
Shole : ‘शोले’ १९५३ सालीही पडद्यावर आला होता…
‘शोले’असे म्हणेपर्यंत तो १९७५ सालचा चित्रपट. इतकेच नव्हे तर मुंबईत १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रदर्शित झाला. हे चित्रपट रसिकांच्या किमान तीन पिढ्यांच्या डोळ्यासमोर येतेच. पुढच्याच शुक्रवारी म्हणजे २२ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, बंगाल व हैदराबाद (निझाम) येथे, तर २९ ऑगस्ट रोजी गुजरात, राजस्थानमध्ये असा प्रदर्शित होत होत शहरांतून ग्रामीण भागात गेला हे आता सांगावेच लागत नाही. असे असून देखील १९५३ साली देखिल ‘शोले’ नावाचा चित्रपट पडद्यावर आला होता? याचे उत्तर चक्क होय असेच आहे.

एकाच नावाचे दोन, कधी तीन देखिल चित्रपट पडद्यावर आले आहेत. एखाद्या चित्रपटाचे नाव पुन्हा वापरले जाऊ नये म्हणून ते कायमस्वरुपी नोंदवावे लागते. अर्थात एकाच नावाचा चित्रपट पुन्हा येतो तेव्हा त्यात काही वर्षांचे अंतर असते, कधी भाषाच भिन्न असतात. थीमनुसार चित्रपटाचे नाव निश्चित करायचयं तर एखादे नाव पुन्हा एकदा निर्माता व दिग्दर्शक आपल्या कलाकृतीला देतो. आपल्या चित्रपटाचे नाव चित्रपट निर्मात्यांची संस्था इम्पा (इंडियन मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड) या संस्थेत ठराविक फी भरुन नोंदवावे लागते. तोही एक वेगळा विषय आहे. त्यात काही गंमती जंमतीही घडतात.
================================
हे देखील वाचा : आणीबाणी उठली आणि Dada Kondke यांनी आपल्या पिक्चरचे नाव ठेवले ‘रामराम गंगाराम’
=================================
१९५३ च्या त्रिभुवन प्रोडक्शन्स निर्मित ‘शोले’चे दिग्दर्शक बी.आर.चोप्रा हे आहेत. बी.आर.चोप्रा म्हणताच ‘नया दौर’ , ‘कानून’, ‘गुमराह’, ‘हमराज’ असे साठच्या दशकापासूनचे अनेक चित्रपट पटकन डोळ्यासमोर येणारच. त्यानंतरही त्यांनी ‘दास्तान’, ‘धुन्द’, ‘पती पत्नी और वो’, तवायफ, ‘द बर्निंग ट्रेन’ असे विविध थीमचे चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांनी आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात ‘शोले’ चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अशोककुमार, बीना रॉय, पूर्णिमा इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला धनीराम यांचे संगीत आहे. ‘पत्थर का मिला तकिया बरखा की रुत है’, ‘एक परदेसी लूट गया पपीहा रे’ असे त्याचे कथासूत्र आहे.
यू ट्यूबवर हा ‘शोले’उपलब्ध आहे. या चित्रपटाची सुरुवातच रुळांवर श्रेयनामावली पुढे सरकत राहते अशी आहे. ट्रेन वेगाने धावतेय आणि त्यावर त्याच वेगाने श्रेयनामावली आहे. ही कल्पनाच त्या काळात भन्नाट ठरली असावी. हा चित्रपट फारसा यशस्वी ठरला नाही. रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ची यशोगाथा चित्रपटाला पन्नास वर्ष पूर्ण होऊन देखिल संपलेली नाही. बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘शोले’या चित्रपटाशी त्याचे केवळ नामसाम्य. दोन्हीचा कथाआशय पूर्णपणे वेगळाच. पण १९५३ साली देखिल ‘शोले’नावाचा चित्रपट आपल्यासमोर आला होता हे ऐकताच त्या चित्रपटाबाबत कुतूहल निर्माण होते, उत्सुकता वाढते हे उल्लेखनीय आहे.
================================
हे देखील वाचा: Sholay : स्पर्धेत टिकले कोण? गळपटले कोण
=================================
१९५३ च्या या ‘शोले’ चित्रपटातील ‘ऐ दिल तू कहीं ले चल’ हे हेमंत कुमारने गायलेले गाणे लोकप्रिय झाले. याचे गीतकार कामील रशीद असून संगीत नरेश भट्टाचार्य यांचे आहे. या सिनेमाला चार गीतकार व दोन संगीतकार आहेत. गीतकार कामील रशीद, सरस्वती कुमार दीपक,साहीर लुधियानवी व मजरूह सुलतानपुरी आहेत. तर संगीतकार धनीराम व नरेश भट्टाचार्य आहेत.
आज देश विदेशात ‘शोले’चे विविध प्रकारे जोरदार सेलिब्रेशन सुरु आहे. त्यात या १९५३ च्याही ‘शोले’ची दखल हवीच. भारतीय चित्रपटसृष्टीवर फोकस टाकताना जी. पी.सिप्पी निर्मित ‘शोले’ (१९७५) पूर्वीचा व नंतरचा चित्रपट अशी मांडणी केली जाते, त्यात १९५३ सालचा ‘शोले’देखील सांगायलाच हवा. होय ना? १९७५ साली ‘शोले’ अफाट लोकप्रिय ठरल्यानंतर तर नावात शोले (सुखदेव दिग्दर्शित ‘दो शोले’ वगैरै नावाचे चित्रपट) आणि ‘शोले’चे फसलेले रिमेक (रामगोपाल वर्मा की आग वगैरे) असे अनेक चित्रपट पडद्यावर आले व गेले. ‘शोले’चे मोठेपण मात्र कायम राहिले….आणि ते यापुढेही राहिलच.