
‘सखाराम बाईंडर’ पुन्हा रंगमंचावर; अभिनेत्री नेहा जोशी झळकणार ‘लक्ष्मी’च्या भूमिकेत !
प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर लिखित आणि एकेकाळी प्रचंड वादग्रस्त ठरलेलं ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर सादर केलं जात आहे. या नव्या प्रयोगात अभिनेत्री नेहा जोशी ही ‘लक्ष्मी’ ही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारत आहे. नाटक आणि तिच्या भूमिकेबाबत बोलताना नेहाने अनेक विचार मांडले आहेत. नेहा म्हणाली, “‘सखाराम बाईंडर’ जरी ५० वर्षांपूर्वीचं नाटक असलं, तरी त्यात मांडलेला विषय आजही तितकाच सुसंगत आणि अंतर्मुख करणारा आहे. मला या नाटकातील लक्ष्मीची भूमिका फारच भावली. वरकरणी शांत, सहनशील आणि गोंधळलेली वाटणारी ही स्त्री, आतून मात्र फारच ठाम आणि कणखर आहे. लग्नसंस्थेवर आणि देवावर नितांत श्रद्धा असलेल्या लक्ष्मीचं, या मूल्यांना विरोध करणाऱ्या सखारामसोबतचं नातं कसं तयार होतं, हे या नाटकातून प्रेक्षकांना पाहायला मिळेल.*(Sakharam Binder Natak)

नेहाने असंही स्पष्ट केलं की, विजय तेंडुलकर यांची संहिता ही एक दिग्गज साहित्यिकाची सशक्त निर्मिती आहे आणि म्हणूनच मूळ संहितेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या नाटकाची निर्मिती सुमुख चित्र यांच्यातर्फे करण्यात आली असून, मनोहर जगताप हे निर्माते आणि निखिल जाधव कार्यकारी निर्माते आहेत. दिग्दर्शनाची धुरा अभिजीत झुंजारराव यांनी सांभाळली आहे. संगीत आशुतोष वाघमारे, नेपथ्य सुमीत पाटील, प्रकाशयोजना श्याम चव्हाण, रंगभूषा शरद सावंत, आणि वेशभूषा तृप्ती झुंजारराव यांची आहे. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून संकेत गुरव यांनी योगदान दिलं आहे.

या भूमिकेसाठी नेहाचं नाव प्रसिद्ध कवी प्रकाश होळकर यांनी सुचवलं होतं आणि दिग्दर्शक झुंजारराव यांच्या मनातही तिचं नाव आधीपासून होतं. तिने सांगितलं की, “सयाजी शिंदे यांच्यासारख्या अनुभवी कलाकारासोबत रंगमंच शेअर करणार हे ऐकल्यावर थोडं दडपण आलं, पण जेव्हा ते भूमिका साकारतात, तेव्हा ते फक्त कलाकार असतात मोठेपणा आणि नाव बाजूला राहतात. त्यांच्या कामातील निष्ठा आणि प्रामाणिकपणा अनुभवणं, ही माझ्यासाठी एक शाळाच ठरली.”(Sakharam Binder Natak)
===============================
================================
शेवटी नेहाने प्रेक्षकांना आवाहन केलं की, “नव्या काळात नव्या कलाकारांसोबत हे नाटक सादर होत आहे. तुम्हाला नाटक कसं वाटलं, हे जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रियांतून आम्ही तेंडुलकरांच्या विचारांना प्रेक्षकांपर्यंत कितपत पोहोचवू शकलो, याची दिशा मिळेल.”