एक अभिनेत्री… एक गायिका… आणि एक प्रेमिका…. सुरैय्या म्हणजे सुरेल प्रेमाची अबोल कहाणी….
सुरैय्या. आजच्या पिढीला हे नाव कदाचित माहित नसेल. पण हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये ज्या कलाकारांनी प्रारंभीच्या काळात आपला ठसा उमटवला. या चित्रसृष्टीला उभारी दिली. स्थापित केलं. त्यामध्ये सुरैय्या हे नाव मुख्य आहे. एक अभिनेत्री. एक गायिका. आणि एक प्रेमिका. सुरैय्या म्हणजे सुरेल प्रेमाची अबोल कहाणी…
सुरैय्या जमाल शेख यांचा जन्म पंजाबचा. 15 जून 1929 रोजी एका मुस्लिम कुटुंबात त्यांचा जन्म झाला. गुंजरावाला, पंजाब हे त्याचं गावं आता पाकिस्तानमध्ये आहे. सुरैय्या म्हणजे गाता गळा आणि सौदर्य यांचा मिलाफ. आश्चर्य म्हणजे त्यांनी कुठेही गाण्याचे शिक्षण घेतले नव्हते. खलनायकाच्या भूमिका करणारे जहूर हे सुरैय्या यांचे काका. त्यांच्यामुळे 1937 मध्ये सुरैय्या उसने क्या सोचा या चित्रपटात बालकलाकाराच्या भुमिकेत पडद्यावर दिसल्या. पुढे 1941 मध्ये शाळेच्या सुट्टीमध्ये त्या मोहन स्टुडीओत शुटींग बघण्यासाठी गेल्या. तिथे ताजमहल चित्रपटाचे शुटींग चालू होते. दिग्दर्शक नानूभाई वकील यांनी सुरैय्याला पाहिले. त्यांनी तिथेच सुरैय्या यांना मुमताज महलच्या लहानपणीच्या भुमिकेसाठी पसंद केले. संगीतकार नौशाद यांनीही त्यांचा फक्त रेडीओवर आवाज ऐकला. या ऑडीओ टेस्टवरुनच नौशाद यांनी सुरैय्या यांच्याकडून त्यांच्या शारदा चित्रपटाची गाणी गाऊन घेतली. अशाप्रकारे कोणतीही ऑडीशन न देता सुरैय्या चित्रपटात स्थिर झाल्या. याच दरम्यान भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर चित्रपट सृष्टीत असलेल्या नूरजहॉं आणि खुर्शीद बानो यांनी पाकिस्तानात जाणे पसंत केले. सुरैय्या मात्र आपल्या देशातच राहिल्या. त्याकाळी बॉलिवूडमध्ये त्या एकमेव गाणा-या आणि अभिनय करणा-या कलाकार होत्या. साजहजिकच त्यांचे मानधनही सर्वाधिक होते.
सुरैय्या यांनी अनेक चित्रपट केले. ब्लॅक ॲण्ड व्हाईट चित्रपटांचा जमाना होता तो. सुरैय्या जेव्हा चित्रपटसृष्टीमध्ये स्थिर स्थावर झाल्या तेव्हाच देव आऩंद यांची एन्ट्री झाली. सुरैय्या आणि देवआनंद यांचा पहिला चित्रपट विद्या. याच चित्रपटामधील एक प्रेम प्रसंगात हे दोघं प्रेमात पडले. हे दृष्य पहिल्याच टेकमध्ये ओके झालं. आणि या दोघांमधील प्रेमाची गोष्ट दबक्या आवाजात ऐकू येऊ लागली. या दोघांनी पुढे पाच चित्रपट एकत्र केले. दोघंही एकमेकांच्या प्रेमात अकंढ बुडालेले असायचे. त्यांनी एकमेकांना टोपणनावंही ठेवली होती. सुरैय्या देव आनंद यांना स्टीव्ह म्हणायच्या. एका कादंबरीच्या हिरोचं ते नाव होतं. तर देवआनंद सुरैय्या यांना नोसी म्हणायचे. कारण सुरैय्या यांचं नाक लांब होतं. जीत आणि दो सितारे हे या जोडीचे चित्रपटही खूप चालले. त्यातून त्यांचे प्रेमही बहरत होते. सुरैय्या यांचं करिअरही बहरत होतं. त्यांच्याकडे निर्मात्यांच्या रांगा लागयच्या. त्यांनी शमा, मिर्झा गालिब, खिलाडी, सनम, कमल के फूल, शायर, अनमोल घडी, हमारी बात या चित्रपटातही भूमिका केल्या. सुरैय्या यांची एक झलक पाहण्यासाठी हजारो लोक त्यांच्या नरिमन पॉईंट येथील निवासस्थानाजवळ थांबायचे. त्यामुळे अनेकवेळा ट्रॅफीक जमा होत असे.
ही लोकप्रियताच बहुधा सुरैय्या आणि देवआनंद यांच्या प्रेमाच्या मध्ये आली असावी. कारण टॉपला असलेल्या आपल्या नातीनं नवोदीत कलाकारावर प्रेम करणं सुरैय्या यांच्या आजीला मान्य नव्हतं. लव्हस्टोरी म्हटली की व्हिलन तर येणारच. या लव्हस्टोरीमध्ये सुरैय्या यांची आजी व्हीलनच्या भूमिकेत होती. सुरैय्या या मुस्लिम घरातील. तर देवआनंद हिंदू. दोन धर्माचं अंतर या प्रेमी जोडप्यामध्ये आलं. सुरैय्या यांच्या आजीला आपल्या नातीनं दुस-या जातीतील मुलाबरोबर प्रेम करण मंजूर नव्हतं. त्यामुळे सुरैय्या यांच्यावर त्यांनी अनेक बंधनं घातली. सुरैय्या यांच्या आईला जावई म्हणून देवआनंद पसंत होते. पण त्याच्या सासूपुढे त्यांचं काहीच चाललं नाही. सुरैय्या यांना देवआनंद यांनी तीन हजार रुपयांची हि-याची अंगठी भेट म्हणून दिली होती. त्यावेळी तीन हजार म्हणजे आता लाखापर्यंत अंगठीची किंमत होती. पण सुरैय्या यांच्या आजीनं ती अंगठीही काढून घेतली. त्यांनी सुरैय्या यांच्या बाहेर जाण्यावरही कडक बंधनं घातली. ऑटोबायोग्राफी ‘रोमांसिंग विथ लाइफ’ या देवआनंद यांच्या पुस्तकात या घटनांचा उल्लेख आहे. या पुस्तकात देवआनंद यांनी सुरैय्या यांचा आपलं पहिलं प्रेम असा उल्लेख केला आहे.
सुरैय्या यांच्या आजीच्या वाढत्या जाचामुळे देवआनंद यांनी सुरैय्या पासून दूर रहाणे पसंद केले. पुढे त्यांनी कल्पना कार्तिक यांच्याबरोबर लग्न केले. पण सुरैय्या यांचे काय झाले. सुरैय्या यांनी एकावरच प्रेम केले. ते म्हणजे देवआनंद यांच्याबरोबर. त्या आजन्म अविवाहीत राहिल्या. वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी त्यांचं निधन झालं. लग्न करेन देवआनंद बरोबर ही शपथ त्यांनी शेवटपर्यंत पाळली. त्या अविवाहीतच राहिल्या….
इकडे देवआनंद यांनीही आपला शब्द पाळला. ते कधीही सुरैय्या यांना भेटले नाहीत. पण या दोघांमधील प्रेम मात्र कायम राहीलं. देवआनंद यांनी आपल्या मुलींच नाव देविना ठेवलं. या प्रेमीयुगुलानं भविष्यात आपल्याला होणा-या मुलां-मुलींची नावंही काढली होती. त्यात मुलीचं नाव देविना हे काढण्यात आलं होतं. पुढे देवाआनंद यांना मुलगी झाल्यावर तेच नाव ठेवण्यात आलं. पण हे सर्व करतांना देवआनंद एकाच शहरात राहूनही कधीही सुरैय्या यांना भेटले नाहीत. फारकाय पण सुरैय्या यांच्या निधनानंतरही देवआनंद यांनी त्यांना न भेटण्याचं आपलं वजन पाळलं. सुरैय्या यांचा 31 जानेवारी 2004 रोजी मृत्यू झाला. त्यांना अंतिम निरोप देण्यासाठीही देवआनंद आले नाहीत. एक प्रेमकहाणी फुलण्याआधी कायमचीच अबोल राहीली….