सुयशची आठवणींसोबत सायकलफेरी
मोठेपणी आपण कितीही लाखो करोडोंच्या आलिशान कारमधून फिरलो तरी शाळेत मित्रांसोबत सायकलवरून फिरण्याच्या आठवणी लाखमोलाच्या असतात. अशी सायकलस्वारी प्रत्येकाने अनुभवलेलीच असेल. जोपर्यंत स्व:ताची सायकल नसते तेव्हा वडीलांच्या सायकलवर डोळा ठेवून सुट्टीच्यादिवशी सायकल राइड घेणारी पिढी आता मागे पडली असली तरी त्या सायकलच्या आठवणी कित्येकांच्या आयुष्यात जपून राहिल्या आहेत.
अशीच एक छान आठवणच नव्हे तर ४० वर्षापूर्वीची सायकलही अभिनेता सुयशने जपून ठेवली आहे. नुकतीच त्याने या सायकलवरून ३८ किलोमीटरची सफर केली आणि हा किस्सा इन्स्टा पेजवरून हजारो फॉलोअर्सपर्यंतही पोहोचवला. सुयशने पोस्ट केलेल्या या सायकलच्या पोस्टमध्ये त्याने व्यक्त केलेल्या भावनांवर अर्थातच कमेंटचा वर्षाव झालाय.
सुयश टिळक हा पर्यावरणशास्त्राचा विद्यार्थी असल्याने आणि सातत्याने पर्यावरण संवर्धनाविषयी केवळ बोलणंच नव्हे तर कृतीही करणारा अभिनेता आहे हे आता बहुतेक सगळ्यांनाच माहित आहे. प्राण्यांविषयी त्याचे प्रेमही जगजाहीर आहे. उत्सवांच्या निमित्ताने पर्यावरणाची होणारी हानी कशी चुकीची आहे यावर त्याचे अनेक व्हिडिओदेखील खूप लोकप्रिय आहेत. त्यामुळे सायकलवर त्याचा जास्तच जीव असणार हे ओघाने आलेच.
पुण्यातल्या घरी सुयशच्या वडीलांची ४० वर्षापूर्वीची सायकल आजही आहे. अॅवॉन एमटीबी या कंपनीची ही सायकल. याच सायकलवरून अनेकदा सुयश लहानपणी वडीलांसोबत फिरला तर आहेच पण कॉलेजच्या दिवसात त्याने या सायकलवरून सफरही केली होती. पुढे घरी बाइक, गाडी आली आणि ही जुनी पण खूप आठवणी जोडलेल्या असलेली सायकल घराच्या पोर्चमध्ये विसावली.
४० वर्षानंतर सुयशने या सायकलवरून भटकंती करायचे ठरवले. पण सध्याच्या रस्त्यांची खड्डेमय अवस्था आणि पुण्यातील प्रचंड ट्रॉफिक यामध्ये या सायकलचा कसा काय टिकाव लागणार हा प्रश्न सुयशसमोर आला आणि सुरूवातीला त्याने एक पाऊल मागे घेतले आणि चार दशकांपासून टिळकांच्या कुटुंबीयांचा एक भाग असलेल्या या सायकलला डोळे भरून पाहण्याचे सुख घेतले. मात्र सायकलवरून फिरण्याचा मोह काही सुयशला स्वस्थ बसू देत नव्हता.
सुयशने या सायकलचे टायर्स बदलले, सीट दुरूस्त करून घेतली. हँडल नीट केले. थोडाफार कलर देऊन तिला सजवले. सुयश सांगतो सायकलची कामं करून घेताना मेस्त्रीमामांना हे मात्र सांगितलं की सायकलच्या बॉडीला मात्र अजिबात हात लावायचा नाही. त्यामुळे सायकलचा व्हिंटेज लूक जसा आहे तसा ठेवून मी या सायकलचा मेकओव्हर केला. तरीही जेव्हा ठरवलं की सायकल सफरीला जायचं तेव्हा सायकल रस्त्यात टाय टाय फिश करणार नाही ना… पण सायकल फक्त दिसायला जुनी झाली होती, तिची एनर्जी अगदी ४० वर्षापूर्वीचीच होती कारण या सायकलस्वारीने मी ३८ किलोमीटर अंतर सुसाट कापले आणि बऱ्याच वर्षांनी या सायकलसोबत माझी गट्टी जमली.
लॉकडाउनकाळात सुयशने मुंबईच्या घरात अनेक प्रयोगशील उपक्रम केले. त्यामध्ये पर्यावरणाबाबतही काही उपक्रम होते. हरवत चाललेल्या संवादावर त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. लवकरच सुयश शुभमंगल ऑनलाइन या मालिकेत दिसणार आहे. सिनेमा, नाटक, मालिका आणि वेबसिरीज या सर्व माध्यमांमध्ये मोजकं पण निवडक काम करणाऱ्या सुयशची का रे दुरावा या मालिकेतील जयची भूमिका खूप गाजली होती. तर बापमाणूस या मालिकेत त्याने साकारलेला सूर्या या भूमिकेचा खास कोल्हापूरी लहेजाही अनेकांना आवडला. एक घर मंतरलेलं या मालिकेतही तो दिसला. गेले वर्षभरापासून सुयश छोट्या पडद्यावर दिसला नसला तरी ऑफस्क्रीन त्यांच्या खूप गोष्टी सुरू होत्या.
सुयशच्या घरातील या सायकलच्या आठवणीने त्याने एक संदेशही दिला आहे. अशा जुन्या गोष्टी केवळ काळाच्या ओघात निरूपयोगी होत नाहीत असं सांगत त्याने या गोष्टी, वस्तूंसोबत आपले काही क्षण जोडलेले असतात असंही सांगितलं आहे. सुयशच्या सायकलची पोस्ट वाचून त्याच्या चाहत्यांनीही म्हणे आम्ही पण आमची पहिली सायकल, पहिली गाडी अशीच जपू असं म्हणत त्याच्या सायकलप्रेमाला दाद दिलीय.
-अनुराधा कदम