संगीतकाराच्या कवीमित्राला शुभेच्छा
Happy birthday Sandeep Khare
च्यामारी हा आमचा sandy
म्हणजे कमालच आहे…..
तो कॉलेज मधून submission करून सायकल वरून घरी येता येता गुणगुणत होता….आणि त्याने सहज गुणगुण केली तीच वाऱ्यावर गेली…..आणि तिची गाणी झाली…….सगळे डोलायला लागले… डोळयात पाणी..अंगावर काटा वगैरे आला सगळ्यांच्या…. आणि हा म्याड माणूस निसटला सायकल वरून थेट कोकणात… शिरवली ला….!! तिथेच असतो तो ….इथे दिसतो फक्त आपल्याला…पण त्याची ती कॉलेज मधली सायकल घेऊन तो तिथेच राहतो..कोकणात.!!
तिथे डोंगरात फिरतो…पाऊस आला की बेभान होऊन धावत सुटतो….. आजोबांचा हात धरून मातीच्या पायवाटेवरून फिरत असतो…हो…खरंच….!!
आजोबांच्या खोलीत धुकं धुकं…..हो..तेच पाडगावकर म्हणतात तेच… हा चक्रम माणूस ते आजोबांच्या खोलीमधलं धुकं डोळयात साठवून घेऊन आला….आता काही केल्या ते बाहेर येत नाही……मग काय… त्याच्या कवितेत उतरतं सगळं..
किती पाणीदार डोळे तुमचे …एक युवती त्याला म्हणाली….!!
तो बधीर बघत राहिला….!!….तिला काय काय सांगणार…. धुकं ..लहानपण..शनिवार पेठ..आजी…प्रवास ….नोकरी….आणि मग ते हे..मग ते…. तो नुसतं
thank you म्हणाला…!! आणि शून्यात बघत निघून गेला.
मुलाखत वगैरे देतो ना तो….हो हो….परिसंवादात सुद्धा भाग घेतो……पण मग मध्येच एका क्षणी जेव्हा त्याचे धडाधड सुंदर शब्द बाहेर पडत असतात त्याच्या खोल आवाजात… ..सगळे टाळ्या वाजवत राहतात….आणि तो हळूच निसटतो……पुन्हा एकदा शिरवली..गोवा… किंवा मग शनिवार पेठेत एका छोट्या वाड्यात खिडकीत बसून … आजोबांचा तबला ऐकतो….!! आणि…खिडकीतून बाहेर बघत बसतो….!! त्याला ब्लॅक अँड व्हाइट चित्र दिसतं सगळं ..फक्त त्यालाच..तसा लोलक आहे त्याच्याकडे …!!
जगाचे सगळे नियम पाळतो तो आणि मुख्य तत्व जपतो चांगुलपणाचे….तेच तर असतं ना रे….ह्यावर एकमत आमचे. एकदा मला म्हटला “एवढं शिस्तीत नको रे जगायला नाहीतर फार वर्ष जगत बसू आपण……कंटाळा येईल किती….”
कंटाळा….तो तर लगेच येतो त्याला….म्हणूनच तर शब्दाच्या झाडाला लोंबकळत बसत नाही तो..आणि कोण्या एका झाडाच्या मर्जीत बसून पण राहत नाही..तो त्याचं भ्रमण चालू ठेवतो….जिथे थांबतो तिथे झाड उगवलेले असतेच त्याच्यासाठी ….
तो दुसऱ्याच्या झाडाकडे असुयेने पाहत नाही…..त्याला ठाऊक आहे त्याचे झाड नक्षत्रांचे आहे….!! पण मग ते सारखे चमचम करून दाखवायला हवे का ? नको ना ? ह्या प्रश्नाने अस्वस्थ होतो आणि त्याची पण कविताच होते…..!!
इतक्या मोठ्या मोठ्या चार चाकी गाड्या घेऊनही ती कॉलेज मधली सायकल ह्याने जपून ठेवली आहे….कुठे लपवली आहे सांगत पण नाही साला….
पण…त्यावरूनच फिरून येतो हा मध्येच…!! मला खात्री आहे…!!
“प्रत्येक माणूस थोडा तरी वेडा असतोच बघ ना एकेक चेहरे…किती ताण..किती विचार करतात सगळे…” असं म्हणाला एकदा…..आणि हसता हसता डोळ्यात पाणी आलं त्याच्या..काही कळलंच नाही ….!!
कोणाला कळलं असेल ?
ह्याच्या चेहऱ्यावर लहान मुलाचं हसू आणि देव आनंदचा रोमान्स….कधी एकदम वडीलधाऱ्या माणसाच्या आवाजात बोलतो आणि कधी आईच्या..कधी छोटुसा अवतार… चौथीतल्या मुलाचा….. वाटतं ..गेल्या जन्मीचा मुलगा असणार माझा हा…मी एकटा युरोप ला निघालो होतो कार्यक्रमाला तर पाकीट ठेवलं माझ्या हातात आणि म्हणाला..” मजा कर..जपून राहा .!!मला वाटलं माझा दादा आहे का बाबा…? आणि वर मलाच म्हणतो…” तुझ्यात एक आई आहे सल्या ” काय नातं आहे .. नक्की कोण कोणाचा कोण ?…!! आमच्यात काहीतरी प्राचीन सांधा आहे हे मात्र खरं….
कार्यक्रम..मुलाखती…प्रवास…वगैरे….चालू असताना…कार्यक्रम चालू होता होता म्हणतो..चल भेटू interval मध्ये. ..आणि मग बेभान होऊन गाणी कविता ऐकवत राहतात ते सुप्रसिद्ध वगैरे झालेले दोघे आणि आम्ही दोघं कुठेतरी शांत ठिकाणी जाऊन काहीही न बोलता शेजारी बसून राहतो….
त्याच्या मनात खूप प्रश्न आहेत..त्याची उत्तरं शोधत बसतो तो ..डोळ्यात आजोबांच्या खोलीतल धुकं घेऊन….
तुला सगळं सापडेल…सगळी उत्तरं मिळतील आणि काही प्रश्नांची उत्तरं तू दे आम्हाला..
आरती प्रभूंच्या
” समजत नव्हते सनई ऐकुन दुखायचे का
आतुन डोळे त्या दिवशीच्या संध्याकाळी ? “
ह्याचे उत्तर …तुझ्याकडेच आहे Sandy… ह्याचं आणि…
रसलंपट मी तरी मज अवचित गोसाविपण भेटे…ह्याचं सुद्धा….
तुझ्यासाठी पैलामधले काही उजळून येणार आहे…तू आहे तिथेच आहे तसाच राहा…तुला सॅंडीण पण अशी भेटली आहे की..जिला सायकल काय आणि विमान काय…डोंगर काय आणि समुद्र काय..तू जिथे असशील तेवढा जगाचा तुकडा तू आणि ती मिळून सुंदर करून टाकता…असेच राहा.
… असच आजोबांच्या खोलीतलं धुकं डोळ्यात घेऊन
लहान मुलासारखा हसत राहा…..!!
बाकी मग..भेटूच….!! ♥️
Happy birthday ♥️♥️♥️
– सलील कुलकर्णी