गोड गळ्याची गायिका सुधा मल्होत्रा ८८ वर्षांची झाली!
संगीताच्या सुवर्णयुगातील सर्वच कलावंतांना काही प्रदीर्घ खेळी नाही खेळता आली. पण वाट्याला जे आलं त्याच मात्र सोनं केलं. पन्नासच्या दशकातील गायिका सुधा मल्होत्राबाबत (Sudha Malhotra) हे विधान तंतोतंत लागू पडतं. अत्यंत गुणी व गोड गळ्याची हि गायिका. मागच्या आठवड्यात ३० नोव्हेंबरला वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षात पदार्पण केले आहे. ३० नोव्हेंबर १९३६ चा जन्म.
आजच्या पीढीला हि गायिका माहित असण्याची सुतराम शक्यता नाही. कारण १९६० सालीच तिची गाण्याची छोटीशी कारकिर्द संपुष्टात आली वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी ! ज्या वयात कलाकाराच्या कला जीवनाचा खरा प्रारंभ होतो ; त्या वयात सक्तीची स्वेच्छा निवृत्ती घ्यायला भाग पाडलेल्या सुधाचे (Sudha Malhotra) दु:ख कुणाला कळणार? आज जाणकार रसिकांच्या स्मरणात तिची कितीतरी गाणी आजही ताजी आहेत. ’तुम मुझे भुल भी जाओ तो ये हक है तुमको मेरी बात और है मैने तो मुहोब्बत की है…’ हे तिचं मुकेश सोबतच ’दिदी’ (१९५९) चित्रपटातील गीत तिने स्वत: स्वरबध्द केलं होतं.
यमन रागावर गुंफलेलं ’सलामे हसरत कबुल कर लो मेरी मुहोब्बत कबुल करलो’ हे ’बाबर’ मधील रोशनचे गाणे ऐकताना काळ्जाला वेदना होतात. किती सुंदर आवाज होता सुधाचा! तिच्या स्वरात गीतादत्त, सुरैय्या आणि आशाच्या आवाजाचे मिश्रण होते. ३० नोव्हेंबर १९३६ रोजी तिचा जन्म दिल्लीला जरी झाला असला तरी तिचे बालपण लाहोर, भोपाळ आणि फिरोझपूर येथे गेले. वयाच्या पाचव्या वर्षी तिने आकाशवाणीवर गाणे सादर केले होते. तिला संगीतातच करीयर करायचं होतं. संगीतकार गुलाम हैदर यांनी तिचा आवाज ऐकला आणि तिला मुंबईला बोलावले. १९४८ साली मुंबईत आल्यावर तिला पं.लक्ष्मण प्रसाद जयपुरवाले आणि उस्ताद अब्दुल रहमान खान यांचे मार्गदर्शन लाभले. (Sudha Malhotra)
१९५० साली संगीतकार अनिल विश्वास यांच्याकडे ती ’आरजू’ करीता गायली. १९५१ साली तिला मन्नाडे, पारूल घोष यांच्या सोबत ’वंदेमातरम’ हे राष्ट्रगीत गायची संधी मिळाली चित्रपट होता ’आंदोलन’ आणि संगीत होतं पन्नालाल घोष यांचं. पन्नासच्या दशकात मंगेशकर भगिनींनी संगीताच्या दुनियेत सारे विश्व व्यापून टाकले. त्यामुळे बाकी गायिकांच्या गाण्यांची संख्या घटत गेली. सुधाने या काळात धूल का फूल, दिल ए नादान, नरसी भगत, अब दिल्ली दूर नही, कैसे कहू, डिटेक्टीव्ह, गर्लफ्रेंड या सिनेमातून गाणी गायली. (Sudha Malhotra)
’गर्लफ्रेंड’ मध्ये तिने किशोरकुमार सोबत एक अतिशय अप्रतिम युगल गीत गायले होते. ’कश्ती का खामोश सफर है…’ तिची आणखी काही गाजलेली गाणी म्हणजे ना मै धन चाहूं ना रतन चाहूं (काला बाजार), न तो कॉंरवां की तलाश है (बरसात की रात) १९५७ सालच्या ’पवनपुत्र हनुमान’ या सिनेमात तिने एके काळची ख्यातनाम पार्श्वगायिका अमीरबाई कर्नाटकी हिच्यासाठी पार्श्वगायन केलं होतं. आपल्या मराठी रसिकांसाठी सुधाचा स्वर ’शुक्र तारा मंद वारा’ आणि ’हात तुझा हातात मंद ही हवा’ या अरूण दाते सोबत तिने गायलेल्या दोन युगल गीतांनी अजून जवळचा वाटतो.
तिच्या पाठीशी कुणी मोठी अभिनेत्री नव्हती किंवा संगीतकार नव्हता. होता फक्त एक गीतकार साहिर लुधियानवी. साहिर आणि सुधा यांच्यातील नात्याला प्रेम संबंधाची जी एक हळवी किनार आहे ती रसिकांमध्ये वारंवार चर्चिली जाते. यांच्या नात्यावर काही दंतकथाही निर्माण झाल्या. या दोघांच्यात ब्रेकअप झाल्यावर साहिरने ’चलो इक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो’ हे गीत लिहिले अशी अफवा पसरवली गेली. पण या सार्या प्रकाराचा सुधाच्या करीयरवर विपरीत परीणाम झाला व वयाच्या २३ व्या वर्षी तिला संगीताच्या दुनियेतून बाहेर पडावे लागले. फार वर्षांनी १९८२ साली आर के च्या ’प्रेम रोग’ मध्ये सुधाचा स्वर अन्वर सोबत ऐकायला मिळाला गाण्याचे बोल होते ….’ये प्यार था या कुछ और था…(Sudha Malhotra)
================
हे देखील वाचा : Sahir Ludhianvi – चलो इकबार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो, या गाण्यासाठी साहिर का आग्रही होता?
=================
साहीर यांच्या नावाचा तिला फायदा व्हायच्या ऐवजी तोटाच झाला. तिने गिरीधर मोटवानी यांच्याशी लग्न केले. तिच्या लग्नानंतर ब्लिट्झ मासिकाने तिचा आणि साहीरचा एकत्र फोटो छापून वादंग निर्माण केला होता. सुधाने (Sudha Malhotra) कायमच या रिलेशनचा इन्कार केला होता. असे असतानाही मासिकाने तो फोटो छापल्याने सुधाने कायदेशीर नोटीस दिली होती. पुढच्या अंकात ब्लिट्झने माफी मागितली होती. १९६० सालानंतर सुधाचे आयुष्य शांत आहे. १९८२ साली आर केच्या प्रेम रोग या सिनेमात ती गायली होती. जगजीत सिंगच्या एका अल्बम मध्ये तिची गाणी होती. पण एकूणच वयाच्या पंचविशीतच स्वेच्छा निवृत्ती घेतलेला हा स्वर जर गाता राहिला असता तर किती मधुर गाणी आपल्याला ऐकायला मिळाली असती?