उद्योजक, वृत्त निवेदक आणि अभिनेता : श्रीजीत मराठे
सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘शुभमंगल ऑनलाईन’ ही मालिका खूप रंजक वळणावर आली आहे. ऐश्वर्या, शंतनू आणि शर्वरी यांच्या केस विषयी लोकांना कमालीची उत्सुकता आहे. याच मालिकेत कीर्तिकुमार वकिलांनी आणलेला खोटा किरण सामंत ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची सुद्धा चर्चा होत आहे. ही भूमिका साकारली आहे ‘श्रीजीत मराठे’ या अभिनेत्याने.
श्रीजीत (Shreejit Marathe) हा मुळात कोकण प्रांतातला. जामसंडे, देवगड या ठिकाणी त्याचं शिक्षण झालं. श्री. स. ह. केळकर कॉलेजचा तो विद्यार्थी होता. अभिनयाची त्याला सुरुवातीपासूनच आवड होती. कॉलेजला असताना युवा महोत्सवासाठी त्याने अनेक एकांकिका केल्या. त्याच्या ‘चित्रकथी’ नामक एकांकिकेला खुप पारितोषिके मिळाली होती. मुख्य म्हणजे कणकवली येथील ‘नाथ पै’ ही अतिशय प्रतिष्ठित समजली जाणारी अशी एकांकिका स्पर्धा. त्यात देखील चित्रकथी ला बक्षीस मिळाले होते. मग गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड अशा सर्व ठिकाणी त्यांनी अनेक स्पर्धेत सहभागी होऊन बक्षिसे मिळवली.
पदवीनंतर श्रीजीत मुंबईत आला आणि त्याला ‘लोच्या झाला रे’ या नाटकात रिप्लेसमेंट करायला मिळाली. या नाटकाच्या जवळजवळ शंभर प्रयोगात त्याने काम केले. ‘चल इश्क कर ले’ या नाटकात देखील त्याने काम केलं. त्या वेळी आदेश बांदेकर याने श्रीजीतला ‘स्टार माझा’ नामक वृत्तवाहिनी बद्दल सांगितले.
स्टार माझा वृत्तवाहिनी साठी त्याने मुलाखत दिली आणि मग तो ‘स्टार माझा’ वाहिनीवर निवेदक झाला. त्याला पहिल्याच वर्षी सर्वोत्कृष्ट न्यूज अँकर साठी मटा सन्मान पुरस्कार मिळाला. श्रीजीत म्हणतो , “स्टार माझा ने माझ्या नावाला, चेहऱ्याला प्रसिद्धी दिली. लोकसभा निवडणुकीचे कव्हरेज असो किंवा कोणाच्या मुलाखतीचा कार्यक्रम, एक निवेदक म्हणून खूप शिकायला मिळालं.”
मुळात अभिनयाची आवड असलेल्या श्रीजीतनं स्टार माझाची नोकरी सोडली आणि अभिनय क्षेत्रातील त्याचे स्ट्रगल सुरु झाले. सात आठ महिने त्याच्याकडे काहीच काम नव्हतं. तेव्हा आपला हा निर्णय चुकला तर नाही ना, असंही त्याला वाटलं होतं. त्याच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्याला धर्मकन्या आणि ‘कालाय तस्मै नमः’ या मालिका मिळाल्या. मग नीना कुळकर्णी दिग्दर्शित ‘महासागर’ या नाटकात देखील त्याने भूमिका केली. सुंदर माझं घर, दोन किनारे दोघी आपण या मालिकेतही त्याच्या भूमिका होत्या. ‘देवयानी’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील त्याची भूमिका लोकांच्या लक्षात राहिली. मग अचानक त्याला त्याच्या गावी देवगड इथं जावं लागलं. तिथली शेतीवाडी, आंब्याच्या बागा याकडे देखील त्याने लक्ष दिलं. औरंगाबाद येथील ए एम न्यूज वाहिनीवर सुद्धा त्याने न्यूज अँकर म्हणून काम केलं. मग लॉकडाउनच्या काळानंतर तो पुन्हा मुंबईला आला.
वैजू नंबर वन या स्टार प्रवाहवरील मालिकेत त्याने भूमिका केली. शुभमंगल ऑनलाईन (Shubhmangal online) मालिकेतील व्यक्तिरेखेबद्दल तो म्हणतो, “मला नकारात्मक शेड्स असलेल्या व्यक्तिरेखा विशेष आवडतात. या मालिकेत किरण सामंत (खोटा) हे पात्र साकारताना आव्हानात्मक वाटतं. कदाचित सध्या मी दाढी ठेवल्याने हा लूक लोकांना आवडत असावा. या भूमिकेचा मला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे.”
श्रीजीत एक उद्योजक पण आहे. कोकणातील लोकांना घेऊन कोकणची उत्पादने संपूर्ण जगभरात पोचविता यावीत या उद्दिष्टाने सुरु केलेल्या ‘युनायटेड टाऊन्स ऑफ कोकण’ नावाच्या मोठ्या प्रोजेक्ट मध्ये तो कार्यरत आहे.