सायलेन्स: कॅन यू हिअर इट – नवा ‘मनोज’मय थ्रिलर
‘तिसरी मंझील’, ‘गुमनाम’, ‘गुप्त’, ‘मनोरमा’, ‘तलाश’, ‘खामोश’… अशी किती नावं घ्यावीत? बॉलीवूडच्या एकापेक्षा एक दर्जेदार मर्डर मिस्ट्रीज! प्रेक्षकांना जागच्याजागी खिळवून ठेवणाऱ्या आणि क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणाऱ्या या अश्या चित्रपटांची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. नुकतीच ‘झी5’वर रिलीज झालेली अबन भरुचा देवहंस लिखित-दिग्दर्शित ‘सायलेन्स: कॅन यू हिअर इट’ ही याच पठडीत भर घालणारी आणखी एक दर्जेदार फिल्म प्रेक्षकांना एका उत्तम थरारपटाचा अनुभव देते.
ट्रेकिंगसाठी एका टेकडीवर गेलेल्या तरुणांच्या टोळक्याला पूजा चौधरी (बरखा सिंग) मृतावस्थेत आढळते. प्राथमिक पोलीस चौकशीत पूजाचा खून झाला असल्याचे निष्पन्न होते. शहरातील नामांकित न्यायाधीश असलेल्या पूजाच्या वडिलांची (शिशिर शर्मा) अशी इच्छा असते कि या खुनाच्या तपासाची जबाबदारी अविनाश वर्मा (मनोज वाजपेयी) या पोलीस अधिकाऱ्यावर सोपवण्यात यावी, जेणेकरून तपास लवकर पूर्ण होईल. नार्कोटिक्ससाठी काम करणाऱ्या अविनाशला या मोहिमेसाठी एक वेगळी टीम दिली जाते. कायद्यांच्या चौकटीला न जुमानता आपलं कर्तव्य बजावणारा अविनाश पूजाच्या मारेकऱ्यांना शोधू शकेल की नाही, याचं उत्तर चित्रपटाच्या शेवटी प्रेक्षकांना मिळतं.
एका मर्डर मिस्ट्रीमध्ये आवश्यक असलेला थरार या चित्रपटात अनुभवायला मिळतो. एखादा थरारपट बनवण्यासाठी आवश्यक असलेली कथा आणि तिला जिवंत करणारी पटकथा लिहण्यात दिग्दर्शिकेला यश मिळालेलं आहे. “केस सॉल्व्ह्ड और केस क्लोज्ड में फर्क होता है।” किंवा “इंसाफ सिर्फ गुनहगार को सजा दिलाना नही होता है । बेगुनाह को सजासे बचानाभी इंसाफ का पहलु है ।” सारखे संवाद योग्य वेळी कथेला वेगळा रंग देतात. काही प्रसंगांमध्ये सदोष VFX जरी ठळकपणे नजरेत भरत असलं तरी त्या प्रसंगांच्या वातावरणनिर्मितीमध्ये ते बाधा आणत नाही. काही अनावश्यक संवाद आणि समांतर उपकथानकं वगळता इतर कोणत्याही त्रुटी दिसून येत नाहीत. चित्रपटाच्या पटकथेवर विशेष भर दिला गेला असल्याने दिग्दर्शिकेला जे दाखवायचं आहे ते प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचतं. या चित्रपटाला शेवटच्या अर्ध्या तासांत दोन क्लायमॅक्स लाभलेले असून, इथे धक्कातंत्राचा सुरेख वापर करून दिग्दर्शिकेने चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे.
‘द फॅमिली मॅन’ (The Family Man) च्या लांबणीवर पडत चाललेल्या दुसऱ्या सिझनची आतुरतेने वाट बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी या चित्रपटात मनोजने साकारलेला अविनाश वर्मा हा एक दिलासाच म्हणावा लागेल. क्षणाक्षणाला ‘द फॅमिली मॅन’मधल्या श्रीकांत तिवारीची आठवण करून देणारा अविनाश वर्मा साकारताना मनोजला (Manoj Bajpai) फारसे कष्ट पडलेले दिसत नाहीत. हा पूर्ण चित्रपट ‘मनोज एके मनोज’ असला तरी यात इतर कलाकारांनीही आपल्या वाट्याला आलेल्या लांबीने छोट्या पण महत्त्वाच्या भूमिकेत जीव ओतलेला आहे. मनोजच्या टीममधील ऑफिसर संजना भाटिया साकारणारी प्राची देसाई प्रदीर्घ कालावधीनंतर या क्षेत्रात पुनरागमन करत असून डिजिटल प्लॅटफॉर्मवरील तिचा हा पहिलाच चित्रपट आहे. ‘मेड इन हेवन’मधील आपल्या भूमिकेमुळे जाणकारांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या अर्जुन माथूरने रवी खन्नाच्या व्यक्तिरेखेला योग्य न्याय दिलेला आहे. राहुल चौधरींनी साकारलेली दादूची व्यक्तिरेखा चित्रपटाच्या नावाला वजन प्राप्त करून देते. त्याचबरोबर शिशिर शर्मा, बरखा सिंग, साहिल वैद, गरिमा याज्ञीक, अमित ठक्कर, सोहेला कपूर इत्यादी कलाकारांनीही त्यांच्या भूमिका उत्तमरीत्या वठवल्या आहेत.
अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणारा हा चित्रपट सांगितिक पातळीवरही प्रेक्षकांना समाधानकारक अनुभव देण्यात यशस्वी ठरला आहे. वेब कंटेंट असल्याने अर्थातच यात शिव्या आहेत, त्यामुळे लहान मुलांसोबत हा चित्रपट पाहणे योग्य ठरणार नाही. पण जर तुम्ही ‘द फॅमिली मॅन’ मिस करत असाल किंवा एखाद्या चांगल्या मर्डर मिस्ट्रीच्या शोधात असाल, तर ‘सायलेन्स: कॅन यू हिअर इट’ तुमचा हा शोध पूर्णत्वास नक्कीच नेऊ शकतो.