Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

सनी देओलचा रुद्रावतार “अर्जुन पंडित”ची पंचवीशी
राजकुमार संतोषी दिग्दर्शित “घायल” (१९९०) आणि “दामिनी” (१९९३) च्या खणखणीत यशाने सनी देओल म्हणजे रुपेरी पडद्यावर जोरदार शोरदार आव्हानात्मक डायलॉगबाजी हवीच हे एक समीकरण घट्ट झाले. “दामिनी”तील तारीख पे तारीख, तारीख पे तारीख…तारीख मिल तो रही है लेकिन इन्साफ नहीं मिल रहा (प्रचंड टाळ्या शिट्ट्या), जब ये ढाई किलो का हाथ किसी पे पडा है ना… तो आदमी उठता नहीं… उठ जाता है (आता अशा जबरदस्त टाळ्या शिट्या की थिएटरचे छप्पर उडून जाण्याची भीती) या यशानंतर “खास लोकाग्रहास्तव” (बाय पब्लिक डिमांड) असे काही डायलॉगचे पेरणे “घडणे बिघडणे” चित्रपटाच्या जगात होतच असते. (Rahul Rawail)

स्टारची इमेज कॅश करण्याचे ते एक तंत्र असते. सनी देओलने पडद्यावर येताच खलनायक आणि त्याच्या उजव्या डाव्या आजूबाजूच्या हातांत धडकी भरावी, कापरं भरावे, सनीने त्यांना दम द्यावा, पब्लिकने टाळ्या व शिट्ट्यांनी थिएटर डोक्यावर घ्यावे, आणि मग “पिक्चरची पुढची स्टोरी” सुरु व्हावी असे जणू समीकरण घट्ट झाले. चित्रपटाचे वितरक व थिएटरचे चालक अर्थात प्रदर्शक यांना “हाऊसफुल्ल गर्दी” साठी हेच तर हवे असते. चित्रपट हा एक व्यवसाय आहे हे स्वीकारले तर असे फंडे गैर वाटत नाहीत.
असाच एक सनी देओलचा “दे मार पिक्चर” म्हणजे एन. आर. पचिसिया निर्मित व राहुल रवैल (Rahul Rawail) दिग्दर्शित “अर्जुन पंडित” (मुंबईत रिलीज २० ऑगस्ट १९९९. चक्क पंचवीस वर्ष पूर्ण झाली देखिल. तरीही सनी देओल त्याच आक्रमक मूडमध्ये आहे). हा खरं तर कन्नड भाषेतील चित्रपट “ओम” (१९९५)ची रिमेक. त्यात सनी देओलची शक्ती एकदम फिट्ट बसत असेल तर? पहिली नायकाची प्रतिमा महत्वाची. पब्लिक तीच डोक्यात ठेवून पिक्चरचं तिकीट काढून पडद्यावरील घटनांत गुंतत गुंतत जातो. या चित्रपटाची कथा उपेंद्रची, पटकथा सुधीर मिश्रा, शिवकुमार सुब्रमण्यम व संदीप ए. वर्मा यांची. ती रचताना सर्व काही सनी देओलभोवती हे स्वाभाविकच. तर संवाद के. के. सिंग यांचे. ते चमकदार संवादासाठी प्रसिद्ध होते.

हा “अर्जुन पंडित” ( अर्थात सनी देओल) गँगस्टर असून माॅडेल निशावर ( जुही चावला) त्याचे एकतर्फी प्रेम आहे. निशा त्याच्या प्रेमाला प्रतिसाद न देता दुसरचं कोणाही लग्न करण्याचे ठरवते हे अर्जुन पंडित सहन कसे करणार? त्याचे फंटर निशालाच पळवतात….. पण अर्जुन पंडित असा मुळीच नसतो. त्याच्या पूर्वायुष्यात असे काय घडते की हरिव्दारचा शांत आणि ईश्वरप्रेमी अर्जुन दीक्षित हा मुंबईतील अंडरवर्ल्डचा अर्जुन पंडित बनतो याची गोष्ट म्हणजे हा चित्रपट.
नव्वदच्या दशकात हिंदी चित्रपटात अंडरवर्ल्ड, गॅन्गस्टर यावरच्या गोष्टी येत होत्याच (रामगोपाल वर्मा दिग्दर्शित “सत्या” हा १९९८ चा चित्रपट मोठेच उदाहरण). सनी देओलला खणखणीत आवाजातील डायलॉगबाजी आणि तगड्या फायटींगला उत्तम संधी मिळाली. तो खुश पब्लिक खुश. चित्रपटात आशीश विद्यार्थी, मुकेश ऋषि, सौरभ शुक्ला, अन्नू कपूर इत्यादींच्याही भूमिका. चित्रपटाचे छायाचित्रण निर्मल जानी याचे.

दिग्दर्शक राहुल रवैल हा “बाॅबी” (१९७३)च्या वेळेस राज कपूरकडे तर “धरम करम” (१९७६)च्या वेळेस रणधीर कपूरकडे सहाय्यक दिग्दर्शक होता. त्याने स्वतंत्रपणे दिग्दर्शनात पाऊल टाकले त्यात काय घडावे? त्याचा पहिला चित्रपट “गुनहगार” (१९८०. ऋषि कपूर व परवीन बाबी) हा उत्तर भारतात सर्वप्रथम प्रदर्शित होऊन फ्लाॅप ठरला म्हणून मुंबईत त्याला कोणी रिलीजच करेना. चित्रपटाच्या जगात यश हेच चलनी नाणे. राजेंद्र कुमारने आपला मुलगा कुमार गौरवला अभिनय क्षेत्रात आणताना याच राहुल रवैलकडे दिग्दर्शन सोपवून “लव्ह स्टोरी”ची निर्मिती केली. पण चित्रपट पूर्ण होताच काही वाद झाले आणि राहुल रवैल (Rahul Rawail)चे नावच चित्रपटातून हटवण्यात आले.

धर्मेंद्रने सनी देओलला चित्रपटसृष्टीत आणताना याच राहुल रवैलकडे “बेताब” (१९८३) सोपवला. त्याचे बरेच रिशूटींग झाले. तो सुपरहिट होताच राहुल रवैल व सनी देओल जोडी जमली. आणि ते “अर्जुन” ( १९८५), “ङकैत” (१९८७) आणि मग “जो बोले सो निहाल” (२००५) साठी एकत्र आले. राहुल रवैलने (Rahul Rawail) बेखुदी ( १९९२. कमल सदनाह व काजोलचा पहिला चित्रपट), और प्यार हो गया (१९९७. ऐश्वर्य राॅयचा पहिला चित्रपट) इत्यादी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यातला जावेद अख्तरची पटकथा असलेला “जीवन एक संघर्ष” (१९९०) हा चित्रपट जावेद अख्तरने सलिम खानसोबत लिहिलेल्या सर्वकालीन सुपरहिट “दीवार” (१९७५) ची फसलेली रिमेक होता. सलिम खान व जावेद अख्तर यांच्या फसलेल्या पटकथांवर कधी तरी फोकस टाकण्याचा योग येईलच.
==========
हे देखील वाचा : “शोले” प्रदर्शित झाल्याचा दिवस….
==========
असो. फार पूर्वी ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित “अर्जुन पंडित” (१९७६) हा चित्रपट पडद्यावर आला होता. त्याचे कथानक वाल्याचा वाल्मिकी होतो अशा आशयाचे होते. एक खतरनाक डाकू (संजीवकुमार) एका हृदयस्पर्शी अनुभवातून कसा सुधारतो याची गोष्ट त्यात होता. मुंबईत मेन थिएटर राॅक्सीत या चित्रपटाने शंभर दिवसाचे यश प्राप्त केले होते. चित्रपटात अशोककुमार, विनोद मेहरा, दक्षिणेकडील अभिनेत्री श्रीविद्या, बिंदू, सचिन पिळगावकर, शुभा खोटे इत्यादीच्याही भूमिका आहेत.
एक “अर्जुन पंडित” संजीवकुमारचा होता, एक सनी देओलचा. दोन्हीत परिस्थितीनुसार नायकात होणारा बदल हे काॅमन सूत्र आहे इतकेच. हिंदी चित्रपटाने अशा अनेक गोष्टींसह प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे…. आपल्याकडचा चित्रपट त्यासाठीच ओळखला जातो.