
Madhuri Dixit जेव्हा सिंगल स्क्रिन जया थिएटरमध्ये ‘हम आपके है कौन?’ च्या विशेष खेळास आली होती…
आपल्या देशातील चित्रपटगृह संस्कृतीच्या चौफेर वाटचालीवर फोकस टाकताना काही उल्लेखनीय गोष्टी दिसतात, प्रेक्षकांपर्यंत चित्रपट कसा पोहचला हा देखील एक चित्रपट अभ्यासाचा विषय…. आपल्या देशात विदेशातील छोट्या वा काही मिनिटांच्या अवधीच्या मूकपटाचे आगमन, आपल्या देशातील मूकपट निर्मिती या काळात म्हणजेच इंग्रजकालीन चित्रपटगृह (त्यातील बरीचशी इतिहासजमा झाली आहेत.) त्यानंतर चाळीसच्या दशकात हळूहळू चित्रपट निर्मिती वाढत असतानाच काही मूळ विदेशी कंपन्यांनी आपल्या देशातील मुंबई, कलकत्ता (कोलकत्ता) अशा शहरातून उभारलेली प्रशस्त चित्रपटगृह. मुंबईत इरॉस चित्रपटगृह १९३८ साली तर रिगल १९३३ साली उभे राहिले. आजही त्यांच्या इमारती ठणठणीत आहेत. याही काळात महाराष्ट्रीय, पारशी, सिंधी, मुस्लिम, पंजाबी अशा अनेकांनी नवीन चित्रपटगृह उभारली. (Single Screen Theatres In Mumbai)
साठच्या दशकात केंद्र शासनाकडून नवीन चित्रपटगृह उभारणीस दिलेले प्रोत्साहन, नवीन योजना व सुविधा. सत्तरचे दशक सुरु झाले आणि जुनी सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृह हळूहळू बंद होत होत गेली. आजच्या ग्लोबल युगातील मल्टीप्लेक्स, यू ट्यूब, ओटीटी युगात तर अनेक जुनी चित्रपटगृह काळाच्या पडद्याआड जात आहेत. पडद्यावरचा चित्रपट हाती मोबाईल फोनवर आला. काहींच्या नूतनीकरणात कमी आसनसंख्येचे चित्रपटगृह आहे. अशाच वाटचालीत बोरिवली पश्चिमेकडील जया चित्रपटगृह काही वर्षांपूर्वीच बंद पडले आणि आता ते पूर्णपणे पाडण्यात आले याची सोशल मीडियावर दखल घेण्यात आली आहे. आज या माध्यमातून अनेक घडामोडींची माहिती ज्ञात होत आहे. (Entertainment News)
================================
हे देखील वाचा: Eros…. आता ‘स्वदेशी’ शॉपिंग सेंटर
=================================
जया चित्रपटगृह हे बोरिवलीवरुन रेल्वेस्थानकापासून पश्चिमेकडील स्वामी विवेकानंद मार्गानजिक होते. नव्वदच्या दशकात मी गिरगावातून बोरिवलीवलीत राह्यला आलो तेव्हा पूर्वेकडील भागात सोना चित्रपटगृह नुकतेच सुरु झाले, तर पश्चिमेकडे डायमंड (तेही बंद झाले. त्याची इमारत शांतपणे उभी आहे), अजंठा (त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यात आता बाल्कनी नाही….पण प्रशस्त आहे.) व जया अशी तीन चित्रपटगृह होती. हा काळ व्हिडिओ कॅसेट व व्ही. सी. आर. संस्कृती स्थिरावल्याचा व उपग्रह वाहिनीच्या आगमनाचा होता. त्यात ही चित्रपटगृह तग धरुन होती. बोरिवलीवलीत नवीन इमारतीही वाढत होत्या.

जया अतिशय जुन्या पठडीतील एकपडदा चित्रपटगृह. ते १९६८ साली सुरु झाले. ठाकूर राजतेज भद्रासन खोत हे त्याचे मालक. चित्रपटगृह असलेल्या रस्त्याला खोत वाडी असेही म्हणत. राजभाई यांचे बंधु हरिश खोत हे या चित्रपटगृहाचे कामकाज पाहत. राजश्री प्रोडक्शन्सच्या वितरण व्यवस्थेशी त्यांचे खास सख्य. जया चित्रपटगृहात स्टॉल, अप्पर स्टॉल, स्पेशल व बाल्कनी अशी आसन व्यवस्था होती. आगाऊ तिकीट विक्री व करंट बुकिंग अशी स्वतंत्र खिडकी होती. आणि त्यावर म्हटले होते, बिजली चली जाए तो तिकीट का पैसा वापस नही मिलेगा…. चित्रपट सुरु होण्यापूर्वीचा या चित्रपटगृहाला पडणारा गर्दीचा वेडा आणि मग चित्रपट संपल्यावर बाहेर पडताना होणारी गर्दी हा एक अभूतपूर्व अनुभव असे. आपल्या देशात हाऊसफुल्ल गर्दीत टाळ्या व शिट्ट्यांनी चित्रपट एन्जाॅय करणे हा एक वेगळाच अनुभव. तीच आपली दीर्घ परंपरा. ती कालांतराने लोप पावत गेली.
================================
हे देखील वाचा: अगदी खरं खरं सांगा, Saiyaara पाहून रडलात की नाही?
=================================
जया चित्रपटगृहात लॉबी व बाल्कनीत गेल्यावर पटकन लक्ष वेधून घेत असे ते ‘हम आपके है कौन’ (१९९४) च्या एका विशेष खेळास माधुरी दीक्षितची असलेल्या उपस्थितीचे बोलके फोटो. मुंबईत एकमेव अशा लिबर्टी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला ‘हम आपके…’ दहा आठवड्यानंतर चेंबूरच्या वसंत चित्रपटगृहात आणि मग जया चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपटाची गाणी लोकप्रिय होतीच, दीदी तेरा देवर दीवाना फॉर्मात होते. माधुरी दीक्षितच्या ओपन बॅक चोलीची चर्चा होती, इतकेच नव्हे तर या चित्रपटासाठीच्या महागड्या तिकीटाचीही चर्चा होत होती. अशातच जया चित्रपटगृहात टहम आपके….ट आला तोच जांभळ्या रंगातील पैठणीतील माधुरी दीक्षितच्या आगमनाने. माधुरी येणार म्हणून विशेष शो कार्ड होते. खरं तर निमुळत्या गल्लीमुळे चित्रपटगृह इमारतीपर्यंत गाडी नेणे जिकरीचे. माधुरीही गाडी तरीही आली वा आणली. अहो ती माधुरी दीक्षित आहे. आणि ‘हम आपके…’ची सामाजिक सांस्कृतिक माध्यम क्षेत्रावर विलक्षण प्रभाव. जया चित्रपटगृहाच्या प्रगती पुस्तकात ही गोष्ट दिलखुलास. (Latest Bollywood News)

जया चित्रपटगृहात कायमच नवीन चित्रपट प्रदर्शित होत. पण सुपरहिट चित्रपट येथे जास्तीत जास्त आठ दहा आठवडे मुक्काम करीत असे. जी. पी. सिप्पी निर्मित व रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ (१९७५), राजश्री प्रोडक्शन्स निर्मित व दिग्दर्शित बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके है कौन’ (१९९४) हे चित्रपट दहा आठवडे चालले. बरेचसे चित्रपट येथे एक वा दोन तीन आठवडेच मुक्काम करीत. मुंबईतील उपनगरातील चित्रपटगृहाची तशीच परंपरा. जया चित्रपटगृहात अनेक चित्रपट प्रदर्शित होत राहिले. त्यातील काही महत्वाची नावे सांगायची तर, ‘तुमसे अच्छा कौन है’, ‘पिया का घर’, ‘जैसे को तैसा’, ‘पत्थर और पायल’, ‘हमराही’, ‘प्रेम नगर’, ‘आंधी’, ‘खेल खेल मे’, ‘अनोखा’, ‘कैद’, ‘प्रतिज्ञा’, ‘संन्यासी’, ‘दाग’, ‘बिंदीया और बंदूक’, ‘समझौता’, ‘किमत’, ‘गहरी चाल’, ‘जैसे को तैसा’, ‘उस पार’, ‘सत्या’, ‘हम साथ साथ है’, ‘विवाह’, ‘शिखर’, ‘गायब’ असे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. काहींना उत्तम प्रतिसाद. काहींना रिकाम्या खुर्च्या.
जया चित्रपटगृहात काही मराठी चित्रपट प्रदर्शित झाले हेदेखील सांगायलाच हवे. अनंत माने दिग्दर्शित ‘एक गाव बारा भानगडी’, सुषमा शिरोमणी दिग्दर्शित ‘गुलछडी’, सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘माझा पती करोडपती’ असे काही मराठी चित्रपट जया चित्रपटगृहात प्रदर्शित झाले. जया चित्रपटगृहात अनेक वर्ष दर रविवारी सकाळी नऊ वाजता दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट असे. ते कन्नड, तेलगू, तमिळ, मल्याळम भाषेतील चित्रपट पाह्यला उपनगरातील साऊथ इंडियन प्रेक्षक गर्दी करत. एक प्रकारे उपनगरातील दक्षिण भारतीयांना एकमेकांना भेटण्याची ही छान संधी होती. चित्रपट प्रदर्शित होत असतात एवढ्यापुरतीच ही गोष्ट नाही. अशा अनेक गोष्टींसह ही संस्कृती वाटचाल करतेय. जया चित्रपटगृहात सुभाष घई दिग्दर्शित ‘सौदागर’ (१९९१) प्रदर्शित होताना फोर ट्रॅक स्टीरिओफोनिक साऊंड सिस्टीम आली, या तांत्रिक प्रगतीची दखल हवीच.
================================
हे देखील वाचा : Shole : ‘शोले’ १९५३ सालीही पडद्यावर आला होता…
=================================
मुंबईतील, राज्यातील व देशातील अनेक एकपडदा चित्रपटगृह पाडली गेल्याने त्यांची संख्या कमी होत चालली आहे. मल्टीप्लेक्समध्ये चार वा पाच, सहा स्क्रीन असल्याने नवीन चित्रपट प्रदर्शित करण्यात भरपूर स्कोप मिळतोय. तरीही त्यात मराठी चित्रपटाना स्क्रीन मिळत नाहीत हे दु:ख आहेच. तर जुनी सिंगल स्क्रीन थिएटर्स पडद्याआड जाताना फिल्म दीवाने मात्र तेथे आपण कोणते चित्रपट एन्डॉय केले याच्या फ्लॅशबॅकमध्ये रमतात… जया चित्रपटगृहाच्या जागेवर उभे राहणार असलेल्या भव्य दिमाखदार इमारतीत कमी आसनक्षमतेचे चित्रपटगृह असेल का याबाबत सध्या तरी काहीच कल्पना नाही.