ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
हेमांगी कवी: ‘चार आण्याच्या घटनेला आठ आण्याची प्रतिक्रिया’ अशी आजची परिस्थिती..
हेमांगी कवी! मराठी इंडस्ट्रीमधली एक गुणी अभिनेत्री. हेमांगीचा अभिनय जितका सहज आणि सुंदर आहे तितकंच तिचं बोलणंही सहज आणि स्पष्ट आहे. तिचा ‘तमाशा लाईव्ह’ हा चित्रपट आता प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर पाहून रसिकांच्या मनात या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. त्या निमित्ताने हेमांगीशी झालेल्या मनमोकळ्या गप्पांदरम्यान तिने बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली. (Success Journey of Hemangi Kavi)
तमाशा लाईव्ह चित्रपटातील तिच्या भूमिकेवर ती प्रचंड खुश आहे. या चित्रपटात एक नाही तर अनेक प्रकारच्या भूमिका तिला करायला मिळाल्या आहेत. “एकाच चित्रपटात अशा विविध भूमिका करायला मिळणं ही मेजवानीच आहे. या भूमिकेचा सर्वच प्रवास अविस्मरणीय होता. त्यात संजय जाधव यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी दिग्दर्शकासोबत काम करायला मिळाल्यामुळे खूप काही शिकायला मिळालं”, असं ती सांगते.
हेमांगीने आजवर नाटक मालिका चित्रपट अशा सर्वच क्षेत्रांत महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या तिन्ही क्षेत्रांपैकी तुला कुठलं क्षेत्र आवडतं, असं विचारल्यावर हेमांगी सांगते, “तिन्ही क्षेत्रांमधील आव्हाने आणि गंमत वेगवेगळी आहे. नाटकामध्ये तुम्हाला ‘लाईव्ह परफॉर्मन्स’ द्यायचा असतो. तिथे चूक करून चालत नाही. तसंच तिथे रसिकांची मिळणारी दादही तुम्हाला अनुभवता येते. इथे तुमचा आवाज जास्त महत्त्वाचा असतो. तर मालिका, चित्रपटांमध्ये अभिनय करताना तुमचे डोळे महत्त्वाचे असतात. सगळीच क्षेत्र मला तितकाच आनंद देतात. अगदी मोबाईलची स्क्रीनही मला आवडते म्हणून इंस्टाग्राम रिल्सही मी मनापासून करते.” (Success Journey of Hemangi Kavi)
मनोरंजनाच्या सर्वच क्षेत्रांवर मनापासून प्रेम करणाऱ्या हेमांगीला, “या क्षेत्रामध्ये यायचा आधीपासूनच विचार केला होता का, असं विचारल्यावर ती खळखळून हसून म्हणाली, “अजिबात नाही! २० वर्षांपूर्वी माझ्या असं काही डोक्यातच नव्हतं. मुळात अभिनेत्री होण्यासाठी आवश्यक असणारा एकही गुण माझ्यात नव्हता. गुण म्हणजे रूप, रंग, उंची वगैरे. त्यात मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातली असल्यामुळे या क्षेत्राचा विचार आधी केला नव्हता. पण कॉलेजला असताना एकदा कोणालातरी स्टेजवर ‘परफॉर्म’ करताना बघितलं आणि मनात आवड निर्माण झाली. मग एकांकिका केल्या. त्यानंतर पहिलंच नाटक मिळालं ते अशोक सराफ यांच्यासोबतचं ‘अनधिकृत’. माझं अभिनय क्षेत्रात जाणं सुरुवातीला आईला अजिबात मान्य नव्हतं. पण नंतर मात्र तिला कळलं की, हे क्षेत्र वाईट नाही. हा देखील एक व्यवसायच आहे.”
मनोरंजन क्षेत्राबद्दल हेमांगी भरभरून बोलते. “मी माझं काम नेहमीच प्रामाणिकपणे केलं आहे. सुरुवातीला मला मिळतील त्या भूमिका मी स्वीकारत गेले. अर्थात त्या करताना त्यांना ‘कॅरॅक्टर रोल’ वगैरे म्हणतात हेही मला माहिती नव्हतं. मी कधीच मला हिरॉईनचीच भूमिका हवी असं म्हणून अडून बसले नाही. त्यामुळे मला फारसा ‘स्ट्रगल’ करावा लागला नाही आणि ‘कॉम्प्रमाइज’ तर अजिबातच करावं लागलं नाही. जी भूमिका मिळाली ती मनापासून साकारली. ‘धुडगूस’ हा नायिका म्हणून माझा पहिला चित्रपट. या चित्रपटाने मला आत्मविश्वास मिळवून दिला. या चित्रपटामुळे मला कळलं, “या क्षेत्रात येण्यासाठी सौंदर्य, रंग रूप, उंची यापेक्षाही महत्त्वाचं काय असेल, तर गुणवत्ता! (Success Journey of Hemangi Kavi)
हेमांगी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिचं लेखन अनेकांना आवडतं. ट्रोलर्सकडे ती विशेष लक्ष देत नाही. उलट लिखाणामुळे कित्येक चांगल्या व्यक्ती तिच्याशी जोडल्या गेल्याचं ती आवर्जून सांगते. “मुली किंवा स्त्रिया नकळतपणे किंवा आंधळेपणाने हीच आपली संस्कृती आहे हे मान्य करत चालल्यामुळे पुढची पिढी १० वर्ष मागे जाते. ते खोदून काढायला हवं. त्यामुळे मला जे वाटतं त्याबद्दल मी सोशल मीडियावर व्यक्त होते”,असं ती आवर्जून सांगते. (Success Journey of Hemangi Kavi)
सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलताना हेमांगी सांगते, “प्रत्येक पिढी पुढच्या पिढीचा विचार करते. आता डिजिटलायझेशन झालं आहे. इथल्या प्लॅटफॉर्मवर जे काही आहे ते सध्याची पिढी जास्तीत जास्त ‘कंझ्युम’ करते. इथे आपण जे काही बोलतो/लिहितो थोडक्यात व्यक्त होतो ते करताना त्याचं ‘डॉक्युमेंटेशन’ होतंय, ते ‘अनडन’ नाही करता येत याचं भान ठेवायला हवं. समाजातील कोणत्याही घटनेवर माणूस काय प्रतिक्रिया देतो ते महत्त्वाचं झालं आहे. ‘चार आण्याच्या घटनेला आठ आण्याची प्रतिक्रिया’ असा प्रकार आहे. घटनेपेक्षा या प्रतिक्रियाच जास्त टिकतात, अशी आजची परिस्थिती आहे. माझ्या आगामी ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटांमध्येही पुढच्या पिढीचं ‘कंडिशनिंग’ कसं झालं पाहिजे, समाजातील कोणत्याही घटनेवर व्यक्त होताना चारी बाजूंनी विचार करून व्यक्त व्हायला हवं, हे सांगण्यात आलं आहे.”
हेमांगी आपल्या फिटनेसबाबतही विशेष जागरूक असते. नियमित साधा आहार, योग आणि पुरेशी झोप या गोष्टी फिटनेससाठी आवश्यक असल्याचं ती सांगते. या क्षेत्रात येणाऱ्यांना काय सांगशील असं विचारल्यावर ती म्हणाली, सध्याच्या मुलांकडे आत्मविश्वास भरपूर आहे. जो अत्यंत महत्त्वाचा असतो पण त्याजोडीने संयमही आवश्यक आहे. संयम ठेवा कधीही स्वतःची कोणाशीही तुलना करू नका. अनेकदा निराशेचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे सकारात्मक राहा. कोणत्याही भ्रमात राहू नका कारण भ्रमाचा भोपळा फुटला की प्रचंड त्रास होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम करा, खाणं पिणं आणि शरीराकडे आवर्जून लक्ष द्या.” (Success Journey of Hemangi Kavi)
=======
हे देखील वाचा – जाने तू… या जाने ना: कॉलेजची मैत्री, मजा, मस्ती आणि एक रोमँटिक प्रेमकहाणी
=======
हेमांगीने आजवर विविधरंगी भूमिका केल्या आहेत. तिला रसिक प्रेक्षकांकडून कौतुकाची थापही मिळाली आहे. ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटामधील भूमिकेबद्दल ती प्रचंड उत्साही आहे. भविष्यातही अशाच उत्तमोत्तम भूमिका तिला मिळतील यात शंकाच नाही.