संजीव कुमारच्या डाएटची कथा आणि व्यथा!
सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील सदाबहार अष्टपैलू अभिनेता म्हणजे संजीव कुमार (Sanjeev Kumar)! भूमिका कोणतीही असो कशीही असो त्यात आपल्या अभिनयाचे रंग भरून ती अजरामर कशी होईल याकडे त्यांचा अधिक कल असायचा. आपल्या पडद्यावरील इमेजचा त्यांनी कधी फारसा बाऊ केला नाही. त्यामुळेच संजीव कुमार यांनी तरुण वयात वृद्धत्वाच्या भूमिका केल्या, ज्या नायिकेसोबत रोमान्स केला दुसऱ्या एका चित्रपटात तिचे ते वडील झाले! प्रत्येक भूमिकेत शिरून त्यांनी ती भूमिका खास त्यांच्या करता आठवली जाईल अशी रंगवली.
जया भादुरीसोबत त्यांनी नायक (अनामिका, नौकर, कोशिश), पिता (परिचय) पती (नौकर) सासरा (शोले) अशा विविध भूमिका साकारल्या. ‘नया दिन नयी रात’ या चित्रपटात त्यांनी नवरसावर आधारित नऊ विविध भूमिका एकाच चित्रपटातून रंगवल्या. गुलजार या प्रतिभान दिग्दर्शकाचे संजीव कुमार (Sanjeev Kumar) हे लाडके अभिनेते होते. त्यामुळे त्यांच्या अनेक चित्रपटातून ते आपल्याला विविध रंगी भूमिका करताना दिसतात. मौसम, आंधी सारखा धीरगंभीर चित्रपट असो किंवा अंगूर सारखा हलकाफुलका विनोदी चित्रपट. गुलजार यांना कायम संजीव कुमार हाच अभिनेता हवा असायचा. खरंतर साठच्या दशकात संजीव कुमार यांचे रुपेरी पडद्यावर आगमन झालं. परंतु जवळपास दहा वर्षे त्यांना बी सी ग्रेड सिनेमात भूमिका कराव्या लागल्या. त्या काळातील अनेक पोशाख, जादुई ही चित्रपटात संजीव कुमार चमकले.
बी नागी रेड्डी यांच्या ‘खिलौना’ या चित्रपटापासून त्यांना खऱ्या अर्थाने प्रेक्षकांनी गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली आणि तिथूनच त्यांच्या अभिनयाचा खरा अध्याय सुरू झाला. अमिताभ बच्चन यांच्यासोबत शोले, त्रिशूल, खुद्दार, फरार या चित्रपटातून ते चमकले तर राजेश खन्नासोबत आपकी कसम या चित्रपटात ते दिसले. दिलीप कुमार यांच्यासोबत संघर्ष आणि विधाता या चित्रपटात त्यांची जुगलबंदी दिसली! बी आर चोप्रा यांच्या एका चित्रपटाततील संजीव कुमार यांच्या वर चित्रित झालेल्या गाण्याच्या शूटिंगचा एक किस्सा खूप मनोरंजक आहे.
१९७८ साली बी आर फिल्मसचा ‘पती पत्नी और वो’ हा एक विनोदी चित्रपट आला होता. यात संजीव कुमार, विद्या सिन्हा आणि सारिका यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट बी आर चोप्रा यांनी दिग्दर्शित केला होता. त्यांना तो झटपट संपवायचा होता. त्यामुळे सिनेमाचे शेड्युल ३० दिवसांचे ठेवले होते. या चित्रपटात एक गाणं होतं ‘ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए गाना आये या ना आये गाना चाहिए’ हे गाणं महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांनी गायलं होतं. गाण्यातील सिच्युएशनप्रमाणे हे गाणं बाथरूममध्ये चित्रित करायचं होतं. चित्रपटाचा शूटिंग सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या गाण्याचे चित्रीकरण होतं. परंतु संजीव कुमार (Sanjeev Kumar) यांनी मात्र हे गाणं इतक्या लवकर चित्रित करायला नकार दिला.
बी आर चोप्रा यांनी कारण विचारला असताना त्यांनी सांगितलं की, ”या गाण्यात तुम्ही मला बाथरूममध्ये अंघोळ करताना दाखवला आहे अर्थातच माझ्या अंगावर अंडर वेअर व्यतिरिक्त कपडा नसेल आणि माझे सुटलेले पोट प्रेक्षकांना दिसेल! या सिनेमाचा मी हिरो आहे. ते कसं दिसेल?” त्यावर चोप्रा म्हणाले, ”काही वावग दिसणार नाही. कारण या चित्रपटात तुमची भूमिका ही एका विवाहित पुरुषाची आहे. त्याला एक सात आठ वर्षाचा मुलगा आहे. त्यामुळे पोट सुटलेला नायक दाखवला तरी काय बिघडणार नाही.” परंतु संजीव कुमार (Sanjeev Kumar) यांनी मात्र या गाण्याचे चित्रीकारणाला त्या वेळी विरोध केला आणि ते म्हणाले, ”आजपासून मी डायटिंग करतो आणि या सिनेमाचा शेवट आपण या गाण्याचे चित्रीकरणाने करूत. तोवर मी व्यायाम आणि डायट याच्याद्वारे माझी सुटलेले पोट कमी करतो!”
बी आर चोप्रा म्हणाले, ”काही हरकत नाही!” कारण त्या गाण्याच्या चित्रीकरणाचा आणि सलगतेचा तसा काहीच परिणाम नव्हता. कंटिन्युटीचा प्रश्न नव्हता. त्यामुळे या गाण्याचे चित्रीकरण सर्वात शेवटी करायचे ठरवले. आता संजीव कुमारने ठरवले की पुढचा महिनाभर फक्त सूप आणि सॅलेड खायचे. बाकी काहीही खायचं नाही. संध्याकाळी रोज जिममध्ये जाऊन व्यायाम करायचा. चोप्रा यांनी देखील संजीव कुमारच्या या प्रतिज्ञेला हातभार लावायचे ठरवले आणि संजीव कुमारचे दुपारचे जेवण फक्त सूप आणि सॅलडस असेच देण्याची व्यवस्था केली.
=========
हे देखील वाचा : अमिताभ बच्चन आणि ‘शावा शावा’ डान्स!
=========
पहिल्या दिवशी लंच टाईममध्ये संजीव कुमारचे सूप आणि सलाड आले आणि बाकी लोकांसाठी बी आर चोप्रा यांनी फिश करी मागवली होती. फिश करीचा सुगंध संजीव कुमारला त्याचे डायटिंगचे व्रत पहिल्याच दिवशी तोडायला भाग पाडले. तो चोप्रा यांना म्हणाला, ”चोप्रा साब डायटिंग उद्यापासून करतो. आज फिश करी खातो.” बी आर चोप्रा फक्त हसले आणि संजीव कुमारने फिश करिवर आडवा हात मारला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार! त्या दिवशी बी आर चोप्रा यांनी सर्वांसाठी चिकन मसाला मागवला होता. ते पाहून संजीव कुमार (Sanjeev Kumar) यांची पुन्हा भूक खवळली आणि डायट विसरले! असं करत करत एकही दिवस त्यांनी सूप आणि सलाड खाल्लेच नाही.
शेवटच्या दिवशी जेव्हा गाण्याचे चित्रीकरण करण्याची वेळ आली तेव्हा त्यांचं वजन पाच किलोने वाढले होते!! बी आर चोप्रा हसून म्हणाले, ”हरीभाई (Sanjeev Kumar) डायट तुम्हारे बस की बात नही!” संजीव कुमार देखील दिलखुलास हसला आणि गाण्याचे चित्रीकरण तसेच पूर्ण केले. अर्थात संजीव कुमारला जी भीती वाटत होती तसं कुठल्याही प्रेक्षकांना काही वावगं वाटलं नाही. संजीव कुमारचे वाढलेले पोट कोणालाही खटकले नाही. आज हा चित्रपट प्रदर्शित होऊन ४६ वर्षे झाली आहेत. चित्रपट विसरला गेला पण हे गाणं मात्र आजही लोकांच्या लक्षात आहेत. तर अशीही संजीव कुमारच्या डायटची कथा आणि व्यथा!