
Suresh Wadkar : ‘ही’ गजल गायल्यावर सुरेश वाडकर का अस्वस्थ होते?
प्रत्येक कलावंताचं एखादं गाणं त्यांचं सिग्नेचर सॉंग असतं. हे गाणं ऐकलं की लगेच त्या कलाकाराचा चेहरा डोळ्यापुढे येतो. गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांनी सत्तरच्या दशकात गायलेले एक गाणं इतकं लोकप्रिय झालं की आज देखील कुठल्याही मैफिलीत गेल्यानंतर त्यांना त्या गाण्याची फर्माईश होते. पण गंमत म्हणजे जेव्हा हे गाणे रेकॉर्ड झालं त्यावेळेला सुरेश वाडकर यांना या गाण्यात काही तरी कमतरता, उणीव वाटत होती. गाताना आपलं काहीतरी चुकलं आहे असं त्यांना वाटत होतं. म्हणून त्यांनी संगीतकाराला या गाण्याची पुन्हा एकदा रेकॉर्डिंग करण्याची मागणी केली. परंतु संगीतकारांनी ती मागणी मान्य न करत गाणे उत्तमच गायले आहे असे सांगितले.

सुरेश वाडकर (Suresh Wadkar) मात्र आपल्या गाण्याबद्दल फारसे समाधानी नव्हते. ते अस्वस्थ होते. तेव्हा सुरेश वाडकर यांना या क्षेत्रातील एका महान व्यक्तीने धीर दिला. हे गाणं जेव्हा रिलीज झालं तेव्हा प्रचंड लोकप्रिय ठरलं या गाण्याने सुरेश वाडकर यांच्या करिअरला फार मोठा आधार दिला. जे गाणं स्वतः गायकाला आवडलं नव्हतं त्याच गाण्याने त्या गायकाचे करिअर घडले! असे म्हणता येईल. कोणतं होतं ते गाणं आणि काय होता नेमका किस्सा?
सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांचा जन्म (७ ऑगस्ट १९५५) कोल्हापूरचा जरी असला तरी आमचं बालपण मुंबई गिरगावात गेलं. त्यांचे वडील गिरणी कामगार होते. घरात टिपिकल मध्यमवर्गीय वातावरण. वयाच्या तेराव्या वर्षापासून त्यांनी गाण्याचे विधिवत शिक्षण घ्यायला सुरुवात केली. ‘प्रभाकर’ ही प्रयाग संगीत समितीची स्नातक पदवी प्राप्त केल्यानंतर आर्य विद्या मंदिर या शाळेत संगीत शिक्षक म्हणून सुरुवात देखील झाली. पण चित्रपटात गाण्याची मनात मनीषा होतीच. १९७६ साली सुरसिंगार स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. या स्पर्धेचे परीक्षक होते संगीतकार रवींद्र जैन आणि संगीतकार जयदेव. या स्पर्धेचे सुरेश वाडेकर विजेते ठरले.

संगीतकार रवींद्र जैन यांनी राजश्रीच्या ‘पहेली‘ या चित्रपटात त्यांना पहिल्यांदा गायची संधी दिली. गाण्याचे बोल होते बृष्टि पड़े टापुर-टुपुर. यानंतर संगीतकार जयदेव यांनी ‘गमन’ या चित्रपटातील एक गझल त्यांना गायला दिली. या गझलेचे बोल होते ‘सीने में जलन आंखो में तुफान सा क्यू है…’ ही गझल शहरीयार यांनी लिहिली होती. जयदेव यांनी सुरेश वाडकर यांना सांगितले, ”या गझलसाठी तुला खूप प्रॅक्टिस करावी लागेल. यातील शब्दांवर आणि आशयावर विशेष लक्ष दे.” सुरेश वाडकर यांनी या गजलची खूप प्रॅक्टिस केली आणि नंतर एका टेकमध्ये ही गजल रेकॉर्ड देखील झाली! पण आपण यापेक्षा अजून चांगले जाऊ शकतो म्हणून ते संगीतकार जयदेवाना यांना म्हणाले, ”आपण आणखी एक टेक घेऊ या.” पण जयदेव म्हणाले,”तू व्यवस्थितच गायला आहेस. त्यामुळे पुन्हा टेक घ्यायची गरज नाही!” पण सुरेश वाडकर (Suresh Wadkar) मात्र आणखी एका टेकसाठी आग्रही होते. पण जयदेव यांनी साफ नकार दिला. शेवटी ते नाराजीतच घरी आले आणि अक्षरशः रडायला लागले. करीयरच्या सुरुवातीलाच असा प्रसंग घडल्याने ते दु:खी होते.
================
हे देखील वाचा : Javed Akhtar : अभिनेता धर्मेंद्रने जावेद अख्तरची का माफी मागितली होती ?
================
दुसऱ्या दिवशी ते तडक ‘प्रभू कुंज’ वर जाऊन लता मंगेशकर यांना भेटले व त्यांना पूर्ण प्रसंग सांगितला. Lata Mangeshkar हसल्या आणि म्हणाल्या, ”हे बघ, जेव्हा स्वत: जयदेव म्हणतायत की गाणं योग्य झाला याचा अर्थ गाणं योग्यच झालं आहे. यावर आता चर्चा नको. जयदेवसारखा अभ्यासू आणि प्रतिभावान संगीतकार जेव्हा चांगलं झालं असं म्हणतो त्यावेळेला त्यात शंका कुशंका काढायची गरज नसते.” दिदीच्या शब्दांनी सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांना धीर आला. ते सावरले.
काही महिन्यांनी चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाला माफक यश मिळालं. पण या सिनेमातील ही गझल आज देखील प्रचंड लोकप्रिय आहे. सुरेश वाडकर (Suresh Wadkar) हे नाव या गझले मुळेच देशभर लोकप्रिय झालं आणि त्यांच्या करीअरला खऱ्या अर्थाने याच गझलेने आकार दिला. आजही सुरेश वाडकर मैफिलीच्या निमित्ताने जगभर कुठेही गेले तरी रसिकांकडून या गजलेचा आग्रह नक्की असतो. ‘सीने में जलन आंखो में तुफान सा क्यू है इस शहर में हर शख्स परेशान सा क्यू है…’