‘शिवा’ मालिकेतून ‘रामभाऊ’ची एक्झिट; आता ‘या’ हिंदी मालिकेत झळकणार !

‘शिवा’ मालिकेतून ‘रामभाऊ’ची एक्झिट; आता ‘या’ हिंदी मालिकेत झळकणार !
मराठी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता समीर पाटील याने झी मराठीवरील ‘शिवा’ या गाजलेल्या मालिकेतून एक महत्त्वाची भूमिका साकारली आहे. रामचंद्र देसाई उर्फ रामभाऊ हे या भूमिकेच नाव. या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली होती. मात्र आता समीर पाटील यांनी या मालिकेतून अधिकृतपणे एक नवीन वळण घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत ‘रामभाऊ’ या भूमिकेचा निरोप घेतल्याची माहिती दिली.(Shiva Marathi Serial)

“रामभाऊ…म्हणजे माझ्या अभिनयप्रवासातील एक भावनिक वळण. आता ही भूमिका मी साकारत नसल्याचं सांगताना मनात खूप भावना एकत्र येतात,” असं त्यांनी स्पष्ट केलं. या भूमिकेद्वारे त्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं, ज्यासाठी त्यांनी मनापासून आभार मानले आहेत. त्यांनी ही भूमिका का सोडली, याचा नेमका खुलासा न करता त्यांनी सांगितलं की, “या प्रवासात अनेक चांगली माणसं जोडली गेली. लवकरच नव्या रुपात पुन्हा भेट होईल.”

प्रेक्षकांमध्ये काहीसा गोंधळ असतानाच, समीर पाटील यांचा हिंदी मालिकेत प्रवेश झाल्याची माहिती ही समोर आली आहे. शरद केळकर आणि निहारिका चौकसे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या हिंदी मालिकेत ‘तुम से तुम तक’ या आगामी शोमध्ये समीर झळकणार आहेत. या मालिकेत ते नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारणार आहेत. सध्या या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर झळकला असून त्यातून त्यांच्या नव्या प्रवासाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळतेय.(Shiva Marathi Serial)
===============================
===============================
मराठी मालिकांमधून हिंदी टेलिव्हिजनकडे वळणं हे अनेक कलाकारांसाठी मोठं पाऊल असतं. समीर पाटील यांचा हा निर्णय त्यांच्या करिअरमध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. मराठी भाषेतील अभिनयात दम दाखवून आता ते हिंदी प्रेक्षकांच्या मनातही जागा मिळवतील,अशी अपेक्षा आहे. प्रेक्षकांनाही त्यांच्या या नव्या भूमिकेची उत्सुकता आहे. ‘शिवा’मध्ये रामभाऊ म्हणून त्यांनी उभा केलेला भावनिक आणि थोडासा मिश्किल स्वभाव लक्षात ठेवत, ‘तुम से तुम तक’मध्ये ते कशा भूमिकेत दिसणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.