मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
संजय लीला भन्साळी: ‘स्टारडम’ मिळवलेला दिग्दर्शक
“संजय भन्साळी.. आता संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) बनलाय.. हा असिस्टंट डायरेक्टर होता माझ्या फिल्म्ससाठी.. १९४२: लव्ह स्टोरीची गाणी त्यानेच फिल्म केलीत.. काय जमलीयत ती गाणी.. म्हणूनच त्याला पाठवलं ॲवॉर्ड घ्यायला MTV च्या स्टेजवर.. आज ओरडून बोलतो पण तेव्हा मात्र दबकत दबकत बोलायचा.. पण मला माहित होतं, ह्या पोरात टॅलेंट आहे..आणि आज जेव्हा याचे सिनेमे पडद्यावर बघतो, तेव्हा मी प्रचंड आनंदी असतो आणि वाटतं की, शेवटी ह्याने काहीतरी करून दाखवलंच!!” -विधु विनोद चोप्रा- Vidhu Vinod Chopra (निर्माता, दिग्दर्शक)
भायखळ्याच्या नळबाजारमधल्या कुठल्याश्या चाळीत बालपण घालवलेल्या संजयचं त्याच्या वडिलांशी कधीच पटलं नाही. एक अयशस्वी चित्रपट निर्माते असलेल्या वडिलांचं दारूचं व्यसन आणि त्यामुळे आलेला कर्जबाजारीपणा संजयचं बालपण नासवत गेला. लहानपणी त्याला पूर्णतः आधार होता तो त्याच्या आईचा, सिनेमाचा आणि संगीतसाधनेचा. FTII चा विद्यार्थी असलेला संजय गुरुदत्त आणि राज कपूर यांचा मोठा चाहता आहे. दिग्दर्शक म्हणून त्याने मिळवलेल्या यशामध्ये राज कपूरसाहेबांच्या दिग्दर्शकीय शैलीचा मोठा वाटा असल्याचं तो मान्य करतो.
संजयने लहान असताना ज्या ज्या यातना भोगल्या, त्या सगळ्याच येनकेनप्रकारेण त्याच्या चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळतात. चाळीच्या छोट्याशा खोलीत राहणारा संजय आज त्याच्या भव्यदिव्य सेट्ससाठी ओळखला जातो. शाळेत जाणाऱ्या संजयला कामाठीपुऱ्यातून जावं लागायचं. आजही त्याच्या चित्रपटांमध्ये आढळणारं वेश्या आणि वेश्यावस्तीचं रंगीबेरंगी चित्रण हे त्याच्या तेव्हाच्या निरीक्षणातून आलेलं आहे. त्याच्या याच निरीक्षणशक्तीचा कस आगामी ‘गंगुबाई काठियावाडी’मध्ये लागेल आणि प्रेक्षकांना आणखी एक उत्तम कलाकृती पाहण्याचा आनंद मिळेल, अशी आशा समाजमाध्यमांतून व्यक्त केली जात आहे. दारूचं व्यसन, जनरेशन गॅप, नात्यांमधील फूट याचं दाहक चित्रण ‘देवदास’, ‘हम दिल दे चुके सनम’मध्ये पाहायला मिळतं.
संगीत हा संजयच्या जिव्हाळ्याचा विषय. त्याचा पहिला सिनेमा, ज्याला फिल्मफेअर क्रिटिक्स ॲवॉर्ड मिळाला, तो ‘खामोशी: द म्युझिकल’ (१९९६) बॉक्स ऑफिसवर आपली चमक दाखवू शकला नाही, पण सांगितिकदृष्ट्या मात्र तो हिट ठरला. मजरुह सुलतानपुरींची गीते, जतीन-ललितचं संगीत असलेला हा चित्रपट जर बॉक्स ऑफिसवर चालला असता तर आज भन्साळीच्या चित्रपटांचा बाज नक्कीच बदलला असता. ‘खामोशी’नंतर संजयने गिअर बदलला आणि ‘हम दिल दे चुके सनम’ बनवला. या चित्रपटात वापरले गेलेले भव्यदिव्य सेट्स, तब्बल ५४ मिनिटांची ११ गाणी, पूर्णतः गुजराती संस्कृतीचा प्रभाव तसेच नयनरम्य कलर पॅलेट्स या सगळ्या बाबी भन्साळीच्या दिग्दर्शकीय कौशल्याला अधोरेखित करणाऱ्या ठरल्या. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून फिल्मफेअरने गौरवलंच, त्याचबरोबर संजयलाही त्याच्या अप्रतिम दिग्दर्शनासाठी पहिलावहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. सलमान खान-ऐश्वर्या राय-अजय देवगण अभिनित हा चित्रपट हिट ठरला आणि इथूनच भन्साळीच्या नव्या इनिंगला सुरुवात झाली.
२००२ला आलेला शाहरुख-ऐश्वर्या-माधुरी अभिनित ‘देवदास’ (Devdas) हा शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘देवदास’ या कादंबरीवर आधारित होता. या फिल्ममधून एक गोष्ट नक्की झाली की, भन्साळीच्या फिल्म्स पाहाव्यात तर त्या मोठ्या पडद्यावरच! अप्रतिम कला दिग्दर्शन आणि तितकीच सुंदर सिनेमॅटोग्राफी, या दोन्हींचा संगम भन्साळी दिग्दर्शित ‘देवदास’मध्ये पाहायला मिळतो. “राज कपूर जर ‘देवदास’ बनवत असते, तर प्रत्येक फ्रेम त्यांनी कशी बनवली असती, याचाच विचार करत मी पूर्ण ‘देवदास’ बनवला.”असं संजय म्हणतो. ‘देवदास’ सुपरहिट झाला, भरपूर पुरस्कार मिळाले आणि संजय पडद्यावर साकारत असलेल्या प्रेमकहाण्या पाहून प्रेक्षकांच्याही अपेक्षा वाढल्या. अश्यावेळी साहजिकच कोणत्याही दिग्दर्शकाने तोच पॅटर्न पुन्हा राबवत आणखी एक लव्हस्टोरी बनवली असती पण यावेळी संजयच्या प्रयोगशीलतेला पालवी फुटली आणि संजयने पुढचा प्रयोग केला तो ‘ब्लॅक’च्या रूपाने.
‘ब्लॅक’देखील एक प्रेमकहाणीच होती पण अत्यंत विलक्षण होती. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि राणी मुखर्जीच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट अमेरिकन विदुषी हेलन केलर यांच्या ‘द स्टोरी ऑफ माय लाईफ’ या आत्मचरित्रावर आधारित होता. राणी मुखर्जीने यात एका अंध विद्यार्थिनीची भूमिका साकारली होती तर बच्चनसाब एका प्रोफेसरच्या भूमिकेत दिसून आले. या चित्रपटात भन्साळीने आधीच्या चित्रपटांसारख्या वैविध्यपूर्ण कलर पॅलेट्स न वापरता काळा आणि पांढरा या दोनच रंगांवर जास्तीत जास्त भर दिला. ‘ब्लॅक’मध्ये अंध व्यक्तीची जीवनशैली पडद्यावर दाखवताना भन्साळीने वापरलेलं सिम्बॉलिझम खरोखर कौतुकास्पद आहे.
त्यानंतर आलेले ‘सावरीया’ व ‘गुजारिश’ हे दोन्ही चित्रपट विभिन्न प्रकारचे होते. दोन्हीमध्ये रोमान्स असला तरीही तो दर्शवण्याची पद्धत वेगळी होती. ‘सावरीया’मधून रणबीर कपूर आणि सोनम कपूरने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. बॉक्स ऑफिसवर जरी चांगली कमाई केली असली, तरी सावरीया क्रिटिक्सची मने जिंकू शकला नाही, याउलट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरलेला ‘गुजारिश’ हृतिक रोशन आणि ऐश्वर्या रायच्या कारकिर्दीतील एक सर्वोत्तम चित्रपट समजला जातो. ‘सावरीया’मध्ये एक संपूर्ण शहर वसवणाऱ्या भन्साळीने ‘गुजारीश’मध्ये मात्र ग्राफिक्सचा सढळ हाताने वापर करत, तो एक दिग्दर्शक म्हणून तांत्रिकदृष्ट्याही सक्षम असल्याचं सिध्द केलं.
हे देखील वाचा: … म्हणून “धूम ४” मध्ये दीपिकाची वर्णी लागली…
‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘गोलियोनकी रासलीला: राम-लीला’ हे तिन्ही चित्रपट जितके रणवीर-दीपिका या जोडीसाठी ओळखले जातात, त्याहून जास्त लोकप्रियता त्यांना ‘संजय लीला भन्साळी’ या नावाने दिलेली आहे, यात दुमत नाही. संजय हा एक दिग्दर्शक म्हणून या चित्रपटसृष्टीत किती मुरला आहे, हे या फिल्म्सवरून कळून येते. त्याचे आजवरचे सर्वच चित्रपट पाहता, प्रेमकहाणी हा एकच धागा कायम ठेवून त्याला निरनिराळ्या स्वरूपात भव्य कॅनव्हॉसवर चितारण्याची कला फक्त आणि फक्त संजय लीला भन्साळी या दिग्दर्शकाच्या हातात आहे, असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही.
हे वाचलंत का: आलियाचा, गंगूबाई काठियावाडी…
संजयने केलेला लोकसाहित्य, लोककथा, लोकसंगीत आणि लोकसंस्कृतीचा गाढा अभ्यास त्याच्या चित्रपटांमधून दिसून येतो. चित्रपटाची कथा ज्या कालखंडात घडते किंवा ज्या प्रदेशात आकार घेते, तेथील लोकजीवनाचे पडसाद त्याच्या सिनेमांमधल्या गाण्यांत उमटतात. मग तो शनिवारवाड्यातला ‘पिंगा’ असो, चित्तौडच्या किल्ल्यातील ‘घूमर’ असो वा ‘देवदास’मधील दुर्गा पूजा, लोकसंस्कृतीचे असे आगळेवेगळे संदर्भ चाणाक्षपणे पेरत भन्साळी प्रेक्षकांना त्याच्या कथेत मिसळून जायला प्रवृत्त करतो. त्याच्या चित्रपटांमधील भव्यदिव्यता मोठ्या पडद्यावर अनुभवण्यातच खरं सुख आहे. अभिनेता किंवा अभिनेत्रीचं स्टारडम पाहून चित्रपटाला गर्दी करणे ही तशी सामान्य बाब आहे, पण एक ‘दिग्दर्शक’ म्हणून संजय लीला भन्साळी जी गर्दी खेचतो, ती निश्चितच असामान्य बाब आहे.
आज या यशवंत, गुणवंत आणि किर्तीवंत दिग्दर्शकाचा वाढदिवस!! त्याच्या आगामी ‘गंगुबाई काठियावाडी’सोबतच इतर प्रोजेक्ट्ससाठी कलाकृती मीडियाकडून खूप खूप शुभेच्छा!!