दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
‘चालत राहणं हेच जीवन’ याचं यथार्थ उदाहरण म्हणजे शरद पोंक्षे!
संकट सांगून येत नाही! ते अचानकच येतं! त्यामुळे त्याच्यावर मात करणं काहींना अजिबातच जमत नाही, काही त्यात हेलकावे खातात, काही तडजोडी करतात तर काही हसतमुखाने सामना करतात. त्यातही एखादंच संकट आलं तर समजू शकतो, पण एकावर एक संकटं येतच गेली की अनेकदा खचायला होतं. पण आपल्या मराठी इंडस्ट्री मध्ये असा एक अभिनेता आहे जो मोठमोठ्या संकटांसामोर एखाद्या हिमालयासारखा उभा राहतो! तुमच्या लक्षात आलंच असेल मी शरद पोंक्षेंबद्दल बोलतेय ते!
‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाला झालेल्या विरोधापासून दौऱ्यांमध्ये आलेल्या अडथळ्यांपर्यंत सगळ्याला शरद पोंक्षे धैर्याने सामोरे गेले. पुढे कॅन्सर झाल्यावरही हा लढवय्या खचला नाही. त्याचाही धीराने, संयमाने सामना करून पुन्हा आपल्या अभिनयाची सावली प्रेक्षकांना द्यायला तो अभेद्य हिमालय होऊन उभा राहिला! ‘हिमालयाची सावली’ नाटकाची तालीम चांगली तीन महिने चालू असताना शरद पोंक्षे मात्र फक्त शेवटचे 12 दिवस तालीम करून सर्व कलाकारांच्या बरोबर नुसते उभे नाही राहिले तर अक्षरशः ती भूमिका जगले.
मार्च महिन्या पासून एक मोठं संकट आपल्या सगळ्यांवरच येऊन ठेपलं आणि आपण सगळेच एका जागी अडकून पडलो. जीवनावश्यक गोष्टी सोडून बाकी सगळं बंद! सिनेमा, मालिका, नाटक सगळंच ठप्प! वाईटातून चांगलं हे की कधी नव्हे ते कलाकार घरातल्यांना वेळ देऊ शकले. आपापले छंद जोपासू शकले. पण किती दिवस? एकदा का कामासाठी बाहेर राहायची, लोकांच्या संपर्कात राहायची सवय झाली की काम न करता एका जागी राहणं कठीण होऊन बसतं. त्यातच पैशांचं गणित कोलमडतं. पण कलाकार जर शरद पोंक्षेंसारखा हरहुन्नरी असेल तर तो या संधीचंही सोनं करतो!
‘हिमालयाची सावली’ नाटकाची तालीम बाराच दिवस केल्याने नाटकातल्या नवीन कलाकारांना शरद पोंक्षेंचा हवा तसा सहवास लाभला नव्हता. त्यांना जेव्हा नाटकात मुख्य भूमिकेत शरद पोंक्षे आहेत असं सांगण्यात आलं तेव्हा अर्थातच अश्या जेष्ठ अभिनेत्याकडून तालमी दरम्यान खूप काही शिकायला मिळेल अशी त्यांची धारणा बनली होती. परंतु डॉक्टरांनी शरद पोंक्षेंना तालीम करण्याची परवानगी देईस्तोवर नाटकाच्या शुभरंभाच्या आधीचे मोजून बारा दिवस उरले होते आणि त्यात त्यांचं हे स्वप्न अपूर्ण राहिलं. एक चांगला माणूसच चांगला कलाकार होऊ शकतो असं शरद पोंक्षे नेहमी म्हणतात. मग या चांगल्या माणसाला आपल्या सहकलाकरांच्या या स्वप्नाची आठवण नसती झाली तरच नवल. लॉकडाऊन चालू झाल्यावर थोड्याच दिवसात त्यांनी आपल्या या सहकलाकारांचे झूम ऍपवर वर्कशॉप घ्यायला सुरुवात केली! नाटक म्हणजे काय इथं पासून सुरू करून स्वगतं पाठ करणं, त्याचं सादरीकरण, निरीक्षण, अभ्यास या सगळ्यावर सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केलं.
यातूनच मग या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी सशुल्क ऑनलाईन वर्कशॉप घ्यायची कल्पना त्यांना सुचली. तशी फेसबुक वर पोस्ट टाकल्यावर अर्थातच त्यांना प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. त्यातील काही निवडक विद्यार्थ्यांना घेऊन पाहिलं वर्कशॉप चालू झालं. पण वाढत्या विचारणेला लक्षात घेता एका वर्कशॉपवर भागणार नव्हतं. त्यातच अमेरिकेतूनही बऱ्याच जणांनी शिकण्याची इच्छा दर्शवली. मग संध्याकाळी भारतातल्या विद्यार्थ्यांसाठी आणि सकाळी अमेरिकेतल्या विद्यार्थ्यांसाठी अश्या दोन बॅचेस सुरू झाल्या. जिथे कामकाज बंद म्हणून लोक उशिरा उठत होते तिथे पोंक्षे सकाळी 4 ला उठून नित्यकर्म आवरून साडेसहाला अमेरिकेतल्या विद्यार्थ्यांना अभिनयाचे धडे देत होते. रोज दोन तास असे 10 दिवस चालणाऱ्या या वर्कशॉप मध्ये वाचनावर भर दिला गेला. नाट्यवाचन, अभिवाचन म्हणजे काय हे उलगडून सांगण्यात आलं. त्याकरता लागणारे श्वासांचे व्यायाम करून घेतले गेले. प्रत्येकाला वैयक्तिक वेळ देता यावा म्हणून मोजकेच विद्यार्थी एका बॅच मध्ये घेऊन प्रत्येकाकडून सराव करून घेण्यात आला. इतकंच नाही तर शेवटच्या दिवशी सगळ्यांनी वेशभूषा वगैरे करून, निवेदन व इतर नियोजन करून ऑनलाईन कार्यक्रमही सादर केला. गेल्या 3 महिन्यात अश्या एकूण 4 बॅचेस शरद पोंक्षेंनी घेतल्या. नुकतीच दुबईतल्या इच्छुक लोकांसाठी वर्कशॉप घेण्याबाबत त्यांना विचारणा करण्यात आली आहे. इतरही काही संस्थांशी त्यांचं या बाबत बोलणं सुरू आहे.
जेव्हा जग थांबलं, तेव्हाही हा माणूस थांबला नाही. या ना त्या मार्गाने काम चालू राहिलंच पाहिजे हा शिरस्ता आणि ज्याची इच्छा असते त्याला मार्ग सापडतोच. ‘चालत राहणं हेच जीवन’ याचं यथार्थ उदाहरण म्हणजे शरद पोंक्षे! त्यांच्या या उपक्रमाला कलाकृती मीडिया कडून भरभरून शुभेच्छा!
स्वरांगी बापट