जन्मात घडलेल्या काही घटनांचा सोक्षमोक्ष लावणं गरजेच असतं हे दाखवताना एक सरळ-सुंदर प्रेमकथा देखील प्रेक्षकांना पाहायला मिळते… शिवाय, सिंगल मदर असणाऱ्या एका स्त्रीकडे दुसरी स्त्री किंवा समाज एका वेगळ्या नजरेने कायम पाहतात; याबाबतीत सत्य परिस्थीत जाणून न घेण्याची त्यांची मानसिकताही कुठेतरी मेकर्सने ‘असंभव’ चित्रपटातून मांडलेली आपल्याला पाहायला मिळते… मानसी,आदित्य, साधना, संजू आणि डॉ. सत्यजित यांचं कॅरेक्टर बिल्डींग तर मेकर्सना जमलं आहे खरं पण जरा खोलात जाऊन प्रत्येकाचा पास्ट जरा अजून सविस्तरपणे मांडला असता तर अधिक मजा नक्कीच आली असती… मी असं म्हणत नाहीये की मराठीने साऊथ मर्डर मिस्ट्री्जची कॉपी केली पाहिजे; पण तरी त्यांच्याकडून अशा पद्धतींच्या कथांची थोडी मांडणी कशी करावी हे आत्मसात केलं तर मराठीत मर्डर मिस्ट्री हा Genere प्रेक्षकांना अधिक आवडू लागेल यात शंका नाही… दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटात ३ प्रमुख पात्र आणि ३ त्यांना सपोर्ट करणारी पात्र आहेत… त्यामुळे संशय एकावरुन दुसऱ्यावर शिफ्ट होत राहतो… अर्थात प्रेक्षकांचा गोंधळ निर्माण होतोच पण कथा अधिक रंजक आणि गुंतागुंतीची करण्यासाठी मेकर्सने काही अधिक पात्रांची जोड यात दिली असती तर ‘असंभव’ हा थोडा अधिक उजवा ठरला असता… परंतु, कथेची गरज लक्षात घेता साकलेला स्क्रिन प्ले हा पुरक ठरतो हे देखील तितकंच खरं…

आता वळूयात कलाकारांच्या अभिनयाकडे… मघाशी म्हटल्याप्रमाणे आणि चित्रपटाच्या ट्रेलरवरुनच ‘असंभव’ या चित्रपटाची कथा खुन आणि पुर्नजन्म याच्याभोवती फिरते हे आपल्या लक्षात येतंच… पण असं असताना पुर्नजन्मातील मेन कॅरेक्टर्स आणि मागच्या जन्मातील काही कॅरेक्टर्स जे आजही जीवंत दाखवले आहेत त्यांच्या वयाबद्दल जरा प्रश्नचिन्ह निर्माण होतं… ही एक बाब सोडली असता मुक्ता बर्वे, सचित पाटील, संदीप कुलकर्णी आणि प्रिया बापट यांनी त्यांच्या भूमिकेला १०० टक्के न्याय दिला आहे…. जराशी वेंधळी पण तितकीच आपल्या निर्णयांवर ठाम असणारी मानसी, आपलं प्रेम किती Pure आहे हे प्रत्येक क्षणाला सिद्ध करणारा आदित्य आणि ७०-८०च्या दशकातील Single Mother असणारी साधना सेहगल या भूमिका मुक्ता, सचित आणि प्रिया नव्हे तर ती खरी पात्रच आहेत हे प्रेक्षकांना पटवून देण्यात तीनही कलाकार यशस्वी झाले आहेत… शिवाय, सायकॉलॉजिस्ट डॉ. सत्यजित यांची भूमिका संदीप कुलकर्णी यांनी Apt साकारली आहे…. चित्रपटाचं संगीत आणि बॅग्राऊंड स्कोअर average आहे… चित्रपटात फक्त एकच गाणं आहे आणि तेही स्टोरी पुढे घेऊन जाण्यासाठी दाखवलंय….
================================
हे देखील वाचा : Ranveer Singh : लेखक ते अभिनेता असा प्रवास करणारा बॉलिवूडचा एनर्जेटीक धमाका!
================================
एकंदरीत मराठीत आणखी एक बरी मर्डर मिस्ट्री असणारा चित्रपट म्हणून ‘असंभव’ची एन्ट्री झालीये असं म्हणावं लागेल… जी लोकं वेगवेगळ्या भाषेतील मर्डर मिस्ट्री चित्रपट पाहतात त्यांना कदाचित सेकंट हाफमध्ये खुनी कोण असेल याचा अंदाज येऊ शकतो… काही ठिकाणी पात्रांच्या संवादावरुन पुढची स्टोरीलाईन काय असेल हेही Assume आपण जरी केलं तरीही regular murder mystry पाहणाऱ्या लोकांना आणि थिएटरमधल्या प्रेक्षकांनाही क्लिन बोल्ड करत शेवट वेगळ्याच वळणावर आणण्यात दिग्दर्शक, लेखक खरे उतरले आहेत… ‘असंभव’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सचित पाटीलने केलं असून सह-दिग्दर्शन पुष्कर श्रोत्रीने केलंय… या चित्रपटात चार भूमिकांमध्ये दिसलेला सचित पाटील मराठीl ’असंभव’च्या निमित्ताने उत्कृष्ट आणि दर्जेदार मर्डर मिस्ट्री आणण्यात यशस्वी झाला आहे असं म्हणत त्याचं कौतुक नक्कीच करायला हवं… खऱ्या अर्थाने ‘असंभव’ चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर मराठीत विषयांच्याबाबतीत वेगवेगळे प्रयोग सादर केले जात आहेत आणि प्रेक्षकांचाही त्याला उत्सफुर्त प्रतिसाद मिळतोय ही अभिमानाची व आनंदाची गोष्ट आहे…
कलाकृती मिडिया ‘असंभव’ चित्रपटाला देत आहे पाच पैकी साडेतीन स्टार्स!
-रसिका शिंदे-पॉल