Nikamma Movie Review: मनोरंजनाची फोटोकॉपी
बॉलिवूडनं रिमेकचं समीकरण आता सोडायला हवं. मध्यंतरीच्या वर्षात हिंदी रिमेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर फारशी चमकदार कामगिरी करू शकले नाही. काही सिनेमे तर पुरते आपटले; तरी देखील बॉलिवूडची रिमेकची फॅक्ट्री सुरुच आहे. सिनेनिर्माते, दिग्दर्शकांनी दाक्षिणात्य भाषेतील सिनेमांचा रिमेक करण्याच्या मोहातून बाहेर पडायला हवे. (Nikamma Movie Review)
आजच्या तारखेला प्रेक्षकांना देशभरातील सर्व प्रादेशिक सिनेमे असो किंवा हॉलिवूडपट; ओटीटीच्या स्क्रीनवर ते सहज उपलब्ध आहे. हे असं सर्व असताना देखील शिल्पा शेट्टी, अभिमन्यु दासानी, शर्ली सेतिया आणि समीर सोनी यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘निकम्मा’ सिनेमाचा घाट दिग्दर्शक शब्बीर खान घातला आहे. जो २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगू सिनेमा ‘मिडल क्लास अब्बाई’ (MCA) चा हिंदी रिमेक आहे. (Nikamma Movie Review)
‘मर्द को दर्द नहीं होता’ सारख्या चित्रपटातून उत्तम पदार्पण करणाऱ्या अभिमन्यू दासानीला ‘निकम्मा’ सारखा सिनेमा का करावा वाटला असावा? याची कल्पना करणे फार कठीण आहे. सोबतच शिल्पा शेट्टी या सिनेमांच्या निमित्तानं मोठ्या पडद्यावर कमबॅक करतेय; तिनं तरी आजवरच्या तिच्या अनुभवाच्या जोरावर सिनेमाचा उत्तम विषय आणि विशेष म्हणजे नवी कोरी कथा निवडायला हवी होती. या चित्रपटात अॅक्शन आहे आणि कॉमेडीही आहे, पण सिनेमा पाहता पाहता आपण आपली झोप आवरु शकत नाही. (Nikamma Movie Review)
अभिमन्यू अशा एका मुलाची भूमिका साकारत आहे जो पूर्णपणे निरुपयोगी आहे. सिनेमाच्या नावाप्रमाणे तो ‘निकम्मा’ आहे. काही काम धंदा न करता दिवसभर उनाडक्या करणं, मित्रांबरोबर मजा-मस्ती करणं, पार्टी करणं; यात आदि (अभिमन्यू) रमलेला आहे. पण, त्याच्या आयुष्यात असं काहीतरी घडतं की, ही त्याची जीवनशैली बदलून जाते.
अचानक सुपरवुमन असलेल्या शिल्पा शेट्टीची कथानकात एंट्री होते. आरामदायी जीवन जगणारा आदि पूर्णपणे बदलतो. ॲक्शन-रोमँटिक-कॉमेडी असं सर्वकाही यात आहे. पण, ते सारं कंटाळवाणं आहे. चित्रपटात शिल्पा अभिमन्यूच्या वहिनीची भूमिका करत आहे. अभिमन्यू आपल्या वहिनीचा खूप आदर करतो आणि घाबरतो. ‘सुपर वुमन’च्या स्टाईलमध्ये शिल्पा शेट्टीची एंट्री आहे; (त्यातल्या त्यात हा भाग काहीसा रंजक आहे.) (Nikamma Movie Review)
========
हे देखील वाचा – Medium Spicy Movie Review: निस्सीम शांततेचा कल्लोळ
========
आता अभिमन्यू शिल्पाला इतका का घाबरतो हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. शिल्पा शेट्टीला बऱ्याच दिवसांनी पडद्यावर पाहणे खूप मनोरंजक होते. अभिमन्यूनेही बरं काम केलं आहे. शर्ली सेटियाचा हा बॉलीवूड डेब्यू चित्रपट असून तिने तिची व्यक्तिरेखा चोख बजावली आहे. सिनेमात तिची व्यक्तिरेखा महत्वपूर्ण आहे; ती का ते तुम्ही सिनेमातच पाहा. पण, स्वतःच्या रिस्क वर.. बाकी जेव्हा कधी सिनेमा ओटीटीवर किंवा टीव्हीवर येईल; तेव्हा पाहिला तरी चालले. (Nikamma Movie Review)
सिनेमा : निकम्मा
निर्मिती : सोनी पिक्चर्स
दिग्दर्शक : शब्बीर खान
लेखन : वेणू श्रीराम, सनमजीत तलवार
कलाकार : शिल्पा शेट्टी, अभिमन्यु दासानी, शर्ली सेतिया
छायांकन : हरी वेदांत
संकलन : मनन अजय सागर
दर्जा : दोन स्टार