ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
कुंजिका काळविंट…. गोड चेहऱ्याची व्हिलन !
मटा श्रावण क्वीन २०१६ ची ती, विजेती ठरली आणि अभिनय क्षेत्राच्या वाटेवरचा तिचा प्रवास सुरु झाला. ‘एक निर्णय’ या चित्रपटातून तिला पहिला ब्रेक मिळाला. तर ‘स्वामिनी’ मधील तिने साकारलेली आनंदीबाई प्रेक्षकांना पेशवेकाळात घेऊन गेली. सध्या ती ‘चंद्र आहे साक्षीला’ या सिरीअल मधून घराघरात पोहोचली आहे. जाणून घेऊया कुंजिकाच्या (Kunjika Kalwint) अभिनय क्षेत्रातील प्रवासाविषयी…
१) स्वामिनी मधील आनंदीबाई आणि चंद्र आहे साक्षीला मधील प्रिया दोन्ही कॅरॅक्टर निगेटीव्ह असली तरी या दोघींमध्ये तुला काय फरक जाणवतो?
आनंदीबाई तसं लोकांच्या परिचयाचं पात्र, मला ते पात्र प्रेक्षकांसमोर जिवंत करायचं होतं. दिग्दर्शकांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे ते शक्य झालं. पिरीऑडीक ड्रामा असल्यामुळे ह्या कॅरॅक्टरला वेगळी छटा होती. त्या सुंदर तर होत्याच पण त्याबरोबरच त्यांचे राजकीय डावपेच, रमा, गोपिकाबाई, राघोबा या प्रत्येकासोबतचं वेगवेगळं वागणं, असे अनेक कंगोरे या पात्राला होते म्हणून हे कॅरॅक्टर करताना मजा आली.
चंद्र आहे साक्षीला मधली प्रिया मुळात निगेटीव्ह नाहीये. आपण प्रेम करत असलेल्या संग्रामने आपल्यापासून गोष्टी लपवल्यामुळे, स्वाती बद्दलच सत्य कळल्यामुळे ती दुखावली जाऊन निगेटीव्ह होत जाते. ओवरऑल कॅरॅक्टर पाहता ती खूप हॅपी गो लकी टाइपची मुलगी आहे. अर्थात पिरीऑडीक ड्रामाला एक वेगळा ग्रेस असतो तो आनंदीबाईंमुळे अनुभवता आला. तर प्रियामुळे लूकवाईज बोलण्याच्या पद्धतीने एक ब्रेक मिळाला. स्वामिनीमध्ये एक बोलण्याची वागण्याची पेशवाई पद्धत होती पण प्रिया लंडनहून आलेली दाखवल्यामुळे तिच्या बोलण्याला वेगळा लहेजा आहे.
२) सुबोध भावेंसोबत याआधीही तू चित्रपटात काम केलं आहेस आणि आता मालिकेत काम करतेयस तर तो अनुभव कसा होता?
माझं पहिलं काम सुबोध भावेंच्या अपोझिट ‘एक निर्णय’ या चित्रपटात होतं. पहिलं काम त्यांच्या बरोबर केलं तेव्हा मी खूप घाबरले होते कारण एका सुपरस्टार समोर कोरी पाटी घेऊन मी उभी होते. पण त्यांनी थोडे किस्से सांगून, चिडवाचिडवी करून, वातावरण खेळीमेळीच ठेवत, मला सांभाळून घेतलं आणि काम सोप्प झालं. को-स्टार सोबतचा ऑकवर्डनेस एका दिवसात गेला आणि तो माझा छान मित्र झाला. आणि आता परत मालिकेत त्याच्या सोबत काम करायला मिळणार म्हणून मी खूपच खूश होते.
३.तुझ्या अभिनया बरोबर तुझ फोटोशूटही तितकच चर्चेत असत त्याविषयी काय सांगशील?
देवाच्या कृपेने आणि आईबाबांमुळे मला खूप सुंदर चेहरा मिळाला आहे. तो छान प्रेझेंट करावा असं मला वाटतं. नशीबाने खूप छान फोटोग्राफर, मेकअप आर्टिस्ट, कॉश्च्युम डिझायनर यांची टीम सोबत आहे. त्यामुळे मला फोटोशूट करायला खूप मजा येते. खूप दमले तरी मला दिवसेंदिवस फोटोशूट करायला आवडतं. फोटोशूट हा वेगळा अभ्यास आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. असं सहज कॅमेरासमोर उभं राहून फोटो काढला असं होतं नाही. मी माझे जुने फोटो आणि यू टयूब वर व्हिडीओ पाहून हा अभ्यास करत असते.
४) प्रत्येक पात्र जे पडद्यावर सहज दिसतं त्या मागे कलाकारांची विशेष मेहनत असते, अभ्यास असतो… तर तो अभ्यास तू कसा करतेस?
मी कुंजिका म्हणून जगते तेव्हा माझं आयुष्य मी दिग्दर्शित करते पण जेव्हा कुठलं पात्र माझ्याकडे येतं तेव्हा मला त्याच्या अनुषंगाने विचार करावा लागतो. उदाहरण द्यायचं तर चंद्र आहे साक्षीला मधील प्रिया म्हणून मी सीनच्या वेळी जगले तरच मला प्रिया एखाद्या प्रसंगी काय वागेल हे समजतं. दिग्दर्शकाने ते पात्र समजावून त्यात इनपूटस दिले की कॅरॅक्टर करायला रिऍक्शन द्यायला अजून मजा येते पण एकूणच यासाठी ते पात्र जगावं लागतं. तिची विचारसरणी अंगी बाणवावी लागते आणि हा अभ्यास इथून सुरू होतो. कलाकारांने कथा आणि पात्राची बॅकग्राउंड जाणून घेतल्याशिवाय, ते पात्र जगल्याशिवाय, पात्र जिवंत वाटत नाही. आणि दुसरा अभ्यास म्हणजे अनुभवी सहकलाकारांचा अभिनय, मॉनिटर समोर बसून मी लाईव्ह पाहते त्यातून खूप शिकायला मिळतं.
५.आतापर्यंत तू साकारलेल्या भूमिकांमधील तुला आवडलेली भूमिका कोणती आणि का?
खरंतर माझा खूप प्रवास झालेला नाहीये. पण आता जेवढं काम झालं त्यातल्या आनंदीबाई मला खूप आवडल्या. हे काम कायमंच माझ्या खूप जवळचं असेल. कारण अगदी सुरुवातीला हे कॅरॅक्टर करण्याचीघ माझी तयारी नव्हती. माझा चेहरा त्या भूमिकेला शोभेल का अशी भीती मनात होती. निर्माते वीरेंद्र प्रधान यांना गोड चेहऱ्याची व्हिलन या पात्रासाठी हवी होती. सुरूवातीला काही संमिश्र प्रतिक्रिया आल्या पण नंतर ही सोज्वळ व्हिलन सर्वांच्या मनात घर करून राहिली.
हे देखील वाचा: स्वामिनीमधील आनंदीबाई अर्थात कुंजिका काळविंट शेअर करतेय गणपतीच्या आठवणी.
६.भविष्यात आता कशा प्रकारची भूमिका करायला आवडेल?
असं ठरलेल काहीच नाही पण मला खूप काम करण्याची इच्छा आहे. मोठं काम करण्याची इच्छा आहे. जे पात्र मिळेल ते मोठं करण्याची इच्छा आहे. जे पात्र आवडेल किंवा एखाद्या स्टोरीबद्दल, कॅरॅक्टरबद्दल छान वाटतंय असं वाटेल ते नक्कीच करेन. सगळया प्रकारची काम करायला आवडतील.
७.तुझ्या आगामी प्रोजेक्ट विषयी काही सांगू शकशील का?
सध्या तरी ‘चंद्र आहे साक्षीला’ मालिका सुरु आहे. आता नक्कीच कुठे छान पात्र साकारता येईल या शोधात मी आहे. वेगवेगळ्या कॅरॅक्टर मधून लोकांसमोर यायला नक्कीच आवडेल.
मुलाखत – सिध्दी सुभाष कदम