संजय दत्त: आईचा मृत्यू, ड्रग्जची नशा आणि तुरुंगवारी…
बॉलिवूडचा मुन्ना भाई म्हणून ओळखला जाणारा संजय दत्त आज आपला 63 वा वाढदिवस साजरा करत आहे. कारकिर्दीमधला बहुतांश काळ तो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. ज्या थोड्या काळासाठी तो वादापासून वेगळा होता, तेव्हा मात्र अनेक चांगले चित्रपट या बाबाने दिले… (Happy Birthday Sanjay Dutt)
बाबा…बोले तो…
बाबा…बॉलिवूडमध्ये एकच बाबा आहे. तो म्हणजे संजय दत्त. सुनील दत्त आणि नर्गिस यांचा मुलगा ही ओळखच संजयला मोठेपणा देण्यात पुरेशी होती. सुनील दत्त आणि नर्गिस बॉलिवूडमधलं एक गुणी जोडपं. या जोडप्याला तीन मुलं झाली. प्रिया आणि नम्रता या मुली तर संजय हा मुलगा. मात्र आई वडीलांचा अभिनयाचा गुण एकट्या संजयमध्ये पुरेपूर उतरला. पण या चांगल्या गुणांकडे लक्ष देण्यापेक्षा संजय दत्तनं भलतीच संगत जोडली. परिणामी एक चांगला अभिनेता असूनही त्याची कारकीर्द विवादीतच राहिली.
संजय आणि आईचं ट्युनिंग एकदम घट्ट होतं. या बाबाचे भरपूर लाड झाले. परिणामी दत्त घराण्याचा हा लाडका मुलगा ड्रग घ्यायला लागला. अशातच त्याला मादक पदार्थ जवळ बाळगल्याबद्दल अटक करण्यात आली. मुलाची तुरुंगातून सुटका झाल्यावर सुनील दत्त त्याला घेऊन थेट अमेरिकेला गेले. तिथल्या टेक्सास प्रांतातील व्यसनमुक्ती केंद्रात संजयला भरती करण्यात आलं. दोन वर्ष या केंद्रात राहिल्यावर संजय पूर्णपणे बदललेले होते.
रेष्मा और शेरा या आपल्या होम प्रॉडक्शनच्या चित्रपटात संजय दत्त यांनी बालकलाकार म्हणून काम केलं होतं. 1981 मध्ये संजय खऱ्या अर्थानं बॉलिवूडमध्ये दाखल झाला ते रॉकी चित्रपटामधून. सुनील दत्त निर्मित या चित्रपटात हा नशिले डोळे असणारा तरुण अल्पावधीतच लोकप्रियही झाला. दुर्दैवानं चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी तीन दिवस आधी नर्गिस यांचा मृत्यू झाला.
नर्गिस यांच्या मृत्यूने दोन व्यक्ती पूर्णपणे कोसळल्या. एक म्हणजे सुनील दत्त आणि दुसरे म्हणजे संजय दत्त. सुनील दत्त यांनी आपल्या पत्नीच्या नावाने अनेक सामाजिक संस्थाना मदत केली आणि या संस्थांसाठी ते काम करु लागले. पण संजयला आपल्या आईच्या मृत्यूचा मोठा धक्का बसला. रॉकी चित्रपट हीट ठरला. पण आपल्या आईनं आपला चित्रपट बघितला नाही, ही सल त्यांच्या मनात अद्यापही आहे. (Life story of Sanjay Dutt)
त्यानंतर संजयकडे विधाता, मै आवार हूं, जीवा , मेरा हक, ईनाम दर हजार, कानून अपना अपना असे चित्रपट आले. 1986 मध्ये आलेल्या नाम या चित्रपटानं पुन्हा संजय दत्त हे नाव सिद्ध केलं. महेश भट्ट दिग्दर्शित या चित्रपटात कुमार गौरव आणि अमृता सिंग यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातील पंकज उदास यांनी गायलेलं, चिट्ठी आई है हे गाणं खूप गाजलं. यातील संजय दत्तच्या अभिनयाचंही कौतुक झालं. एरवी संजय दत्त यांच्या अभिनयाला बोल लावणाऱ्यांनीही त्यांचं कौतुक केलं. पुढे कब्जा आणि हथियार या चित्रपटातूनही संजय यांनी आपल्या टिकाकारांना चोख उत्तर दिलं.
सडक, साजन, खलनायक, यलगार, योद्धा अशा अनेक चित्रपटांनी संजय दत्तची कारकीर्द बहरत होती. आईच्या मृत्यूनंतर कोलमडलेला संजय कुठे तरी सावरत असताना पुन्हा त्याच्या कारकिर्दीवर एक डाग लागला. मुंबई दंगलीमध्ये हत्यार जवळ बाळगल्याबद्दल त्याच्यावर आरोप करण्यात आले. खटला दाखल झाला. संजयला टाडा लागला.
सुनील दत्त यांना हा मोठा धक्का होता. साजन संजयला आता खलनायक अशी नवी ओळख मिळाली. त्याला खलनायक म्हणूनच संबोधण्यात येऊ लागले. एकदा प्रतिमा वाईट झाली की, ती सुधारण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. या कठीण परीक्षेत संजय एकदा पास झाला होता. पण आता पुन्हा नव्यानं परीक्षा द्यावी लागणार होती. संजयला पुन्हा अटक झाली. हा चोर पोलीसांचा खेळ संजयला पुढे अनेक वर्ष खेळावा लागला. (Life story of Sanjay Dutt)
तुंरुंगाच्या फेऱ्यांमधून मुक्त झाल्यावर संजयने वास्तव नावाचा चित्रपट केला. यात त्याने एका गॅंगस्टरची भूमिका केली. संजयच्या वास्तव जीवनावर आधारीत चित्रपट म्हणून या चित्रपटावर टीकाकरण्यात आली. पण या टीकाकारांना लवकरच शांत करुन संजय नव्या रुपात पडद्यावर आले. हे रुप म्हणजे लगे रहो मुन्नाभाई… यामधील त्याचा हलकाफुलका…हसवणारा अंदाज प्रेक्षकांना भलताच आवडला.
दरम्यान पुन्हा संजयची तुरुंगवारी झाली. ऑर्थर रोड आणि मग पुण्याच्या येरवडा कारागृहात संजयची रवानगी झाली. वास्तविक सुनील दत्त हे खासदार…त्यांचे राजकीय वजन खूप मोठं होतं. पण यापैकी काहीच संजयला तुरुंगात जाण्यापासून वाचवू शकलं नाही. संजय दत्त यांच्यावर खलनायक हा शिक्का कायमचा बसला.
संजय तुरुंगात गेल्यावरही त्यांच्यावर असणारा फोकस कमी झाला नाही. शेवटी 25 फेब्रुवारी2016 या सर्व प्रकरणातून पाच वर्षाची शिक्षा भोगून संजय तुरुंगाच्या बाहेर पडला. तुरुंगातून बाहेर पडतानाचे त्याचे बोलके छायाचित्र सर्व काही सांगणारे होते. (Life story of Sanjay Dutt)
संजयने या काळात बहुधा स्वतःला चांगले पारखले असणार…कारण त्यांच्या अभिनयचा ट्रॅकही बदलत गेला. गंभीर, मारामारीच्या भूमिका करणारा संजय विनोदी चित्रपटांमध्ये आता चपखल बसत होता. संवांदाचे टायमिंग त्यानेअचूक पकडले होते.
अग्निपथ, लगे रहो मुन्नाभाई, जिला गाजीयाबाद, शुट आऊट ॲट लोखंडवाला, धमाल, परिणीता, गुमराह, मिशन काश्मिर, पानिपथ, भूमी सारखे अनेक दर्जेदार चित्रपट संजय दत्तने रसिकांना दिले आहेत. यातील अनेक चित्रपटांचं चित्रीकरण कोर्टाची केस चालू असताना झालं आहे. 2018 मध्ये या अभिनेत्यावर संजू नावाचा चित्रपट आला. हा चित्रपट म्हणजे संजय दत्त यांच्या जिवनाचा आरसा ठरला…
वादांबरोबर नातं जोडणारा हा बाबा आता तरी या वादांना सोडून वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवून चालेल, अशीच त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.