‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
गायक शान: आमीर खानसाठी गाताना का नर्व्हस होता?
गायक शांतनु मुखर्जी म्हणजेच शान(Shaan). आजच्या युवा पिढीचा लाडका गायक आहे. शान याने सुरुवातीला काही जाहिराती मधून, काही जिंगल्समधून आपला आवाज दिला. त्यानंतर काही रिमिक्स गाणी गायली. भारतातील पहिले गाजलेले रिमिक्स गाणे म्हणजे १९९५ साली आलेलं ‘रूप तेरा मस्ताना’ हे शानने गायले होते. अभिनेता आमिर खानसाठी त्याने पहिल्यांदा २००६ साली ‘फना’ या चित्रपटात हे गाणे गायले होते. गीताचे बोल होते ‘चांद सिफारिश जो करता हमारी….’ हे गाणे गाताना शान खूप कन्फ्युज होता.
एक तर पहिल्यांदाच आमिर खानसारख्या मोठ्या कलाकारासाठी तो गात असल्याने थोडा नर्व्हस सुध्दा होता. कन्फ्युज यासाठी की तो वर आमिर खान करीता कुमार सानू गात असायचा. शान आमिरसाठी पहिल्यांदा गायला आला होता. त्यामुळे नेमकं कसं गायचं हा त्याच्यापुढे प्रश्न होता. कुमार सानू स्टाईलने गावे असे त्याला वाटत होते. या चित्रपटाला संगीत होत जतीन ललित यांचं होतं.
शान (Shaan) याने ललित याच्यासोबत हा प्रॉब्लेम डिस्कस केला. ललितने सांगितले, ”तू डोक्यात हा अजिबात विचार आणू नकोस की तू आमिर खानसाठी गातोयस. हा विचार कर तू एका फ्रेश कलाकारासाठी तू गाणे गात आहेस. जर तू डोक्यात आमिर खान ठेवला तर मग तू कुमार सानू सारखं गायचा प्रयत्न करशील. पण मित्रा, ती कॉपी असेल. तुझं ओरीजनल काय असेल? त्यातून तुझं कन्फ्युजन अजून वाढत जाईल. त्यासाठी डोक्यातून आमीर, कुमार हे सर्व काढून टाक. तू एका नवीन कलाकारासाठी गाणे गात आहेस असे लक्षात ठेव!” शान यांनी तसेच केले आणि गाणे मस्त जमून आले. आमिर खानच्या टॉप टेन गाण्यांमध्ये या गाण्याचा नक्कीच समावेश होतो.
‘फना’ या चित्रपटाच्या आधी १९९९ साली ‘प्यार मे कभी कभी’ या चित्रपटातील एका गाण्याने शानने खूप लोकप्रियता मिळवली होती. गाण्याचे बोल होते ‘मुसु मुसु हासी देऊ मलाईले मुसु मुसु हासी देऊ जरा मुस्कुरा दे मुस्कुरा दे जरा मुस्कुरा दे ऐ खुशी‘ या गाण्याने त्या काळात युवा पिढीमध्ये प्रचंड लोकप्रियता हासील केली होती. त्या काळातील एकाही कॉलेज स्नेहसंमेलन, ऑर्केस्ट्रा या गाण्याशिवाय होत नसे. या चित्रपटाचे संगीतकार होते विशाल शेखर. या गाण्याच्या बाबत एक गंमत म्हणजे हे गाणं रेकॉर्डिंग झाल्यानंतर एका नेपाळी प्रोडक्शनच्या व्यक्तीने हे गाणे ऐकले आणि तो म्हणाला “यातील शब्द चुकला आहे. इथे ‘मुसु मुसु हासी देऊ मलाईले’ असे गायले आहे त्याऐवजी ‘मुसु मुसु हासी नेऊ मलाईले’ असे हवे होते.” आता काय करायचे? रेकॉर्डिंग तर मस्त झाले होते. पुन्हा रेकॉर्ड करायचे कां?
===========
हे देखील वाचा : गुलजार स्टेजवरून राखीला म्हणाले, ”अजी सुनती हो…..”
===========
पण सर्वांनी एकमताने ठरले की ‘असेच राहू द्यायचे. आहे ते आहे!’ आणि हे गाणे तसेच राहिले आणि कुणाच्याही चूक लक्षात आली नाही. शान गायक आहे. गीतकार आहे. संगीतकार आहे. अनेक रियालिटी शोमध्ये तो जज असतो. सत्तरच्या दशकातील एक गुणी संगीतकार मानस मुखर्जी यांचा तो मुलगा आहे. त्याची बहीण सागरीका ही देखील प्रख्यात गायिका आहे.
शान(Shaan)ची आणखी लोकप्रिय गाणी म्हणजे बम बम बोले मस्ती मे डोले (तारे जमीन पर) हे शोना हे शोना (तारा रम पम), बहती हवा सा था वो, जब लाईफ हो आऊट ऑफ कंट्रोल (थ्री इडियट),चैन आपको मिला मुझे दिवानगी मिली (हंगामा) जब से तेरे नैना मेरे नैनो से (सांवरिया), इट्स द टाईम टू डिस्को कौन मिले देखो किसको (कल हो न हो), व्हेअर इज द पार्टी टू नाईट (कभी अलविदा न कहना) तनहा दिल तनहा सफर (प्यार जिंदगी है) लडकी क्यू न जाने लाडको सी नही होती(हम तुम) घनन घनन घीर आये बदरवा (लगान) तुमच्या आवडीचे शान चे गाणे कोणते?