हृता दुर्गुळे: अनन्या साकारताना शिकले ‘अशा’ गोष्टी ज्याची कधी कल्पनाच केली नव्हती..
तिला तुम्ही ‘दुर्वा’ म्हणून ओळखत असाल किंवा ‘वैदेही’ म्हणून; कदाचित ती अनेकांना ‘नमिता’ म्हणून माहिती असेल, तर काहींसाठी ती ‘दिपू’ असेल; पण आता तिची नवीन ओळख सर्वांसमोर येत आहे…अनन्या! कोणत्याही कलाकाराला त्याने साकारलेल्या व्यक्तिरेखेमुळे ओळख मिळणं म्हणजे त्याच्या कामाची मिळालेली पोचपावती असते. ही पोचपावती जिला वारंवार मिळत गेली अशी अभिनेत्री म्हणजे, हृता दुर्गुळे (Hruta Durgule).
हृताने तिची अभिनय क्षेत्रामधील कारकीर्द सुरू केली ती स्टार प्रवाहवरील ‘दुर्वा’ या मालिकेपासून. राजकारणावर आधारित या मालिकेतून ती घराघरांत पोहोचली. या मालिकेतील तिच्या भूमिकेचं कौतुक तर झालंच, शिवाय या भूमिकेनं तिला २०१५ सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ‘मटा सन्मान पुरस्कार’ही मिळवून दिला.
फार कमी लोकांना माहिती असेल, पण हृताने ‘पुढचं पाऊल’ या स्टार प्रवाहावरील मालिकेसाठी कॉस्ट्यूम एडीची भूमिका पार पाडली होती. त्याच दरम्यान कास्टिंग डायरेक्टर रसिका देवधर त्यांच्या नवीन मालिकेसाठी एक नवा चेहरा शोधत असल्याचं तिला कळलं. यानंतर तिने ‘दुर्वा’ मालिकेसाठी ऑडिशन दिली आणि ती त्यातून तिची निवड झाली. (Journey of Hruta Durgule)
‘दुर्वा’नंतर हृताला झी युवा वाहिनीवरच्या ‘फुलपाखरू’ मालिकेमध्ये मुख्य नायिकेची भूमिका मिळाली. या मालिकेमधील वैदेहीची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली. ‘मानस आणि वैदेही’ या जोडीने तमाम तरुणाईला वेड लावलं. या मालिकेदरम्यानच ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकासाठी तिला विचारणा करण्यात आली. नाटकामध्ये काम करण्याचा कोणताही अनुभव नसताना तिने हे नाटक स्वीकारलं. यामधील तिने साकारलेल्या ‘नमिता’ या व्यक्तिरेखेचं समीक्षकांनी भरभरून कौतुक केलं. हे नाटकही प्रचंड यशस्वी ठरलं.
या नाटकाबद्दल बोलताना हृता सांगते, “हे नाटक करणं हे माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचं होतं. पण तरीही मी ते स्वीकारलं कारण मला एक माहिती आहे की, जर तुम्हाला ‘ग्रोथ’ हवी असेल, तर ‘कम्फर्ट झोन’च्या बाहेर जावं लागत. खरंतर तसं केलं तरच तुमची ग्रोथ होऊ शकते. जेव्हा एखादी गोष्ट माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरची असते तेव्हा मी स्वतःला जास्त चार्ज्ड अप करते. त्यासाठी मी विशेष सतर्क राहते. पूर्णपणे झोकून काम करायची सवय तर आहेच, पण हा आपला ‘कम्फर्ट झोन’ नाही म्हटल्यावर त्याबद्दल विशेष दक्षता घेतली जाते.” (Journey of Hruta Durgule)
सध्या हृता आतुरतेने वाट बघतेय ती तिच्या ‘अनन्या’ या चित्रपटाची. या चित्रपटामध्ये ती एका आव्हानात्मक भूमिकेमध्ये दिसणार आहे. ‘अनन्या’च्या ट्रेलरला रसिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. ट्रेलर बघून हृताकडून असणाऱ्या अपेक्षाही वाढल्या आहेत. यामुळे कुठलं दडपण आलं आहे का, असं विचारल्यावर हृता म्हणाली, “ज्या भावना दुर्वांच्या वेळी होत्या त्याच भावना आत्ता आहेत. फक्त यावेळी आत्मविश्वास आहे. मी ‘एक्सआयटेड’ आहे, ‘कॉन्फिडन्ट’ आहे, पण हा माझा पहिलाच चित्रपट असल्यामुळे थोडी धाकधूकही आहे. अर्थात चित्रपट पूर्ण झाल्यावर आम्ही सर्वांनी तो बघितला आहे. त्यामुळे तशी रिलॅक्सही आहे.”
या चित्रपटात काम करायची संधी मिळाल्यामुळे हृता खूप खुश आहे. या संधीबद्दल सांगताना ती म्हणाली, “फुलपाखरू मालिका संपताना मला हा चित्रपट मिळाला. मला मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करायचं आहे. म्हणूनच प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मी स्वतःला सांगते, ‘ही माझी पहिली आणि शेवटची कलाकृती आहे. त्यामुळे तसेच ‘एफर्ट्स’ आपल्याला द्यायचे आहेत’. गेले जवळपास अडीच वर्ष आम्ही या चित्रपटावर काम करतोय. आमच्या परीने आम्ही बेस्ट द्यायचा प्रयत्न केला आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने मी अनेक गोष्टी नव्याने शिकले. मी पूर्वी सायकल चालवत नव्हते, पण भूमिकेसाठी मी सराईतपणे सायकल चालवायला शिकले. तसंच पायात चमचा धरून खायला शिकले. चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत मला हे सहज जमू लागलं होतं.”
=========
हे देखील वाचा – मन उधाण वाऱ्याचे: अनेकांच्या विस्मरणात गेलेली आठवणीतली मालिका
=========
दुर्वापासून अनन्यापर्यंतच्या प्रवासात तुझ्यामध्ये काही बदल झाला आहे का, या प्रश्नावर हृता म्हणाली, “कलाकार म्हणून बदल झाला आहेच आणि तो व्हायलाच हवा. दुर्वाच्या वेळी मी केवळ १८ वर्षांची होते, नवखी होते. आता बरीच वर्ष मी क्षेत्रात आहे. गाठीशी थोडाफार अनुभव आहे. मुख्य म्हणजे आता मी ‘नाही’ म्हणायला शिकलेय.” (Journey of Hruta Durgule)
हृता दुर्गुळे सोशल मीडियावरही सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचे २५ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. ‘न्यूज १८’ च्या रिपोर्टनुसार ती इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स असणारी मराठी नायिका आहे. ‘अनन्या’ पाठोपाठ तिचा ‘टाईमपास ३’ हा चित्रपटही प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटाच्या टीझरलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकंदरीतच अभिनेत्री म्हणून हृता गगनभरारी घेणार यात काही शंकाच नाही.
शब्दांकन: मानसी जोशी