Maya Marathi Movie: नात्यांची निःशब्द कहाणी सांगणाऱ्या सिनेमाचे मोशन पोस्टर

SHATAK : RSS शताब्दीच्या निमित्ताने ‘शतक’ चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत प्रदर्शित!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘शतक: संघ के १०० वर्ष’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत एका विशेष सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या संघटनेच्या शंभर वर्षांच्या प्रवासावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. हा ट्रेलर संघाचे अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचे सदस्य आणि ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. मनमोहन वैद्य यांच्या हस्ते अनावरण करण्यात आला. ट्रेलरच्या अधिकृत प्रकाशनाआधी निर्मात्यांकडून निवडक माध्यम प्रतिनिधींसाठी खास प्रिव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष प्रदर्शनात पत्रकारांना चित्रपटाचा आशय, मांडणी आणि दृष्टीकोन समजून घेण्याची संधी मिळाली. डॉ. मनमोहन वैद्य यांच्या उपस्थितीमुळे या प्रिव्ह्यूला विशेष महत्त्व प्राप्त झाले.(SHATAK Trailer)

२०२५ हे वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी ऐतिहासिक ठरले आहे. १९२५ मध्ये स्थापन झालेल्या संघाने या वर्षी आपल्या कार्याचा शंभरावा वर्षपूर्तीचा टप्पा गाठला. या दीर्घ प्रवासात संघाने सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक पातळीवर देशावर मोठा प्रभाव टाकला आहे. मात्र त्याच वेळी संघाबाबत अनेक वाद, आरोप आणि गैरसमजही वेळोवेळी निर्माण झाले. ‘शतक’ हा चित्रपट या पार्श्वभूमीवर संघाच्या इतिहासाकडे अधिक सखोल, वस्तुनिष्ठ आणि समतोल दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करतो.

ट्रेलरमधून संघाची स्थापना डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी कशी केली, तसेच एम. एस. गोळवलकर (गुरुजी) यांच्या नेतृत्वाखाली संघाची संघटनात्मक रचना कशी मजबूत झाली, याची झलक पाहायला मिळते. शिस्त, मूल्याधिष्ठित कार्यपद्धती आणि दीर्घकालीन राष्ट्रदृष्टी यांवर आधारित संघाचा शतकी प्रवास चित्रपटात संघाच्या दृष्टिकोनातून मांडण्यात आला आहे. या चित्रपटाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे संघासंदर्भातील प्रचलित गैरसमजांवर टाकलेला प्रकाश. स्वातंत्र्यलढ्यातील संघाची भूमिका, विविध काळात आलेल्या बंदी, आणीबाणीचा कालखंड अशा संवेदनशील आणि अनेकदा दुर्लक्षित राहिलेल्या घटनांचा चित्रपटात उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना संघाच्या इतिहासाकडे केवळ आरोपांच्या चौकटीत न पाहता संदर्भासहित समजून घेण्याची संधी मिळणार आहे. (SHATAK Trailer)
===============================
हे देखील वाचा: Sairat सिनेमातील परशा उतरणार राजकारणाच्या मैदानात? वायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण
===============================
ट्रेलर लाँचवेळी बोलताना डॉ. मनमोहन वैद्य यांनी ‘शतक’ या चित्रपटाचे कौतुक केले. संघाची कथा समाजासमोर मांडण्यासाठी चित्रपटासारखे प्रभावी माध्यम वापरणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. या चित्रपटामुळे संघाबाबतची उत्सुकता वाढेल आणि अधिकाधिक लोकांपर्यंत संघाचा प्रवास पोहोचेल, असेही त्यांनी सांगितले. निर्माते आणि दिग्दर्शकांनी हा विषय अतिशय संवेदनशीलतेने आणि सर्जनशीलतेने हाताळल्याचे त्यांनी अधोरेखित केले.