देवबाभळीतल्या ‘आवली’चा लक्षवेधी प्रवास.
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात मोक्षदा मोहिते ही पी आय ची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री म्हणजे शुभांगी सदावर्ते. (Shubhangi Sadavarte) शुभांगी मूळची नाशिकची आहे. एकत्र कुटुंबपद्धतीच्या संस्कारात ती वाढली. गणपती उत्सवात लहानपणी आरती म्हणत असताना तिचा आवाज चांगला आहे, हे कुटुंबात लक्षात आलं आणि मग पंडित शंकरराव वैरागकर यांच्याकडे शुभांगीचे गायनाचे प्रशिक्षण सुरु झाले.
आपल्या मुलीने शास्त्रीय संगीतात करिअर करावे, ही तिच्या वडिलांची इच्छा होती. रेडिओवर ‘एकाच या जन्मी जणू’ हे गीत ऐकून तिने ते उत्कृष्टपणे सादर देखील केलं होतं. तिला काही वाद्यवृन्दामध्ये गाणी म्हणण्यासाठी आमंत्रणे येत होती. आईला गुपचूपपणे सांगून वडिलांच्या नकळत ती वाद्यवृन्दात गात होती कारण वडिलांना शास्त्रीय संगीतच अधिक आवडत होतं. शुभांगीने संगीत विषय घेऊनच बी ए केलं. नाशिकच्या ढोलपथकात देखील ती होती. नाशिकमधील एका शाळेत तिने संगीत शिक्षिका म्हणूनदेखील जबाबदारी सांभाळली. नाशिकमध्ये तिने काही व्हॉइस ओव्हर्स, जिंगल्स गायन यातही सहभाग घेतला.
आनंद ओक हा तिचा मित्र आणि प्राजक्त देशमुख हा आनंदचा मित्र. नाशिकमध्ये एकांकिका करायची होती. प्राजक्तने ती एकांकिका लिहिली होती. आनंदच्या सांगण्यानुसार शुभांगीने त्यात काम करायचे ठरवले. पण वडिलांचा प्रथम एकांकिकेत काम करायला नकार होता. वडील एकांकिकेची तालीम पाहायला आले होते. त्यांना शुभांगीचे काम आवडले आणि त्यांनी तिला एकांकिकेत काम करायला परवानगी दिली. त्या एकांकिकेचे नाव म्हणजे संगीत देवबाभळी. एकांकिकेत रसिका नातू आणि शुभांगी यांच्या भूमिका होत्या. एकांकिकेला अनेक बक्षिसे मिळाली. ही एकांकिका स्पर्धेची नाही, तर तिचे व्यावसायिक रंगभूमीवर प्रयोग व्हायला हवेत, असे अनेकांनी सांगितले होते.
शशांक सोळंकी यांनी जेव्हा शुभांगीचे काम पाहिले, तेव्हा त्यांनी तिला ‘बालपण देगा देवा’ या मालिकेसाठी ऑडिशन द्यायला सांगितले. शुभांगीने या मालिकेत भूमिका केली. एकदा प्राजक्त देशमुख आणि आनंद ओक यांनी संगीत देवबाभळीच्या संदर्भात एक मिटिंग आहे एवढेच शुभांगीला सांगितले आणि मग निर्माते प्रसाद कांबळी यांच्याबरोबर मिटिंग झाल्यावर शुभांगीने ‘संगीत देवबाभळी’मध्ये ‘आवली’ ही व्यक्तिरेखा करायची आहे आणि दुसऱ्या व्यक्तिरेखेसाठी शुभांगीनेच ऑडिशन घ्यायची आहे, हे तिला सांगण्यात आले. तिला प्रचंड सुखद धक्का बसला होता. मग दुसऱ्या व्यक्तिरेखेसाठी मानसी जोशी हिची निवड झाली आणि ‘संगीत देवबाभळी’ने जो त्यानंतर इतिहास घडवला, हे तुम्हाला माहित आहेच. या नाटकाचे आतापर्यंत तीनशे एकतीस प्रयोग झाले आहेत.
शुभांगीचा विवाह तिचा मित्र आनंद ओक याच्याशी झाला आहे. ‘नवे लक्ष्य’च्या ऑडिशनसाठी सोहम प्रॉडक्शनमधून फोन आला. शुभांगीची निवड ‘मोक्षदा मोहिते’ या भूमिकेसाठी झाली. शूटिंग तीन चार दिवसात चालू होईल, असा फोन शुभांगीला आला. पण त्यावेळी शुभांगीच्या वडिलांचे निधन झाले होते. तेव्हा सुचित्रा बांदेकर यांनी शुभांगीला खूप आधार दिला. आपण नंतर शूटिंग चालू करू, असे सांगितले. हा आधार तिला खूप महत्वाचा वाटतो.
शुभांगी म्हणते, “मोक्षदा मोहिते ही पोलीस व्यक्तिरेखा साकारताना पोलिसांबद्दलचा आदर प्रचंड वाढला आहे. इथे सेटवर आम्हाला अभिनय करताना कल्पना येते की प्रत्यक्ष पोलिसांचे कार्य किती अभिमानाचे आहे. मोक्षदा या व्यक्तिरेखेला खूप शेड्स आहेत. एका छोट्या बाळाच्या एपिसोडमध्ये तर पोलीस स्त्री च्या भावना आणि बाळासाठी असणारी ममता असे कंगोरे दाखवता आले. अन्यायाविरुद्ध लढणारी, पण त्याच वेळी एखाद्या बाळासाठी हृदयात माया जागवणारी अशी ही व्यक्तिरेखा साकारताना स्टार प्रवाह वाहिनी, आमची निर्मिती संस्था आणि अर्थात मालिकेची संपूर्ण टीम यांचे मोलाचे सहकार्य लाभते. लोकांचा प्रतिसाद देखील उत्कृष्ट मिळत आहे.