मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
फिल्मी लग्नाच्या मौसमात काही वेगळे
अहो, सगळ जगच आंतर्बाह्य बदललय, त्या बदलाचा वेगही वाढतोय म्हटल्यावर ‘बातमीचा जन्म’ या गोष्टीतही फरक पडणारच. पूर्वीचे दिवस असे नव्हतेच हो असं म्हणत आपलं वय वाढलयं याचा सज्जड पुरावा देऊ नका. पूर्वी, जे काही बरं वाईट घडेल त्याची आपोआपच बातमी होई आणि सकाळीच पेपरवाला दरवाजातून घरात पेपर टाके तेव्हाच आजूबाजूच्या जगापासून देश विदेशातील गोष्टी समजत. पेपरात आलंय ते खरे असे त्या काळातील समाज मनोमन मानत होता. बातमी आणि जाहिरात यात फरक होता. असो, तो वेगळाच विषय.(Nupur Shikhare)
आता घराबाहेर पडल्यावर कशाचीही बातमी होऊ शकतेय. आमीर खानचा जावई नुपूर शिखरे आपण नवरदेव म्हणून घराबाहेर पडल्यावर काय काय घडले ? त्याने सजलेला घोडा, सजलेली घोडाघाडी नवीन माॅडेलची फुलांनी सजवलेली मोटार कार, जोरशोरसे ढोल ताशे, त्यात इस्रीच्या कपड्यात नाचकाम, आयुष्यभर कधीच रस्त्यावर नाचण्याची संधी न मिळालेली जमेल तस नाचताहेत, पतंग उडवताहेत, हातवारे करत नाचताहेत, श्रीमंत कुटुंबातील स्रियाही नाचण्याची हौस भागवताहेत, तब्बल बावन्न वर्ष हमखास वाजणारे मै प्यारी बहेनीया बनेगी दुल्हनिया हे ‘सच्चा झूठा’ या चित्रपटातील गाणे, बॅण्ड पथक ते बॅन्जो म्युझिक हे गाणे कायम असं काहीच झालं नाही.
ठरलेली स्क्रिप्ट अजिबात नव्हती. या सगळ्यात आमीर खानच्या जावयाची वरात वेगळीच म्हणून डिजिटल मिडियातील अनेक जणांनी मोबाईलवर शूटिंग केले, कोणी नवीन माॅडेलचा कॅमेरा घेऊन वावरले, भराभर रिल जन्माला आली, पोस्ट झाली देखील. नुपूर शिखरे (Nupur Shikhare) आपल्या घरापासून इरा खानच्या घरापर्यंत तब्बल आठ किलोमीटर जॉगिंग करत गेला. कपडेही अगदी तसेच. कंटीन्यूटी म्हणतात ती हीच.
भूमिकेत शिरणे म्हणतात ते हेच असते. आमीर खानचा जावई शोभतो. काही असो, “असला भारी नवरा कधी आपण पाहिला नव्हता”. नुपूर आपल्या पेशा आणि फिटनेसला जागला. आपण फिटनेस ट्रेनर आहोत हे तो आपल्या लग्नातही अजिबात विसरला नाही. ‘आपण कोण आहोत ?’ हे आपल्याला माहित असलेले अगदी चांगलेच असते आणि त्याबाबत अभिमानही असावा तोही अगदी असाच. या रस्त्याशी आपलं भावनिक नाते आहे, जवळीक आहे म्हणून आपण असे गेलो या त्याच्या प्रतिक्रियेत अतिशय उत्तम प्रामाणिकपणा आहे.
अर्थात, तो घराबाहेर पडल्यापासूनच त्याच्यावर कॅमेरे होतेच. सेलिब्रिटीजचे लग्न आजच्या ग्लोबल युगातील मिडियातील अधिकाधिक स्पेस घेणारी लाईव्ह कव्हरेजची बातमी आहे. सेलिब्रिटीजच्या लग्नात जेवायला काय होते ही बातमी सर्वाधिक वाचली जाते म्हणतात आणि हा अलिखित नियम सर्वांनाच लागू आहे. मराठी मनोरंजन वाहिनीवरील मालिकेतील कलाकारांच्याही लग्नाची बातमी होते आणि “पंचक ” च्या निमित्ताने दिलखुलासपणे दिलेल्या मुलाखतीत डाॅ. श्रीराम नेने व माधुरी दीक्षित यांची पहिली भेट कशी झाली यापासून पुण्यात नेने यांनी छान उखाणा घेतला यापर्यंत हे ‘लग्न पुराण’ आहे.
१९९९ साली झालेल्या या लग्नाचे ताजेपण व गोडवा कायम आहे म्हणून तर त्यावर प्रश्न आले ना? त्याला आजही न्यूज व्हॅल्यू आहे. ‘पंचक’बद्दल कमी पण इतर गोष्टीवरच नेने आणि दीक्षित नेने बोलले की काय असंच वाटतयं. सेलिब्रिटीजची लग्न हा वर्षभर पुरणारा विषय आहे. कोणाचं पहिलं, कोणाचं दुसरं, कोणाचं तिसरे, ‘पुरुष असावा तर असा देखणा ‘ अशा कबीर बेदीने तर चार लग्न केली. आताची त्याची पत्नी परवीन दोसांझ व तो यांच्यात तीस वर्षांचे अंतर असले तरी त्यांना त्यात काहीच गैर वाटत नाही ना, मग तुम्ही त्याला ट्रोल करु नका. गंमत म्हणजे कबीर बेदीची मोठी मुलगी पूजा व परवीन दोसांझ यांच्यात पूजा चार वर्षांनी मोठी आहे. त्या उच्चभ्रू वर्गात हे चालसे. त्यात त्यांना धक्कादायक असं काहीच नाही ?अरबाझ खानच्या दुसर्या लग्नात त्याचा पहिल्या पत्नीचा मुलगा बेभान होऊन नाचला. या गोष्टीची आपण मध्यमवर्गीय, आदर्शवादी साधी कल्पना करु शकतो काय ? (Nupur Shikhare)
या लग्नाला चोवीस तास व्हायच्या आतच मल्लिका अरोरानेही आपण लग्न करतोय हे सोशल मिडियात सांगूनही टाकले. आपल्या पहिल्या पतीवरचा मिडियावरचा फोकस आपल्यावरही पडावा अशी ही स्पर्धा आहे की काय? की मी ‘एकटी राहणारी नाही’ असा सिग्नल होत हे तीच जाणे. चोवीस तास चंगळवादात, श्रीमंतीत जगताहेत अशी प्रतिमा अर्थात इमेज असलेल्या मनोरंजन क्षेत्रात कुछ भी हो सकता है आणि जे जे काही होईल, न होईल त्याची बातमी हमखास. सुरुची आडारकरने पियुष रानडेसोबत लग्न केल्याच्या गोष्टीवर सोशल मिडियात काय काय बोललं, लिहिलं, ऐकवलं, सांगितलं गेले यात कुठे चर्चा होतेय तोच पियुषची दुसरी पत्नी (अर्थात आता ते वेगळे झाल्यानंतरच्या सगळ्या गोष्टी) मयूरी वाघने नवीन घर घेतले आणि कहानी मे ट्विस्ट निर्माण झाला. मयूरीबद्दलची सहानुभूती वाढली आणि सुरुचीला आपण ‘दोन लग्नाचा ( की घटस्फोटांचा? काहीच कळेनासे झालेय हो) अनुभव असलेल्याशी आपण लग्न का केले ‘ यावर व्यक्त व्हावे की न व्हावे असे झाले. हाती असलेल्या मोबाईलवर कोणीही व्यक्त होतो.(Nupur Shikhare)
===========
हे देखील वाचा : संगीतकार रोशनचे अखेरचे गाणे !
===========
सोशल मिडियाच्या वेगवान युगात आता जवळपास कोणतीच गोष्ट ‘लपूनछपून ‘ राहत नाही. परवा कुठेतरी पेट्रोल पंपावर मराठीतील एक अभिनेत्री अशाच एका कलाकारासोबत दिसली, ते तेथून निघून जायच्या आतच तो फोटो व्हायरल झाला देखील. मनोरंजन क्षेत्रात बाराही महिने लग्नाचाच मौसम आहे, त्यात नुपूर शिखरे खूपच वेगळाच. आता त्याचा आदर्श ठेवून शहरांपासून गावांपर्यंत अनेक नवरे बाशिंग बांधून अथवा न बांधून असेच काही भन्नाट करतील. लग्न जवळपास सगळेच करतात, आपण त्यातही काही वेगळे करतो अशी भूमिका बातमीला जन्म देते, भरभरुन लाईक्स मिळवते. आणि अशीच ‘चालणारी’ बातमी आजच्या डिजिटल मिडियाला हवी आहे. नुपूर शिखरेसारखी धावणारी बातमी हवी.