शम्मी कपूरने लांबवली होती चक्क डॉक्टरची बॅग!!
काही कलावंतांच्या खूप अजीबो गरीब अशा विचित्र आजार असतात. आजार म्हणण्याच्या ऐवजी सवयी म्हटलं तरी चालेल आणि या सवयींना सामाजिक मान्यता अजिबात नसते. पण हा एक आजार आहे मेडिकल सायन्सने देखील या आजाराला मान्यता दिली आहे. हा आजार आहे ‘क्लिप्टोमॅनिया’. या आजारामध्ये रुग्णाला थ्रिल म्हणून चोरी करायची आवड असते. चोरी करणे हा त्यांचा उद्देश कधीच नसतो. स्वतःसाठी चोरी हा कधीच करत नसतो फक्त यातून त्याला एक थ्रिल मिळवायचे असते आणि त्याचं मन अशा चोरी करायला उद्युक्त करत असते. म्हणून यातून अशा गोष्टी घडत असतात. (Shammi Kapoor)
हा तसं म्हटलं तर फार गंभीर आजार नाही. शारीरिक व्याधी नाही. पण या सवयीने ती व्यक्ती अडचणीत येवू शकते. समाजात बदनामी होवू शकते. चार चौघात लज्जित व्हावे लागते. समाजातील लोकांना या आजाराची सवयीची माहिती नसल्याने अनेक गैरसमज निर्माण होवू शकतात. (महेश मांजरेकर यांच्या ‘दे धक्का’ या चित्रपटात सिद्धार्थ जाधवला आजार दाखवला आहे.) गंमत म्हणून ठीक आहे पण जर हा आजार बळावला तर कठीण असते. आज काल यासाठी प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट सुरू झालेली आहे.
पण ६०-७० वर्षांपूर्वी असला काही प्रकार नव्हता आणि त्याच काळात अभिनेता शम्मी कपूरला या सवयीने ग्रासले होते. शम्मी कपूरने दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये हा किस्सा सांगितला आहे. शम्मी कपूर सिनेमात येण्यापूर्वी पृथ्वी थिएटर्समध्ये काम करत होता. पृथ्वीराज कपूरने आपल्या सर्व मुलांना शिस्तीची सवय लावली होती. त्यामुळे शम्मी तेव्हा चक्क लोकल आणि बेस्ट बसने प्रवास करायचा. एकदा एका बस स्टॉपवर शम्मी कपूर (Shammi Kapoor) उभा होता. बस काही येत नव्हती. म्हणून त्याने लिफ्ट घ्यायचे ठरवले.
=========
हे देखील वाचा : साहिर लुधियानवी यांच्यामुळे मिळाली गीतकारांना स्वतंत्र ओळख!
=========
एका कारला लिफ्टसाठी हात केला. कारचालकाने गाडी थांबवली आणि शम्मी कपूरला आत घेतले. काही वेळानंतर जेव्हा शम्मी कपूर (Shammi Kapoor)चे उतरण्याचे ठिकाण आले तेव्हा शम्मी कपूरने गाडी साईडला घ्यायला सांगितली आणि थँक्यू म्हणून तो गाडीतून उतरला. परंतु गाडीतून उतरता उतरता त्याने मागच्या सीटवर असलेली त्या व्यक्तीची एक छोटी बँक आपल्या सोबत घेतली! घरी गेल्यानंतर त्याने ती बॅग उघडून पाहिली. तर त्याच्या लक्षात आले कि ती एक मेडिकल कीट होती. ज्यामध्ये स्टेथस्कोप होता, बीपी मोजायचे मशीन होते, इंजेक्शन्स होती, काही औषध होती. यावरून त्याच्या लक्षात आले की कार चालक डॉक्टर होता. शम्मीला खूप वाईट वाटले.
आपल्या या सवयीमुळे कुणा पेशंटला मदत मिळाली नसेल. कुणाला इंजेक्शन वेळेवर मिळाली नसतील. त्या रात्री शम्मी झोपू शकला नाही. त्याने ती बॅग परत करायचा प्रयत्न केला. पुन्हा ती बॅग घेऊन तो बस स्टॉपवर गेला. दिवसभर त्या कारची वाट पाहू लागला. असं दोन-चार दिवस केल्यानंतर देखील त्याला डॉक्टर काही भेटले नाहीत. त्याने आजूबाजूच्या हॉस्पिटलमध्ये देखील चौकशी केली पण डॉक्टरचा शोध लागला नाही.
===========
हे देखील वाचा : ‘कस्मे वादे निभायेंगे हम…’ गाण्याच्या मेकिंगची भन्नाट गोष्ट!
===========
शम्मी कपूर (Shammi Kapoor)ने त्या मुलाखतीत सांगितले, ”मला त्या कीटची खूप गंमत वाटली. त्यातील सिरींज आणि घेऊन मी इंजेक्शन देखील देत होतो. घरात असलेल्या खेळण्यांना मी इंजेक्शन देत असायचो.” या घटने नंतर मात्र कालांतराने शम्मीचा हा आजार किंवा ही सवय कमी झाली. या मुलाखतीत त्याने हा किस्सा व्यक्त केला होता त्यात त्यांनी असे सांगितले की, ”या सवयीचे बळी शक्यतो श्रीमंत लोक असतात. सेलिब्रिटीज असतात. त्यामुळेच आपल्याकडील बरेच सेलिब्रेटी हे परदेशात मॉलमधून काही गोष्टी उचलताना दिसतात. जर खंबीर पणे मनाने ठरवले तर ही सवय दूर होऊ शकते!”