दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
सई… एक परिपूर्ण अभिनेत्री!!!
ती नेमकी कोण आहे…. बिकनीमध्ये ती बोल्ड अँण्ड ब्युटीफुल दिसते… कॉटनच्या साडीत ती परफेक्ट गृहिणी दिसते…. तिचं डायट आणि फिगर हा चर्चेचा विषय असतो… तेव्हाच ती वजनदार बनून चाहत्यांना चाट पाडते… कधी कुटुंबासोबत बसून तिला ऐकावं वाटतं… तर कधी तिची भाषा ऐकून कान बंद करावेसे वाटतात… तिची फॅशन… लॅक्मेमधला रॅम्पवॉक…. आणि टॅटूचं वेड… कधी वाटतं की हिच्याभोवती एक गूढ वलय असावं… एवढं भिन्न व्यक्तीमत्व आहे तिचं… पण तरीही तिच्याबाबतीत एक ओढ कायम आहे… यामागे आहे तिचा गोड चेहरा आणि मनमोकळं हास्य… ती कशी असेल असा सर्व विचार या हास्यापर्यंत येऊन थांबतो… ती तिच्या या हसण्यासारखी आहे… मनमोकळी… मुक्त… ती आहे सई… सई ताम्हणकर….
मराठी चित्रपट सृष्टीत बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळख असलेली सई ताम्हणकर मूळ सांगलीची. चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स, सांगलीची ती विद्यार्थिनी. कॉलेजमध्ये नाटक आणि एकांकींकेमध्ये सईचा सहभाग असायचा. त्यातल्या ‘आधे अधुरे’ या नाटकासाठी तिला उत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार मिळाला. चित्रपटसृष्टीत कोणीही भक्कम पाठिराखा नसतांना सई केवळ आपल्या अभिनयाच्या क्षमतेवर विश्वास ठेऊन मुंबईत दाखल झाली. ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेतून ती छोट्या पडद्यावर आली. अनुबंध, अग्निशिखा, साथी रे, तुझं माझं जमेना या अन्य काही मालिका सईला मिळाल्या. त्यासोबत बालाजी फिल्मची कस्तुरी ही हिंदी मालिकाही सईला मिळाली. एकीकडे हा अभिनय प्रवास सुरु झाला असतांनाच ती हॉटेल मॅनेंजमेटचा अभ्यासक्रम करत होती.
श्रेयस तळपदे निर्मित ‘सनई चौघडे’ या चित्रपटातून सई पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर आली. या चित्रपटात सईच्या कामाची चांगलीच तारीफ झाली. पण 2012 मध्ये आलेल्या नो एन्ट्री मध्ये सई बिकनीमध्ये दिसली. लाल रंगाची बिकीनी घातलेली सई पडद्यावर आली आणि एकच हंगामा झाला… मराठीतील बिकीनी गर्ल म्हणून तिला ओळख मिळाली. तिच्या या हॉट अंदाजावर टिकाही झाली. पण सईला फरक पडला नाही. ती भूमिकेची गरज होती… एवढंच तिचं म्हणणं… अर्थात सईचा हा स्वभावच… कोणी काही बोलूदे पण आपण ज्या क्षेत्रात आहोत तिथे भूमिकेला साजेसा अभिनय करायचा आणि साजेसा पोशाख घालायचा हे तिचं धोरण पक्क आहे. त्यामुळे नो एन्ट्रीमध्ये ‘पुढे धोका आहे’…. या गाण्यामधून सई स्टेजवर आली आणि मराठी चित्रपटाला नवीन टप्यावर घेऊन गेली.
2013 मध्ये दुनियादारीमध्ये शिरीन बनून सई आली. स्पष्टवक्ती… फॅशनेबल… शिरीन…. चांगलीच हीट ठरली. सईची मराठी चित्रपट सृष्टीतील ही भरारी सुरु असतांना हिंदीमध्येही ती लक्षवेधी ठरत होती. आमिर खानच्या गजनीमध्ये तिला संधी मिळाली. छोटेखानी भूमिकेमध्ये सईनं आपली छाप पाडली. विशेष म्हणजे हिंदी भाषाही उत्तमरित्या ती बोलू शकते हे स्पष्ट झालं. सुभाष घाई यांच्या ब्लॅक अँण्ड व्हाईटमध्येही सई होती. याबरोबरच अनुराग कश्यप यांच्या हंटरमधून सई पुन्हा चर्चेत आली. या चित्रपटातला तिचा हॉट लूक गाजला. मराठमोळ्या अभिनेत्रीचा हा हॉट लूक म्हणजे चर्चेचा विषय… पण सईनं अशा ट्रोल करणा-यांना कधी विचारतच घेतले नाही. पुणे 52, अशाच एका बेटावर या चित्रपटांतील भूमिकांमुळेही सईच्या नावाची खूप चर्चा झाली. या चर्चांना सईनं आपल्या भूमिकांमधूनच उत्तर दिलं. तिचा अनुमती हा त्यापैकीच एक… एका साध्या भोळ्या महिलेची ही भूमिका तिच्यावर टीका करणा-यांना उत्तर देऊन गेली.
सईनं अनेक विविधांगी भूमिका केल्या. वजनदारमध्ये जाड महिलांची व्यथा तिनं मांडली. तर क्लासमेटमध्ये तिचा रावडी लूक होता… गर्लफ्रेंडमध्ये याच सईनं अमेय वाघच्या साथीनं धमाल केलीय. पिकनीक, हाय काय नाय काय, बे दुणे साडे चार, अजब लग्नाची गजब गोष्ट, मिशन पॉसिबल, रिटा, राडा रॉक्स, दोन घडीचा डाव, गाजराची पुंगी, व्हिला, अघोर, बाबुरावला पकडा, धागेदोरे, बालक-पालक, झपाटलेला-2, टाईम प्लीज, सौ. शशी देवधर, गुरु पौर्णिमा, पोरबाजार, प्यारवाली लव्ह स्टोरी, पोस्टकार्ड, क्लासमेट, किल्लारी, तू ही रे, वाय झेड, जाऊद्या ना बाळासाहेब, फॅमिली कट्टा, राक्षस , लव्ह सोनीया, सोलो, कुलकर्णी चौकातला देशपांडे, धुरळा, मिडीयम स्पाईसी, पूर्णरेखा… ही सईच्या अभिनयानं सजलेल्या चित्रपटांची यादी आहे. यातून सईचं व्यक्तीमत्व स्पष्ट होतं. ती उत्तम हास्य कलाकार आहे. गंभीर भूमिकांनाही ती तेवढाच चांगला न्याय देते. प्रेमिकेची भूमिकाही त्याच तन्मयतेने करते… एकूण काय सई ही एक परिपूर्ण अभिनेत्री आहे.
सईच्या वाढत्या लोकप्रियतेचा प्रत्यय लॅक्मे फॅशन विकमध्येही आला. पुनीत बलाना, ज्युली शाह, दिशा पाटील या तीन प्रसिद्ध फॅशन डीझायनर्ससाठी तिनं रॅम्प वॉक केलाय. तिचं डायट हा अभ्यासाचा विषय म्हणावा लागेल. तर टॅटूचं वेड ही तसंच. तिनं तिच्या चक्क खांद्यावर रोमन आकड्यांचा टॅटू काढलाय. तर हातावर स्टार काढलाय. ही सई आहेच तशी हटके. ती जे करेल ते वेगळं असतं… खास असतं…. सई तुझी कारकिर्द अशीच बहरत जाऊदे… कलाकृती मिडीयातकडून तुला लाखो शुभेच्छा….
सई बने