
Supriya : चमेलीच्या भूमिकेत सुप्रिया नाही तर पल्लवी जोशी असत्या?; काय आहे किस्सा…
१९८० च्या दशकापासून दूरचित्रवाणी, नाटक आणि चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री सुप्रिया (Supriya Pilgoankar) यांनी आजवर अनेक कामं केली. पण आजही १९८४ साली आलेला ‘नवरी मिळे नवऱ्याला’ (Navari Mile Navaryala marathi movie) हा चित्रपट आणि त्यात त्यांनी साकारलेली चमेली प्रेक्षकांना लक्षात आहे. पण तुम्हाला माहित आहे का या भूमिकेसाठी सुप्रिया नाही तर पल्लवी जोशी यांचं नाव आधी चर्चेत होतं. नेमका काय किस्सा होता वाचा…(Supriya Pilgoankar)
सचिन पिळगांवकर (Sachin Oilgoankar) यांनी बालपणापासूनच अभिनय करण्यास सुरुवात केली होती. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत असताना १९८२ मध्ये ‘माई बाप’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करत त्यांनी नवा अध्याय कलाक्षेत्रात सुरु केला होता. त्या नंतर १९८४ साली आलेल्या ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या त्यांच्या दिग्दर्शित चित्रपटाला कमर्शियल यश मिळालं आणि दिग्दर्शक म्हणून सचिन यांचं नाव उदयास आलं. चित्रपट तर गाजलाच पण यातील चमेली कशी भेटली जाणून घेऊयात… (Marathi films stories)

तर, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ हा सुप्रिया यांचा पहिला चित्रपट. सचिन पिळगांवकर या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. खरं तर या चित्रपटामुळे सुप्रिया यांचे आई- वडील त्यांच्यावर रागावले होते. या चित्रपटासाठी चक्क सचिन पिळगावकर यांच्या आईने सुप्रिया यांची शिफारस करत त्यांनी स्वतः सुप्रिया यांना या चित्रपटात घेण्यासाठी आपल्या मुलाकडे शब्द टाकला होता. पण सुप्रियाच्या आई-वडिलांना त्यांनी नाटकात काम करणं पसंत होतं. त्या पलिकडे जाऊन चित्रपटात त्यांनी कामं करावी यासाठी त्यांचा विरोध होता. (Entertainment)
============
हे देखील वाचा : Chhaava : मुंबईत बॉलिवूडचीच हवा; मग मराठी चित्रपट कुठे गेला?
============
‘नवरी मिळे नवऱ्याला’ या चित्रपटातील सचिन-सुप्रिया अर्थात जयराम आणि चमेली ही पात्र प्रेक्षकांना फारच आवडली होती. याच चित्रपटामुळे खऱ्या जीवनातही दोघांना एकमेकांची कायमस्वरुपाची साथ लाभली. चित्रपटाच्या शुटींगआधी या भूमिकेसाठी अभिनेत्रीचा शोध सुरु होता. मेकर्सना या भूमिकेसाठी नवीन आणि चुणचुणीत मुलगी हवी होती. सुप्रिया यांचं एक नाटक पाहून त्यांना या चित्रपटात घेण्याचा विचार होता; पण निर्माते सतीश कुलकर्णींना त्या भावल्या नव्हत्या. दिग्दर्शक सचिन यांनी सतीश यांना समजवण्याचा प्रयत्न केला होता पण काही घडत नव्हतं. त्यावेळी आणखी काही मुलींचं ऑडिशन घ्यावं या उद्देशाने मुली पाहिल्या गेल्या. या मुलींच्या यादीत पल्लवी जोशी (Pallavi Joshi) देखील होत्या. वयाने लहान असल्यामुळे या भूमिकेसाठी त्या परफेक्ट असतील असं वाटल्यामुळे त्यांना नऊवारी नेसून त्यांची लूकटेस्ट करण्यात आली. पण त्या इतक्या बारीक होत्या की चार-चार साड्या एकावर एक नेसल्या तरीही फार काही फरक पडला नव्हता. अखेर निर्मात्यांनी चमेली या भूमिकेसाठी सुप्रिया यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केला आणि नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातून सुप्रिया यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. (Untold stories)

‘नवरी मिळे नवऱ्याला’ हा चित्रपट खरंच फारच गाजला होता. चित्रपटाचं कथानक, गाणी आणि एकाहून एक दर्जेदार कलाकार यांना प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिली होता. या चित्रपटात सचिन, सुप्रिया, अशोक सराफ, निवेदिता सराफ, आशालता, जयराम कुलकर्णी, श्रीकांत मोघे, नीलिमा परांदेकर, दया डोंगरे असे दिग्गज कलाकार यात होते. विशेष म्हणजे १९९० मध्ये लग्नगाठ बांधणारे अशोक सराफ आणि निवेदिता जोशी नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटात भाऊ-बहिण होते. (Marathi classic movies)

पुढे सुप्रिया यांनी ‘कुंकू’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘माझा पती करोडपती’, ‘नवरा माझा नवसाचा’ , ‘आम्ही सातपुते’, ‘एकुलती एक’, ‘आयत्या घरात घरोबा’, या चित्रपटांमध्ये सचिन यांच्यासोबत काम केलं होतं. तसेच, सुप्रिया यांनी मराठी नाही तर ‘बरसात’, ‘दिवाने हुये पागल’, ‘ब्लफमास्टर’, ‘ऐतबार’, ‘आवारा पागल दिवाना’, ‘तुझे मेरी कसम’, ‘हिचकी’, ‘खुबसुरत’ या चित्रपटांमध्येही त्यांनी उल्लेखनीय कामं केली.
रसिका शिंदे-पॉल