‘लागीर झालं जी’ मालिकेतील शीतली आणि अरुंधतीचं खऱ्या आयुष्यात आहे खास नातं? जाणून घ्या अधिक
‘लागीर झालं जी’ या मालिकेतून शीतली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर सर्वांच्या भेटीला आली होती. अभिनेत्री शिवानी बावकरने ही भूमिका अगदी चोखपने साकारली आणि याच मालिकेमुळे शिवानीला प्रचंड लोकप्रियता सुद्धा मिळाली होती. लागीर झालं जी या मालिकेत अज्या आणि शितलीची प्रेमकहाणी दाखवण्यात आली होती, जी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. तब्बल अडीच वर्ष ही मालिका छोट्या पडद्यावर आपली जादू दाखवत होती. या मालिकेतील शीतलीचा ‘लाखात एक माझा फौजी’ हा डायलॉग विशेष गाजला होता. अखेर २२ जून २०१९ ला या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. (Shivani Baokar Birthday)
या मालिकेतुन घराघरात पोहचलेली शीतली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकरचा आज (११ मार्च) वाढदिवस आहे. आज ती २९ वा वाढदिवस साजरा करत आहे आणि याच निमित्ताने आपण या अभिनेत्रीबाबत एक खास गोष्ट जाणून घेणार आहोत.
शिवानी बावकरने ‘लागीर झालं जी’ या मालिकेनंतर नंतर अनेक मालिका केल्या आहेत. नुकतीच तिची झी वाहिनीवर ‘लवंगी मिरची’ ही नवी मालिकासुद्धा सुरु झाली आहे. १३ फेब्रुवारीपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे. ‘लागीर झालं जी’ या मालिकेतील भूमिकेप्रमाणेच या नव्या मालिकेत सुद्धा शिवनीचा ठसकेबाज आणि बिनधास्त अंदाज चाहत्यांना पाहायला मिळत आहे.
त्याचप्रमाणे सध्या स्टार प्रवाह या वाहिनीवर ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. घरातला प्रत्येकजण तिला गृहीत धरत असतो. एकाचवेळी आई, सून, मुलगी, पत्नी, वहिनी अश्या अनेक जबाबदाऱ्या ती कोणतीही तक्रार न करता पार पाडत असते. तिच्या कामाचा मोबदला सोडाच पण साधं कौतुकही तिच्या वाट्याला येत नाही. घरासाठी आयुष्यभर राबणाऱ्या या माऊलीचं महत्त्व पटवून देणारी ‘आई कुठे काय करते’ ही मालिका स्टार प्रवाहवर २३ डिसेंबर २०१९ पासून सुरु झाली. आणि काही दिवसातच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतही नेहमीच अव्वल असते. या मालिकेतील मुख्य नायिका अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर. मधुराणीला या मालिकेमुळे अफाट लोकप्रियता मिळाली आहे.(Shivani Baokar Birthday)
आता तुम्हाला वाटेल की, आम्ही तुम्हाला शिवानी आणि मधुरानी यांच्या बद्दल का सांगत आहोत तर त्या मागे तस कारण ही आहे. तुम्हाला माहितेय का? शिवानी आणि मधुराणी यांचं खऱ्या आयुष्यात एक खास नातं आहे. हो, शिवानी ही मधुराणीची विद्यार्थिनी आहे. वाटलं ना आश्चर्य? पण हे खरं आहे. मधुराणी प्रभुलकर आणि त्यांचे प्रमोद प्रभूलकर एकत्र एक अभिनय क्लास चालवतात. आणि याच क्लासमध्ये शिवानीने अभिनयाचे धडे गिरवले आहेत. इतकंच नव्हे तर अभिनेत्री हृता दुर्गुळेसुद्धा मधुराणीचीच विद्यार्थीनी आहे.
==========
(हे ही वाचा: या लोकप्रिय मराठी मालिकांचं कथानक नाही ‘ओरिजिनल’; आहेत अन्य भाषांतील मालिकांचे रिमेक)
=========
शिवानी बावकर काम करत असलेल्या ‘लवंगी मिरची’ या मालिकेला ही प्रेक्षकांच प्रेम मिळतय. शिवानीला मालिकेतील भूमिकेविषयी विचारण्यात आले होते तेव्हा ती म्हणाली होती,”जशी लवंगी मिरची खूप तिखट असते आणि जे ‘अस्मी’ नावाचे पात्र मी साकारत आहे, ते देखील खूप तिखट आहे. अस्मीचा या मालिकेमध्ये एक डायलॉग आहे ‘समोरचा जेवढा खट, अस्मी तेवढीच तिखट. म्हणजे जर तुम्ही अस्मीच्या वाकड्यात शिरलात, तर तुमच काही खरं नाही. अस्मी जितकी तीक्ष्ण आहे, तितकीच ती जबाबदार आहे, आणि तिची ही वागणूक तिच्या जबाबदाऱ्यांमधून येते.