बॉलिवूडमध्ये दाखल होणार ६ नवे दाक्षिणात्य चेहरे… या महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये साकारणार आहेत मुख्य भूमिका
दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी ‘रिमेक’ ही काही नवीन गोष्ट नाही. या डब केलेल्या दाक्षिणात्य चित्रपटांचा स्वतःचा असा खास प्रेक्षकवर्ग आहे. तसं बघायला गेलं तर, बॉलिवूडमध्ये फार पूर्वीपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा वरचष्मा राहिलेला आहे. यामध्ये केवळ अभिनेतेच नाही, तर संगीत क्षेत्रातही दाक्षिणात्य कलाकारांनी आपली छाप सोडली आहे. या वर्षांत दक्षिणेतले काही नवीन चेहरे बॉलिवूडमध्ये दाखल होत आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी…
विजय देवराकोंडा
तेलुगू चित्रपटांचा सुपरस्टार विजय देवरकोंडा ‘लायगर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘लायगर’ हा एक स्पोर्ट्स ॲक्शन चित्रपट असून याचं कथानक मिक्स्ड मार्शल आर्ट्सच्या दुनियेवर आधारित आहे. या चित्रपटात विजय बॉक्सरची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत कुशल पुरी जगन्नाध, तर नायिका आहे अनन्या पांडे. हा चित्रपट हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
विजय सेतुपती
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा विजय सेतुपती ‘मुंबईकर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. संतोष सिवन दिग्दर्शित या चित्रपटात विक्रांत मॅसी, संजय मिश्रा आणि रणवीर शौरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट लोकेश कनागराजच्या ‘मानानगरम’ या चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होईल.
रश्मिका मंदान्ना
दक्षिणेतील आघाडीची अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आगामी ‘मिशन मजनू’ या चित्रपटामध्ये नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट एक ‘स्पाय थ्रिलर’ आहे. परवीझ शेख, असीम अरोरा आणि सुमित बठेजा लिखित या चित्रपटाचे दिग्दर्शन शंतनू बाग यांनी केलं आहे. या चित्रपटात रश्मिका सिद्धार्थ मल्होत्रा सोबत दिसणार असून १० जूनच्या दरम्यान चित्रपट प्रदर्शित होईल.
बेल्लमकोंडा साई श्रीनिवास
बेल्लमकोंडा साई श्रीनिवास हा तेलगू अभिनेता, एस एस राजामौली यांच्या ‘छत्रपती’ या २००५ सालचा ब्लॉकबस्टर चित्रपटच्या रिमेकमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मूळ तेलगू चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत होता.
आदिवी शेष
आदिवी शेष या अभिनेत्याला याआधी सर्वानी ‘बाहुबली: द बिगिनिंग’ या चित्रपटामध्ये पाहिलं असेल. आदिवी तेलगू अभिनेता असून ‘मेजर’ या चरित्रात्मक चित्रपटाद्वारे तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट २००८ सालच्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आयुष्यावर आधारित आहे. ससी किरण टिक्का दिग्दर्शित या चित्रपटात आदिवी सोबत सई मांजरेकर आणि शोभिता धुलिपाला मुख्य भूमिकेत आहेत. सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडिया आणि महेश बाबू यांच्या जीएमबी एंटरटेनमेंट आणि प्लस एस मुव्हीज द्वारे दिग्दर्शित हा चित्रपट २७ मे रोजी प्रदर्शित होणार आहे
====
हे ही वाचा: खुशखबर, नाटकं बहरली! आता हवी फक्त माध्यमांची साथ
====
.
नागा चैतन्य
नागा चैतन्य, आमिर खान आणि करीना कपूर खान यांच्यासोबत ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट एक कॉमेडी-ड्रामा असून यामध्ये नागा चैतन्य एका आर्मी ऑफिसरची भूमिकेत दिसणार आहे.
====
हे नक्की वाचा: बॉलिवूडची मुळं मुंबईतच का खोलवर पसरली आहेत? बॉलिवूड म्हटलं की मुंबईच का आठवते ?
====
बॉलिवूडच्या मायानगरीमध्ये कित्येक दाक्षिणात्य कलाकारांनी स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. आता हे कलाकार बॉलिवूडच्या मायानगरीत टिकून राहतील, की इथल्या गर्दीत हरवून जातील, हे येणारा काळच ठरवेल.