….आणि Lata Mangeshkar आणि सचिन देव बर्मन यांच्यातील मतभेद मिटले!

अभिनेत्री Sadhana चा फेमस ‘साधना कट’ कसा तयार झाला?
अभिनेत्री साधना शिवदासानी हिने १९५८ साली ‘आबना’ सिंधी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर एन्ट्री केली होती. यात तिने अभिनेत्री शीला रामाणी हिच्या लहान बहिणीची भूमिका साकारली होती. त्यापूर्वी आर के फिल्मच्या श्री 420 या चित्रपटातील ‘मुडमुडके ना देख मुडमुडके’ या गाण्यात अभिनेत्री नादीराच्या मागे असलेल्या काही नृत्यांगनांपैकी एक साधना होती. पण एडिटिंग टेबलवर तिचे सर्व शॉट्स कापले गेल्यामुळे साधनाचा पहिला चित्रपट ‘आबना’ हा सिंधी सिनेमा होता. या दरम्यान तिचे काही फोटो फिल्मालयचे शशधर मुखर्जी यांना पाहायला मिळाले त्यांना त्यांच्या नव्या प्रोजेक्ट साठी एक नवीन चेहरा ज्यामध्ये इनोसन्स असेल आणि फ्रेशनेस असेल असा हवा होता.

जो त्यांना साधनाच्या फोटोत मिळाला होता. त्यांनी साधनाला कॉन्टॅक्ट करून स्टुडिओत बोलावले. त्यांना आपल्या मुलाला जॉय मुखर्जी ला लाँच करायचे होते. ते चित्रपट बनवत होते ‘लव इन सिमला’. फिल्म बॅनर तेव्हा अगदीच नवीन होते. चित्रपटाचे दिग्दर्शक आर के नय्यर यांचा देखील हा पहिला चित्रपट होता. जॉय मुखर्जी साधना यांचा देखील पहिला चित्रपट होता. त्यामुळे शशधर मुखर्जी या चित्रपटाबाबत खूप सिरीयस होते थोडेसे नर्वस देखील होते. चित्रपटाच्या प्रत्येक गोष्टीवर त्यांचे बारकाईने लक्ष होतं. चित्रपट सुरू होण्यापूर्वी जॉय मुखर्जी आणि साधना यांना त्यांनी आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये प्रॉपर अभिनयाचे ट्रेनिंग दिले. कॅमेरा फ्रेंडली होण्यासाठी साधनाकडून त्यांनी अनेक शॉट्स स्वतःच्या देखरेखी खाली शूट करून घेतले.
या चित्रपटाच्या दरम्यान जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की साधनाचे कपाळ जरा जास्त मोठे आहे ते कव्हर करायला पाहिजे म्हणून दक्षिण मुंबईच्या एका ब्युटी पार्लरमध्ये साधनाला घेऊन गेले. सोबत दिग्दर्शक आर के नय्यर देखील होते. साधनाच्या या फोर हेडसठी एखादा छोटा विग मिळेल का याची चौकशी केली. त्यावर बरीच चर्चा झाली आणि शेवटी हॉलिवूडची अभिनेत्री Audrey Hepburn तिच्यासारखे केसांची एक स्टाईल करायचे ठरवले. समोरच्या केसांना कपाळावर रुळवायचे हे फायनल झाले. त्या प्रमाणे साधनाची हेअर स्टाईल बदलली गेली.यामुळे तिचे मोठे कपाळ केसांच्या नव्या कटने बऱ्यापैकी झाकले गेले. इथेच साधना कटचा जन्म झाला. त्यावेळी त्यांना माहित नव्हते याच साधना कटवर संपूर्ण भारत वर्षातील तरुणाई जाम फिदा होईल.

साधना चा एकदम कम्प्लीट मेक ओव्हरच झाला. तिच्या सौंदर्यात या साधना कटमुळे आणखी भर पडली. ‘लव्ह इन सिमला’ चित्रपट 1960 साली प्रदर्शित झाला आणि सुपर डुपर हिट झाला. साधना पहिल्याच चित्रपटातून लाखो दिलांची राणी झाली. यानंतर तिला कधीच मागे वळून पाहावे लागले नाही. एक मुसाफिर एक हसीना, हम दोनो, असली नकली, मेरे मेहबूब, वक्त, आरजू, राजकुमार… अशा एका पेक्षा एक हिट सिनेमांची रांगच तिने निर्माण केली. मिस्ट्री गर्ल म्हणून ती तुफान लोकप्रिय झाली. वो कौन थी,मेरा साया या सिनेमातील तिच्या गूढ नायिकेच्या भूमिका विशेष लक्षात राहिल्या. ‘’हम दोनो’ चित्रपटातील ‘अभी न जाओ छोडकर के दिल अभी भरा नही…’ या प्रेमगीताची मोहिनी अद्याप कायम आहे. हे गाणे भारतातील सर्वोत्कृष्ट प्रेमगीत आहे असे शाहरुख खानने मध्यंतरी म्हटले होते.
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!
================================
साधना आजही रसिकांना आठवते तिच्यावर चित्रित गाण्यांमुळे. ‘अजी रूठ कर अब कहां जाइयेगा’ (आरजू), ‘कौन आया की निगाहो में चमक जग उठी’ (वक्त), ‘आप युंही अगर हमसे मिलते रहे’ (एक मुसाफिर एक हसीना), ‘लग जा गले की फिर ये हंसी रात हो न हो’ (वो कौन थी?), ‘नयनो में बदरा छाये’ (मेरा साया), ‘आजा आई बहार दिल है बेकरार’ (राजकुमार), ‘तेरा मेरा प्यार अमर फिर क्यू मुझको लगता है डर’ (असली नकली), ‘बेदर्दी बालमा तुझको मेरा मन याद करता है’ (आरजू), ‘तेरे प्यार मी दिलदार जो है मेरा हालेदार’ (मेरे मेहबूब). आपल्या अप्रतिम सौंदर्य आणि जानलेवा हेअर कट ने साधनाने आपली उणी पुरी दहा-बारा वर्षांची कारकीर्द गाजवली. चुडीदार कुर्ता आणि हेअर फ्रिंज च्या फेमस साधना कट ने ती fashion icon बनली होती.