गश्मीर महाजनी: कर्ज फेडण्यासाठी वयाच्या 15व्या वर्षीच सुरू केला स्वतंत्र व्यवसाय आणि …
गश्मीर महाजनी! (Gashmeer Mahajani) मराठी चित्रपटसृष्टीमधील ‘स्टार किड’. ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मुलगा. पण असं असलं तरी गश्मीरने आज स्वतःचं असं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. ‘देऊळ बंद’ या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं होतं. अलीकडेच गश्मीर त्याच्या ‘धर्मवीर’ आणि ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. २०१० पासून सुरु झालेली त्याची कारकीर्द हळूहळू आकार घेतेय. ‘स्टार किड’ असला तरी गश्मीर महाजनीने आयुष्यात खूप मोठा स्ट्रगल केला आहे. आज तो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पोचण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे.
गश्मीर! गश्मीर हे नाव तसं वेगळं आहे. त्यामुळे तो लहान असतानपासून प्रत्येकजण त्याला त्याच्या नावाचा अर्थ विचारत असे. याबद्दल गश्मीरने एका मुलाखतीमध्ये बोलताना सांगितलं होतं, “गश्मीर हे हनुमानाचं नाव आहे. गश्मीरचा जन्म शनिवारी झाला. शनिवार हा हनुमानाचा वार समजला जातो. तसंच शनी फक्त मारुतीला घाबरतो. त्यामुळे त्याचं नाव ‘गश्मीर’ (Gashmeer Mahajani) असं ठेवलं.”
गश्मीर मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने हिंदीमध्येही काम केलं आहे. याशिवाय २०१७ ते २०२० या कालावधीत टाइम्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्रातील ‘टॉप 20 मोस्ट डिझायरेबल मेन’ लिस्टमध्ये गश्मिरचे नाव समाविष्ट होते. यामध्ये २०१७ साली तो पाचव्या क्रमांकावर, २०१८ मध्ये नवव्या, २०१९ मध्ये दुसऱ्या तर, २०२० सातव्या क्रमांकावर होता.
गश्मीरचा जन्म मुंबईला झाला. पण त्याचं संपूर्ण शिक्षण पुण्यामध्ये झालं आहे. पुण्याच्या ‘अभिनय विद्यालय (इंग्लिश मिडीयम)’ शाळेमधून दहावी झाल्यावर त्याने पुढील शिक्षणासाठी पुण्याच्या बीएमसीसी कॉलेजला ॲडमिशन घेतली. पण कॉलेजला जाणं, ‘कॉलेज लाईफ’ एन्जॉय करणं या गोष्टी गश्मीरने (Gashmeer Mahajani) कधी केल्याच नाहीत कारण त्याच्यासमोर होता आर्थिक प्रश्न!
वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी गश्मीरनं आपली डान्स अकादमी सुरु केली. अर्थात याला कारणही तसंच होतं. त्यावेळी गश्मीरचं कुटुंब आर्थिक समस्यांना तोंड देत होतं. आईच्या नावावर असणारं राहतं घर बँकेकडे गहाण होतं. जवळपास ४०-५० लाखांचं कर्ज फेडायचं होतं. आई गृहिणी होती… तर गश्मीर अवघ्या १५ वर्षांचा. अशा परिस्थितीमध्ये त्याला हातपाय हलविण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. खूप लहान वयातच त्याला खूप मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागली. पण गश्मीर डगमगला नाही. त्याने हिमतीने डान्स अकादमी सुरु केली आणि आज त्याच्या छोट्याशा डान्स अकादमीचं वटवृक्षात रूपांतर झालं आहे.
डान्स अकादमीनंतर अवघ्या २ वर्षांत त्याने कॉर्पोरेट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी स्थापन केली. या माध्यमातून पॅन इंडिया बेसिसवर संपूर्ण भारतभर इव्हेंट्स केले जात असत. कंपनीच्या माध्यमातून त्याने मर्सिडीज, टाटा यासारख्या मोठ्या ब्रॅंड्ससाठी काम केलं. अखेर ६ वर्षांनी वयाच्या २१ व्या वर्षी बँकेचं सर्व कर्ज गश्मीरने (Gashmeer Mahajani) फेडलं. हे सर्व करताना गश्मीरला कॉलेजला जायला वेळच मिळाला नाही. तो केवळ परीक्षेच्या आधी एक दोन महिने कॉलेजला जात असे. एवढं असतानाही गश्मीर कधी नापास झाला नाही, हे विशेष. या साऱ्यांमध्ये त्याची आईने सावलीसारखी त्याच्या सोबत होती.
गश्मीरच्या मनात आपल्या आईबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर आहे. तो आपल्या आईलाच आपला गुरु मानतो. आपल्या आईबद्दल बोलताना गश्मीर सांगतो, “ती एक बिझनेस वुमन आहे. तिने एक प्रॉडक्ट मार्केटमध्ये लॉन्च केलं आहे ते प्रॉडक्ट म्हणजे गश्मीर. मी जो काही आहे तो फक्त माझ्या आईमुळेच. माझं यश ही फक्त तिची देणगी आहे.”
========
हे देखील वाचा – तो चित्रपट स्वीकारला असता, तर अक्षयसमोर मोकळेपणाने वावरूच शकले नसते….
========
अभिनयाव्यतिरिक्त गश्मीर (Gashmeer Mahajani) एक उत्तम नृत्य दिगदर्शक आहे. चित्रपट निर्मिती आणि एडिटिंगचाही त्याचा विशेष अभ्यास आहे. ‘स्टार किड’ असूनही गश्मीरने खूप मोठा संघर्ष केला आहे. त्याचं वाचन, चित्रपटांचा अभ्यास वाखाणण्यासारखा आहे. त्याचा आयुष्याकडे बघण्याचा आणि संकटांवर मात करण्याचा दृष्टिकोन कौतुकास्पद आहे. गश्मीरचा प्रवास आजच्या तरुणांना खूप काही शिकवणारा आहे. यश कधीच सहजी मिळत नाही, पण मेहनत आणि जिद्द तुमच्याकडे असेल, तर ते तुमच्यापासून फार काळ लांब राहू शकत नाही, हे गश्मीरने सिद्ध करून दाखवलं आहे.
– भाग्यश्री बर्वे