‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
सोहराई पोटरुचा ऑस्करमध्ये दबदबा…
एअर डेक्कनचे सीईओ गोपीनाथ यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारीत असलेला तामिळ चित्रपट सोहराई पोटरु हा ऑस्कर पुरस्काराच्या यादीत सर्वाधिक चर्चेचा चित्रपट ठरला आहे. सुधा कोंगारा दिग्दर्शित या चित्रपटात तामिळ सुपरस्टार सूर्या याची प्रमुख भूमिका आहे. ऑस्करसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन या विभागात सोहराई पोटरु चित्रपटाचा समावेश झाला आहे.
येत्या 15 मार्च रोजी ऑस्कर पुरस्कारांची घोषणा होणार आहे. सूर्याचे चाहतेही यामुळे उत्साहीत झाले आहेत. कोरोनामुळे सोहराई पोटरु हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला. उत्तम कथा, सूर्याचा अभिनय, सुधा कोंगारा यांचं दिग्दर्शन आणि सोबत सुमधूर गाणी यामुळे ॲमेझॉनवरही हा चित्रपट सर्वाधिक बघितला गेला. त्यातच ऑस्करच्या स्पर्धेत चित्रपट आल्यानं सोहराई पोटरु चित्रपटाला सर्वाधिक पाहण्यात आल्याची नोंद गुगलनं केली आहे.
93व्या ऑस्कर (The Oscars 2021) पुरस्कारांच्या यादीत भारतीय भाषांच्या श्रेणीत सोहराई पोटरु (Soorarai Pottru) चित्रपटानं आपलं स्थान मिळवलं आहे. यासाठी तब्बल 366 चित्रपट होते. त्यात सोहराई पोटरु सरस ठरला. तामिळमध्ये ॲक्शनकिंग म्हणून सूर्या या अभिनेत्याची ओळख आहे. गजनी, सिंघम सारख्या सूपरहिट चित्रपटातून त्याच्या ॲक्शनसीनची मोठी चर्चा झाली होती. मात्र सोहराई पोटरुमध्ये एक विमान कंपनी चालू करण्यासाठी धडपडणा-या सामान्य पायलटची भूमिका त्यानं साकारली आहे. मध्यमवर्गीय माणसानं घेतलेली मोठी झेप. त्यासाठी केलेले प्रयत्न, प्रतिस्पर्ध्यावर केलेली मात अशा अनेक अंगामधून सूर्याची भूमिका चोख ठरली आहे.
एअर डेक्कनचे सीईओ गोपीनाथ यांच्या जीवनावरील कथा असलेला हा चित्रपट कोरोनामुळे चांगलाच रखडला. सूर्या आणि त्याच्या सहकलाकारांचा ओटीटी माध्यमवर चित्रपट प्रदर्शित करण्यास विरोध होता. मात्र कोरोनाचा जोर वाढल्यानं अखेर चित्रपट ॲमेझॉन पाइमवर प्रदर्शित करण्यात आला.
चित्रपटात सूर्या सोबत परेश रावल, अपर्णा बालमुराली, उर्वशी, मोहन बाबू, करुणास यांच्याही भूमिका आहेत. मदुराई, चेन्नई आणि चंदिगढ मध्ये चित्रपटाचे चित्रिकरण झाले आहे. जी. व्ही. प्रकाश कुमार यांनी सोहराई पोटरुला संगीत दिले असून त्यातील गाणी सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांमध्ये समाविष्ट आहेत. गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्येही सोहराई पोटरु चित्रपटाचा बोलबाला झाला. सर्वोकृष्ट अभिनयासह अनेक पुरस्कार या चित्रपटाला मिळाले आहेत. भारतामधील अॅमेझॉन प्राइमच्या इतिहासात सोहराई पोटरु हा सर्वाधिक पाहिलेला प्रादेशिक भाषेचा चित्रपट ठरला आहे. त्यामुळेच या चित्रपटाला आता ऑस्कर पुरस्कार मिळेल असा दावा सूर्याचे चाहते करत आहेत. अर्थात त्यासाठी 15 मार्चपर्यंत वाट बघावी लागणार आहे.